लाईफलाईन एक्सप्रेस : जगातली पहिली हॉस्पिटल ट्रेन भारतात सुरु झालीय ठाऊक आहे का?
तुम्हाला माहिती आहे का, भारतीय रेल्वेने दुर्गम भागातल्या लोकांना पटकन उपचार व्हावेत म्हणून बनवली आहे एक हॉस्पिटल ट्रेन! अगदी सुसज्ज ऑपरेशन थेटर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासहित!!!
झाले काय, कोविडचा काळ होता आणि हॉस्पिटलची कमतरता होती. त्या काळात रेल्वेने आपल्या रेल्वेच्या बोगी रुग्णांसाठी उपचार करायला दिल्या. यातूनच एक कल्पना साकारली, इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन या संस्थेने भारतीय रेल्वेच्या मदतीने ह्या जगातल्या पहिल्या हॉस्पिटल ट्रेनची निर्मिती केली.
लाईफलाईन एक्सप्रेस असे नामकरण केले गेले. याच ट्रेनला जीवन रेखा एक्स्प्रेस असे म्हणतात. नावाप्रमाणेच ही ट्रेन स्वतःमध्ये जीवन घेऊन फिरते. वातानुकूलित बोगी, दोन अत्याधुनिक सोयींनी युक्त ऑपरेशन थेटर, पाच ऑपरेशन करण्याची खास टेबले प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी हे या ट्रेनची वैशिष्ट्य आहे.
अनेक दुर्गम खेडीपाडी आहेत, जिथे बस जात नाहीत. शासनाची कुठल्याही प्रकारची सुविधा तिथे वेळेवर पोहोचत नाही आणि भरीत भर म्हणजे प्रत्येक भागाची लोकसंख्या खूप कमी असल्याने तिथे पूर्णवेळ सुविधा उपलब्ध करणे जवळपास अशक्य होईल, अशा भागांसाठी लाईफ लाईन एक्सप्रेस हे वरदान ठरले आहे. कारण की ही ट्रेन इतर ट्रेनसारखेच रूळावरून धावते आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करते. रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हेच या रेल्वेचे यश आहे.
लाईफलाईन एक्सप्रेस ही बाकीच्या ट्रेनप्रमाणेच तिच्या वेळापत्रकाप्रमाणे धावते. तिच्या निर्धारित स्टेशनवर थांबून रुग्णांना उपचार देते. रुग्णांना नेण्यासाठी आणि आणण्यासाठी स्ट्रेचरची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच ट्रेनमध्ये पाॅवर कारची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे दुर्गम भागातील नेण्या आणण्यात रुग्णांना मदत होईल. ट्रेनमध्ये रुग्णांना दाखल केल्यावर ट्रेन चालू असतानाच रुग्णांवर उपचार करण्यात येतील. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया आणि इतर छोट्या वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे, त्यांचे उपचार सुरू करता येतील.यामुळे वन्यप्राण्यांनी चावा घेतल्याने जखमी झालेले लोक, गर्भवती स्त्रिया या सारख्या लोकांचे प्राण वेळेत उपचार केल्याने वाचवता येतील.
लाईफ लाईन एक्सप्रेस मधले ऑपरेशन थेटर हे अत्याधुनिक सोयी जसे निर्जंतुक वातावरण स्वच्छ जागा आणि सुसज्ज अशी व्यवस्था यांनी पूर्ण आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी १२ बर्थ आहेत.
तसेच त्यांच्या छोट्या छोट्या गरजांना लक्षात ठेवून एक छोटे स्वयंपाकघर, पाण्याचे फिल्टर, गॅस शेगडी, ओव्हन आणि फ्रिज या लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे वैद्यकीय कर्मचारी त्या ट्रेनमध्ये आरामात बरेच दिवस राहू शकतात आणि रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करू शकतात.
लाईफलाईन एक्सप्रेस हा भारत सरकारचा आणि इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनचा एक स्तुत्य उपक्रम आहे. आजपर्यंत दुर्गम भागातल्या आणि दूरवर पसरलेल्या खेड्यांमधल्या लोकांना वैद्यकीय उपचार मिळण्याची शक्यता ही जवळपास नसल्याच्या प्रमाणात होती. या लोकांना वेळेत उपचार न मिळाल्याने कायमचे अपंगत्व येत होते. प्रसंगी मृत्यूला तोंड द्यावे लागत होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अशा भागात राहणे कठीण होते.
पण लाईफ लाईन ट्रेन उपचारांची सर्व साधने घेऊन फिरते आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सर्व व्यवस्था पाहते. यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना साधनाअभावी किंवा औषधाअभावी अडून राहावे लागत नाही. चालत्या रेल्वेमध्ये उपचार करता येत असल्याने रुग्णांना दवाखान्यात नेईपर्यंत उशीर होत नाही.यामुळे डॉक्टर आणि नर्स यांच्या मनावर येणारा उपचार करण्याचा ताण बऱ्यापैकी कमी होतो तसेच रुग्णाला लांब वरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या खर्चात बचत होते.
हा उपक्रम सरकारच्या फ्लॅगशिप धोरणाप्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.सध्या रेल्वे आसामच्या बर्दापूर स्थानकावर थांबलेली आहे आणि ती 5 जानेवारी ते 24 जानेवारी या वेळेत तेथील रुग्णांवर उपचार करणार आहे.
या रेल्वेचे फोटो, रेल्वे विभागाने ट्विटरवर टाकले आहेत.
लाईफ लाईन ट्रेन अशा प्रकारचे उपचार देणारी जगातली पहिली ट्रेन ठरली आहे असे वाटते की ही एक्सप्रेस इतिहासातला मैलाचा दगड ठरेल.
तर मग अभिमान वाटतोय ना आपल्या भारताचा आणि लाईफ लाईन एक्सप्रेसचा!!!
लेखिका: क्षमा कुलकर्णी