computer

पर्यटनामुळे वेड लागते ? या जगप्रसिध्द शहरांना भेट दिल्यावर अनेकांचे मानसिक संतुलन का ढळते ?

मानसशास्त्रात मनाच्या काही विकृतींना सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. आता उदाहरण घ्यायचंच झालं तर  स्टॉकहोम सिंड्रोमच घ्या. या मानसिक आजारात रुग्णाला त्याच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीविषयीच प्रेम वाटू लागते. पण, याला स्टॉकहोमच का म्हटले गेले असावे. जगप्रसिद्ध स्टॉकहोम शहर आणि या आजाराचा काही संबंध असावा का? हेच नाही तर परीस सिंड्रोम, जेरुसलेम सिंड्रोम अशी दहा शहरे आहेत ज्यांच्या नावावरून या सिंड्रोमची नावे पडली आहेत. पण या शहरांचा आणि या सिंड्रोमचा नेमका काय संबंध असावा? या लेखातून आम्ही या प्रश्नचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 
यातील काही सिंड्रोम हे पर्यटनाशी संबधित आहेत तर काही अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगाशी संबधित असलेले आहेत तर काही इतर प्रकारचे आहेत. पण, यांची नावे मात्र शहरांशी जोडलेली आहेत. 
 

१) जेरुसलेम सिंड्रोम

तर शहरांशी संबधित सिंड्रोमच्या नावामध्ये हे नाव सर्वात आधी येते. याचा संबंध पर्यटनाशी आणि विशेषत: जेरुसलेमला भेट दिल्यानंतर काही व्यक्तीमध्ये या सिंड्रोम दिसून येतो म्हणून याल जेरुसलेम सिंड्रोम म्हटले आहे. १९३० साली या प्रकारच्या रुग्णांची पहिल्यांदा ओळख पटली. दरवर्षी जेरुसलेमला जे पर्यटक (भाविक/कारण हे एक प्रसिद्ध धार्मिक शहर आहे.) भेट देतात त्यातील १०० पैकी ४० लोकांमध्ये तरी कमी अधिक प्रमाणात हा सिंड्रोम आढळेला आहे. हा सिंड्रोम धार्मिक श्रद्धेशी निगडीत आहे. जेरुसलेमला भेट दिल्यानंतर व्यक्ती अतिशय भावूक होतात आणि त्या स्वतःला बायबल मधील प्रसिद्ध पात्र किंवा व्यक्ति असल्याचे मानू लागतात. कोणी स्वतःला मेरी समजतं तर कोणी मोझेस, काही काही तर लोकं स्वतः जिझस असल्याचाही दावा करतात. 

स्वत: आपण कोण आहोत हे इतरांना पटवून देण्यासाठी या व्यक्ति मग रस्त्यावरून आपण अमुक तमुक आहोत असे हाकारे देत फिरू लागतात. त्यांच्या वर अविश्वास दाखवणाऱ्या व्यक्तीबाबत आक्रमक होतात. स्वतःचे शरीर पवित्र राखण्यासाठी सतत अंघोळ करावीशी वाटते. काहीजण आपल्या शरीरावरील सगळे केस काढून टाकतात. सतत नखे काढत राहतात. 

उपचारानंतर असे रुग्ण बरे होत असले तरी यांना उपचाराची गरज आहे, हे पटवून देणेच महाकठीण होऊन बसते. बायबल हा फक्त ख्रिश्चन धर्मग्रंथ असल्याने फक्त ख्रिश्चन लोकच याला बळी पडतात असे नाही. ज्यू धर्मीय लोकही या प्रकारच्या सिंड्रोमला बळी पडतात. फरक फक्त हा आहे की, ख्रिश्चन धर्मीय न्यू टेस्टामेंट वर जास्त विश्वास ठेवत असल्याने ते स्वतःला न्यू टेस्टामेंट मधील पात्रांशी जोडून घेतात आणि ज्यू मात्र ओल्ड टेस्टामेंट मानत असल्याने ते स्वतःला ओल्ड टेस्टामेंट मधील पात्रांशी जोडून घेतात. 

२) पॅरीस सिंड्रोम 

२००४ मध्ये या प्रकारचा पहिला रुग्ण आढळला होता. जपानी लोकांमध्येच हा सिंड्रोम मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. दरवर्षी याप्रकारचे किमान १२ रुग्ण तरी आढळतात. विशेष बाब म्हणजे या व्यक्ति तिशीच्या आसपासच्याच असतात. या रुग्णांमध्ये अत्याधिक तणाव, चिंता आणि भ्रम अशी लक्षणे दिसून येतात. आपल्या हॉटेलमध्ये किडेच किडे पसरलेत, किंवा ते फ्रांसचे चौदावे लुई आहेत, असा भ्रम त्यांच्यात दिसून येतो. 
पण जापनीज पर्यटकांमध्येच याचे प्रमाण जास्त का? कदाचित या लोकांना परीस हे एक आदर्शवत स्वप्न नागरी असल्याचा समज असतो पण प्रत्यक्षात जेव्हा इथल्या लोकांचे उद्धट, तुसडे वर्तन पाहतात तेव्हा त्यांन जबर धक्का बसतो. कारण, वास्तव आणि त्यांच्या अपेक्षा यातील अंतर खूप मोठे असते. शिवाय, भाषेचा अडसर हे देखील एक कारण असू शकते किंवा ही तिन्ही कारणेही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणाशी जुळवून न घेता आल्यानेही मानसिक ताण वाढू शकतो.
यासाठी पॅरीसमधील जपानिज दुतावासाने चोवीस तास एक इमर्जन्सी हॉटलाईन ठेवली आहे. या क्रमांकाशी संपर्क करून रुग्णाने जर आपल्या समस्येविषयी माहिती दिली तर त्याला जापनीज दूतावासाकडून तातडीची मदत मिळते. अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होतात. 

३) फ्लॉरेन्स सिंड्रोम –


युरोप मधून फ्लॉरेन्सला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये या प्रकारचा सिंड्रोम मोठ्या प्रमाणात आढळतो. १९८० साली या प्रकारचा रुग्ण पहिल्यांदा आढळला होता. त्यानंतर दरवर्षी किमान १०० रुग्ण तरी आढळतातच. फ्लॉरेन्स शहराची सांस्कृतिक वैभव पाहून काही लोकांच्या मनावर दडपण येते. काही लोकांना तर फ्लॉरेन्स म्युजियम मधून थेट रुग्णालयातच भारती करण्याची वेळ येते. इतके ते या सांस्कृतिक श्रीमंतीने भारावून गेलेले असतात.
यात रुग्णांना सतत आळस, धुंदी, भ्रम, अशी लक्षणे दिसून यीतात. काही लोकांमध्ये याचे पॅरानॉइड सायकोसिसमध्येही रुपांतर होते. तर काही रुग्ण काही दिवसांच्या विश्रांती नंतर बरे होतात. 
१८१७ साली फ्रेंच लेखक स्टेनडालने देखील त्याला असा अनुभव आल्याचा उल्लेख केला होता. त्याच्या नावावरून याला स्टेनडाल सिंड्रोम म्हणूनही ओळखले आते. 

४) व्हेनिस सिंड्रोम

व्हेनिस शहराला भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांना त्यांच्या आयुष्यातील रसच संपल्याचा अनुभव येतो. कधी कधी ही निराशा इतकी टोकाला जाते की, ते स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न करतात. 
१९८८ ते १९९५ या दरम्यान इथे आलेल्या ५१ लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यातही जर्मनीहून आलेल्या पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. थॉमस मन या जर्मन लेखकाने लिहिलेल्या डेथ इन व्हेनिस या कादंबरीचा हा प्रभाव असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. अशा प्रकारे आजपर्यंत इथे १६ लोकांनी आत्महत्या केली आहे. 
जे ३५ लोक आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचले त्यांच्या मते व्हेनिस शहर हे ऱ्हासाचे आणि अध:पतनाचे प्रतीक असल्याची तीव्र जाणीव झाल्यानेच त्यांनी हे पाउल उचलले. 

५) स्टॉकहोम सिंड्रोम

याप्रकारच्या सिंड्रोममध्ये रुग्णाला त्याला छळणाऱ्या व्यक्तीबद्दलच ममत्व निर्माण होते. स्टॉकहोम शहरात १९७३ साली काही दरोडेखोरांनी एक बँक लुटली होती आणि पोलिसांकडून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी त्यांनी काही बँक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले होते. सहा दिवस या दरोडेखोरांच्या संपर्कात राहिल्यानंतर त्या बँक अधिकाऱ्यांना या दरोडेखोरांबद्दल इतका विश्वास निर्माण झाला की, त्यांनाही पोलिसांचीच जास्त भीती वाटू लागली. पोलिसांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करण्याऐवजी हे दरोडेखोर सही सलामत या आरोपातून सुटावेत म्हणून या अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केले होते. या घटनेवरून अशा प्रकारे आपल्याला छळणाऱ्या, ओलीस ठेवणाऱ्या किंवा आपल्याला कठीण प्रसंगात अडकवणाऱ्या व्यक्तीबद्दलच उलट जेव्हा सहानुभूती वाटू लागते तेव्हा त्या अवस्थेला स्टॉकहोम सिंड्रोम म्हटले जाऊ लागले. 

६) लिमा सिंड्रोम 

हा सिंड्रोम अगदी स्टॉकहोम सिंड्रोमच्या उलट आहे. यामध्ये अपहरणकर्त्यालाच त्याच्या बंदिवानाबद्दल सहानुभूती वाटू लागते. १९९६ साली या शहरात अशा प्रकारची एक घटना घडली होती. ज्यामध्ये तुपाक अमारू रिव्होल्यूशनरी मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी जापनीज दूतावासातील ६०० लोकांना बंदी बनवले होते. 
पण, या अपहरणकर्त्यांनाच या लोकांची इतकी दया आली की त्यातील काही लोकांना त्यांनी स्वतःहून सोडून दिले. यात पेरू देशाच्या अध्यक्षांच्या आई सारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश होता. खरे तर अशा प्रतिष्ठित व्यक्तींना ओलीस ठेवून त्यांना आपल्या मागण्या सहजरित्या मान्य करवून घेता आल्या असत्या पण त्याऐवजी त्यांनी आपल्या बंदी लोकांना सोडून देण्यातच शहाणपण मानले. ६०० पैकी काही लोकांना त्यांनी जाऊ दिले असले तरी काही लोक अजूनही त्यांच्या ताब्यात होते. पेरू सरकारने यांच्याशी बोलणी करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी घालवला. मात्र त्यांच्या ताब्यातील एकही व्यक्तीला त्यांनी इजा पोहोचवली नव्हती. शेवटी लष्करी कारवाई करून त्यांनी सगळे बंदी मुक्त केले. यात अपहरणकार्त्यांपाकी दोघांचा मृत्यूही झाला होता. 
तेव्हापासून अशा प्रकारची मानसिक अवस्थेला लिमा सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. लिमा ही पेरू देशाची राजधानी आहे.

७) लंडन सिंड्रोम

स्टॉकहोम सिंड्रोम आणि लिमा सिंड्रोम या दोन्हींच्याही उलटी लक्षणे या सिंड्रोम मध्ये दिसतात. स्टॉकहोम मध्ये बंधकाला अपहरणकर्त्याबद्दल सहानुभूती वाटू लागते तर लिमा मध्ये अपहरणकर्त्याला बंधकाबद्दल सहानुभूती वाटू लागते. मात्र इथे स्वतः बंधक वाद घालून अपहरणकर्त्याला उचकवण्याचा प्रयत्न करतो. 

१९८१ साली लंडनच्या इराणियन दुतावासात अशीच घटना घडली होती. यात अपहरणकर्त्यांनी तुलनेने अधिक वाद घालणाऱ्या २६ बंधकाना उचलून रस्त्यावर फेकले होते आणि त्यांचा जीव घेतला होता. बंधक स्वतः अपहरण कार्त्याशी वाद घालून उचकवत असतात, काय करणार ते कर अशी उलट धमकी देतात तेव्हा त्याला लंडन सिंड्रोम म्हटले जाते. शेवटी या बंदी लोकांना सोडवण्यासाठी सशस्त्र कारवाई करावी लागली. यावेळी अपहरण कर्त्यांनी आणखी एका बंधकाचा बळी घेतला.
s/

८) अॅमस्टरडॅम सिंड्रोम –

एखादी व्यक्ति जेव्हा आपल्या जोडीदाराचे नग्न फोटो इतरांना पाठवते तेही जोडीदाराच्या पूर्वपरवानगी शिवाय. अशा विकृतीला मानसशास्त्रीय परिभाषेत अॅमस्टरडॅम सिंड्रोम म्हटले आहे. अॅमस्टरडॅमच्या रेड लाईट एरियातील वेश्या खिडकीत उभे राहून ग्राहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारावरून या विकृतीला अॅमस्टरडॅम शहराचे नाव देण्यात आले आहे.
इटालियन मानसशास्त्रज्ञ ला सेपीएंझा यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला. रोम मध्ये भरलेल्या सेक्सॉलॉजी फेडरेशन मध्ये त्यांनी या संबधीचा शोधनिबंध सादर केला होता. 

९) ब्रुकलीन सिंड्रोम 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या संकल्पनेचा जन्म झाला. लष्करात काम करणाऱ्या काही सैनिकांमध्ये सुरुवातीला याप्रकारचे वर्तन आढळून आले होते. या सैनिकाकडून विशिष्ट पद्धतीचे वर्तन वारंवार घडत होते. यावरून हे सैनिक ज्या भागातून किंवा प्रदेशातून येतात त्यावर त्यांची वर्तन पद्धती अवलंबून असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. काही काही वेळा त्यांच्यामध्ये अतिप्रमाणात आक्रमकता आणि भांडण उकरून काढण्याची खुमखुमी उफाळून येत असे. 
 

१०) डेट्रॉइट सिंड्रोम

 वयोमानानुसार काही ठिकाणी लोकांना आपले काम सोडावे लागते आणि त्याठिकाणी नव्या तरुणांची भरती केली जाते. वयावरून केला जाणाऱ्या या भेदभावावरून या सिंड्रोमचे नाव पडले आहे. डेट्रॉइट हे शहर वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. इथे सतत जुन्या गाड्यांच्या जागी नव्या आणि मॉडिफाइड गाड्या येत असतात. यावरून या सिंड्रोमला डेट्रॉइट सिंड्रोम असे नाव देण्यात आले. 

तरीही मानसशास्त्रीय संकल्पनांसाठी चक्क शहरांची नावं म्हणजे नवलच नाही का!


मेघश्री श्रेष्ठी
 

सबस्क्राईब करा

* indicates required