भारतीयांनी लावलले १० भन्नाट शोध !!
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. असच काहीसं भारतात घडलं आहे. आपण भारतीय आहोतच जुगाडू. या जुगडातून काही शोध देखील लागले आहेत. प्रत्येक वेळी न्यूटन सारखं सफरचंद पडल्यावरच शोध लागतो असं थोडीच असतं. आता हेच बघा ना, गुजरात मध्ये आलेल्या भूकंपानंतर मनसुख प्रजापती यांनी विजेशिवाय चालणारा फ्रीज तयार केला. रेम्या जोस या मुलीने आई आजारी पडल्यावर घरातली सगळी काम करत असताना एक असा वॉशिंग मशीन तयार केला जो सायकलच्या पॅडलवर चालतो.
आजच्या शनिवार स्पेशल मध्ये आम्ही अश्याच काही भन्नाट शोधांना घेऊन आलो आहोत. चला तर पाहूयात भारतीयांनी लावलेले १० भन्नाट शोध.
१. तरंगणारा साबण
हा शोध लावला आहे सी. ए. विन्सेंट या माणसाने. नदीवर अंघोळ करताना बऱ्याचदा साबण नदीन पडून वाहून जायचा. हे विन्सेंटच्या ध्यानात आल्यानंतर त्याने काही प्रयोग केले आणि असा साबण तयार केला जो चक्क तरंगतो.
२. मोठ्या प्रमाणत लिंबू कापणारी मशीन
एम. नागराजन या व्यक्तीने ही मशीन तयार केली आहे. या मशीनचा शोध लागला तो लोणचे बनवणाऱ्या कारखान्यात मजुरांची संख्या कमी करण्यासाठी. त्यानंतर याचा वापर लिंबांचा काप करण्यासाठी होऊ लागला.
३. मिट्टीकुल
गुजरात मध्ये २००१ साली जो भूकंप झाला त्यानंतर मनसुख प्रजापती यांना या प्रकारच्या फ्रीजची कल्पना सुचली. मनसुख हे मातीपासून भांडी तयार करतात. त्यांनी मातीचाच वापर करून मिट्टीकुल हा फ्रीज तयार केला. फ्रीज बरोबर त्यांनी आणखी काही वस्तू तयार केल्या ज्या अन्न आणि पाणी थंड ठेवण्याचं काम करतात.
४. पाण्याचे टायर
वजनाने हलके असलेले ट्रॅक्टर शेतात चालवणं कठीण होऊन बसतं. म्हणून मध्यप्रदेश मध्ये ट्रॅक्टरच्या टायर मध्ये चक्क पाणी भरण्यात आलं.
५. गॅसवर चालणारा इस्त्री
विजेची कमतरता असताना इस्त्री कशी वापरावी या गरजेपोटी अजमेर मध्ये अशी इस्त्री तयार करण्यात आली जी गॅसवर चालते.
६. सोलार मस्किटो डिस्ट्रॉयर
मॅथिव के. मॅथिव या व्यक्तीने हा शोध लावला आहे. ही मशीन तिच्या आत असलेल्या एका विशिष्ट वासाने मच्छरांना आकर्षित करते. एकदा का मच्छर मशीनच्या आत आले की आतील तापमानाने मच्छर मरतात. एक खासियत म्हणजे ही मशीन सौरऊर्जेवर चालते.
हा शोध यशस्वी झाला असल्याने मॅथिव आता माश्यांना मारण्यासाठी नवीन मशीन बनवणार आहे.
७. फूड मेकिंग मशीन
अभिषेक भगतने या मशीनला तयार केलं आहे. तुम्हला ज्या प्रकारचं अन्न तयार करायचं आहे त्या प्रमाणे या मशीन मध्ये असलेले १२ विभाग १२ वेगवेगळ्या साहित्यांना वापरून ते अन्न तयार करतात. काही वेळातच तुमचा पदार्थ बनून तयार होतो. झटपट अन्न शिजवण्यासाठी हा एक फायदेशीर शोध आहे.
८. बैलांचा वापर करून कीटकनाशक फवारणी
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात कीटकनाशकातील विषारी घटकांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला होता. या समस्येवर खूप आधीच उपाय शोधला गेला आहे. ‘राधे शाम शर्मा’ आणि ‘भान्जीभाई मुठूकीया’ या दोघांनी मिळून अश्या प्रकारची यांत्राप्रणाली तयार केली जी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारणी करते. हे यंत्र बैलगाडीला जुंपून वापरता येत असल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांच्या जीवाचा धोका कमी होतो.
आणखी वाचा :
या कारणांमुळे यवतमाळमध्ये झालाय १८ शेतकऱ्यांचा मृत्यू...
पंतप्रधानांना पत्र – एका शेतकऱ्याचे मनोगत !
९. सायकलच्या पेडल द्वारे काम करणारी वॉशिंग मशीन
एकदा आई आजारी असताना ‘रेम्या जोस’ या मुलीवर घरच्या कामांची जबाबदारी आली. घरचं काम करत असतानाच तिला एका अश्या वॉशिंग मशीनची आयडिया सुचली जी सायकलच्या पेडलने काम करते. म्हणजे विजेची बचत आणि कपडे सुद्धा साफ. यावेळी तिचं वय होतं अवघं १४ वर्ष.
१०. झाडावर चढण्याचं उपकरण
ताडाच्या झाडावर किंवा नारळाच्या झाडावर चढणं धोकादायक असतं. हा धोका ओळखून ‘एम.जे. जोसेफ’ आणि त्याच्या वडिलांनी मिळून ताडाच्या झाडावर सहज चढण्यासाठी एक उपकरण तयार केलं. या उपकरणात पाय आणि हात स्थिर ठेवण्यासाठी एक खास जागा तयार केलेली असते. हात आणि पाय यांच्या एकत्र हालचालीने या उपकरणाद्वारे झाडावर चढता येतं.
भारतीय सुद्धा काही कमी नाहीत भाऊ. या १० शोधांवरून हेच तर सिद्ध होतं !!