computer

आपल्या अन्नात कोण विष कालवतंय ?? अमेरिकेत हे आधीच होऊन गेलंय. वाचा ८७०० खटले असलेल्या एका कंपनी बद्दल !

आपल्या अन्नात विष कालवणार कोण ? आपणच आणि दुसरं कोण ! पृथ्वीच्या पाठीवर माणसासारखा मूर्ख प्राणी मिळणार नाही. भूक मोठी म्हणून उत्पादन जास्त हवं उत्पादन, वाढवायचं म्हणून रसायनं वापरायची, रसायन पोटात गेलं की आजारी पडायचं ! गेल्या आठवड्यातील अमेरिकेत गाजणारी चर्चेत असलेली ही बातमी बघा !

गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीची चर्चा अमेरिकेत सर्वत्र चालू आहे. नाही, या चर्चेचा विषय शाळेत झालेला गोळीबार ,अतिरेकी, अणवस्त्र, डोनाल्ड ट्रंप याबद्द्ल नाही. ही चर्चा सिरीअल ब्रेकफास्ट म्हणजे लहान मुलांच्या न्याहारीबद्दल आहे. हा विषय आपल्याकडे थेट चर्चेत येण्याची शक्यता फार कमी आहे.  कारण आपल्याकडे न्याहारीला सिरीअल ब्रेकफास्ट खायची सवय नाही.

सिरीयल ब्रेकफास्ट म्हणजे काय?

थोडक्यात सांगायचे तर सिरीअल ब्रेकफास्ट म्हणजे मका, ओट, फळे, वेगवेगळ्या प्रकारचे पोहे, फळं आणि दूध एकत्र करून बनवलेली न्याहारी! अमेरीकेतल्या वाढत्या वयाच्या मुलांच्या पोषणासाठी न्याहारीचा हा ठरावीक  नमुना आहे. यामध्ये काही कंपन्या व्हिटामीन्स टाकून त्याला फोर्टीफाइड सिरीअल ब्रेकफास्ट असे म्हणतात.  पण नुकत्याच केलेल्या एका पाहाणीत जे निदर्शनास आले त्याने पालकांची झोप उडली आहे. बहुतेक सुप्रसिध्द मोठ्या कंपन्यांच्या सिरीअलमध्ये राउंडअप या तणनाशकाचे अंश मिळाले आहेत.

 

आता या राउंडअपचे अंश सापडल्यामुळे हवालदिल होण्यासारखे आहे तरी काय? आणि आपल्याला या बातमीची दखल घेण्याचे कारण काय ?

राउंडअपचे अंश सापडल्यामुळे काळजीत पडण्याचे होण्याचे कारण एकच आहे की या रसायनामुळे कॅन्सर होऊ शकतो. याच कारणासाठी अमेरिकेत या कंपनीविरुध्द एकूण ८७०० खटले प्रलंबित आहेत. गेल्याच वर्षी एका खटल्यात राउंडअप बनवणार्‍या मॉन्सँटो कंपनीला एका कॅन्सरबाधीत व्यक्तिला नुकसान भरपाई पोटी ७.८ कोटी डॉलर देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

काय आहे हे राउंडअप?

राउंडअप हे अमेरिकेतल्या मॉन्सँटो या कंपनीचे तणनाशक आहे. शेतात, मैदानात जेथे तण  वाढण्याची शक्यता आहे अशा सर्व ठिकाणी हे तणनाशक फवारले जाते. ग्लायफोसेट (Glyphosate) हा या राउंडअप मधला महत्वाचा रासायनीक घटक आहे. ग्लायफोसेटला शास्त्रीय परिभाषेत ऑर्गनोफॉस्फोरीक म्हणजे फॉस्फरसचा समावेश असलेले रसायन  म्हणतात. हे तणनाशक वनस्पतींच्या वाढीस लागणारे उत्प्रेरक (एन्झाइम) वाढण्यास प्रतिबंध करते आणि त्यामुळे तणाची वाढ होत नाही. तणावर हे फवारल्यानंतर पानांच्या माध्यमातून ते शोषले जाते आणि तण नाहीसे होते.  कंपनीचा दावा आहे की हे रसायन फक्त गवतासारख्या वनस्पतींचा नाश करते,  प्राणी किंवा माणूस यांना राउंडअप पासून काहीही धोका नाही. अनेक वेगवेगळ्या संस्थांनीही हे रसायन मनुष्य जीवाला धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला आहे.  पण प्रत्यक्ष अनुभव पूर्णपणे विपरीत असल्याचे आता लक्षात येते आहे. मॉन्सँटोच्या एकूण उलाढालीत राउंडअपचा वाटा १० टक्के असल्याने हे तणनाशक जास्तीतजास्त विकले जावे याचा कंपनी आटापिटा करते.

पण आपला या घटनेशी काय संबंध आहे ?

मॉन्सँटो कंपनीने बनवलेल्या या तणनाशकाचे हक्क सन २००० पर्यंत अमेरिकन पेटंटमुळे सुरक्षित होते. इतर देशात त्या अगोदरच हे रसायन पेटंटच्या बाहेर पडले होते.  २०१५ साली भारतातल्या दोन शास्त्रज्ञांनी राउंडअपवर एक विशेष संशोधन केले.  त्यांच्या निष्कर्षानुसार अगदी अल्पकाळ वापरले तरी या रसायनामुळे मानवी शरीरात स्टेरॉइडसारख्या हार्मोन्सचा समतोल बिघडतो.

(अप्रतिमा पांडे)

मेधामूर्ती रुद्रय्या आणि अप्रतिमा पांडे या (Department of Molecular Reproduction, Development and Genetics, Indian Institute of Science (IISc), Bengaluru) दोन शास्त्रज्ञांनी उंदरांवर या रसायनाचा वापर केला. त्यांनी उंदरांच्या अन्नात १० मिलीग्रॅमपासून राऊंडअप मिसळण्यास सुरुवात केली आणि नंतर हे रसायन २५० मिलीग्रॅमपर्यंत  मिसळण्यात आले. असे प्रयोग करताना वापरल्या जाणार्‍या उंदरांचे एकूण आणि एकत्र वजन घेतले जाते. काही दिवसांनंतर या उंदरांची भूकच नाहीशी झाली. टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टीसोनचे प्रमाण कमी झाले. वजनही घटले. परिणामी उंदरांची प्रजनन शक्ती कमी झाली. चयापचय  करणार्‍या पिट्युटरी ग्रंथीचा स्त्राव कमी झाला. आणि हे सगळे घडले केवळ दोन आठवड्याच्या कालावधीत!! आता तुमच्या लक्षात आले असेलच की हे रसायन किती भयानक आहे.

भारतात हे रसायन उपलब्ध आहे का? वापरले जाते का? हा महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर असे आहे की भारतात अनेक कंपन्या हे रसायन विकतात आणि शेतकरी त्याचा वापरही करतात. मॉन्सँटो कंपनी आता बायर या कंपनीत विलीन झाली आहे आणि बायर क्रॉप सायन्स ही कंपनी भारतात कार्यरत आहे इतकी माहिती तर्क करण्यास पुरेशी आहे. आंतरजालावर थोडी शोधाशोध केली तर इतर छोट्यामोठ्या कंपन्या देखील ग्लायफोसेट विकतात हे कळते. आपल्या अन्नात गहू , ज्वारी , तांदूळात हे विष कालवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मेधामूर्ती रुद्रय्या आणि अप्रतिमा पांडे यांचे संशोधन २०१५ साली झाले आहे. आजच्या तारखेस अशा घातक रसायनांविरुध्द एकत्र सामाजिक आवाज ऐकू येत नाही ही खेदाची गोष्ट आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required