बाटा, एशियन पेंट्स, रुह अफजा...जागतिक दर्जावर भारताची मान उंचावणारे १० अस्सल भारतीय ब्रँड्स!!
प्रत्येक देशासाठी काही अभिमानास्पद गोष्टी असतात मंडळी. आपल्या भारतीयांनाही अभिमान वाटावा अश्या अनेक गोष्टी भारतात आहेत. मग तो आपला हिमालय असेल, गडकिल्ले असतील, मंदिरे असतील अथवा आपला दैदिप्यमान वारसा सांगणाऱ्या अशा कित्येक गोष्टी असतील. पण आज आपण एक नजर टाकणार आहोत अशा भारतीय ब्रँड्सवर ज्यांनी जगात भारताचे नाव उंच केलेच आहे, शिवाय आपल्या प्रत्येकाचे ते जिव्हाळ्याचे ब्रँड आहेत. यातले काही ब्रँड्स तुम्हीच काय किंवा तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी पण नक्कीच वापरले असतील! चला तर मग, पाहूया आपले 'स्वदेशी' आणि 'अस्सल भारतीय' दहा ब्रँड्स ज्यांची जादू जनमानसावर कायम आहे…
१. बाटा
एक काळ असा होता मंडळी की चप्पल किंवा बूट खरेदी करायची म्हटलं तर डोळ्यांसमोर एकमेव नाव येत असे… बाटा! जरा आठवून बघा, आयुष्यात पहिल्यांदा वापरलेली बूट जोडी नक्की बाटाची असणार. बाटा हा ब्रँड आता पूर्णपणे भारतीय असला तरी याचा संस्थापक एक झेक व्यक्ती होती. ही व्यक्ती सन १९३१ मध्ये भारतात आली आणि आपला बूट तयार करण्याचा व्यवसाय तिने स्थापन केला. बाटाचे पहिले दुकान कोलकाता येथे सुरू झाले. तिथून या ब्रँडने इतकी लोकप्रियता मिळवली की बाटा कंपनीने अखिल भारतातील प्रत्येक फुटवेअर दुकानात आपली खास जागा निश्चित केली. आज जिथे या कंपनीच्या प्रॉडक्टसचे उत्पादन होते त्या जागेला बाटानगर म्हणतात यावरून ओळखून घ्या.
जाता जाता : बाटाच्या बूटाची किंमत नेहेमी अमुक रुपये आणि ९९ पैसे अशीच असते - हे पण इनडायरेक्ट ब्रँडींगच म्हणावे लागेल नाही का ?
२. एशियन पेंट्स
१९४० च्या सुमारास मुंबईच्या चार मित्रांनी एकत्र येऊन महिना ७५ रुपये भाड्याने घेतलेल्या एका गॅरेजमध्ये या कंपनीची स्थापना केली होती. तेव्हा कंपनीचं नाव होतं एशियन ऑइल अँड पेंट कंपनी. नावाची पण गंमत अशी की तेव्हा प्रचलित असलेल्या फोन डिरेक्टरीमधून चार शब्द एकत्र करून कंपनीचे नाव तयार झाले. दुसरं महायुध्द आणि त्यानंतरच्या स्वदेशी चळवळीतून कंपनीच्या भरभराटीने जोर पकडला. पण एशियन पेंट घरोघरी पोहचला त्यांच्या मॅस्कॉट 'गट्टू'मुळे! हातात ब्रश घेऊन एका विशिष्ट पोजमध्ये उभ्या असलेल्या मुलाचे चित्र दिसताच ही एशियन पेंटची जाहिरात आहे हे सांगावं लागायचं नाही. हा गट्टू रेखाटला आहे आर.के. लक्ष्मण यांनी, हे भाग्य फारच थोड्या कंपन्यांच्या वाट्याला आलं असेल. १९५४ साली आलेल्या गट्टू २०१२ साली मॅस्कॉट म्हणून सेवानिवृत्त करण्यात आलं. त्याची जागा घेतली सोहा अली खानने! पण आजही 'एशियन पेंट म्हणजे तुमच्या माझ्या मनात गट्टूच आहे.मंडळी, आज हा ब्रँड आशियातील रंगांच्या सर्वात मोठ्या ब्रँड्स पैकी एक आहे.
जाता जाता : 'रंग दे बसंती' आला तेव्हा अशा वावड्या आल्या होत्या की त्या चित्रपटाचा फूलटू फायनान्स एशियन पेंटने केलाय. अर्थातच ते खोटे होते, पण रंग म्हटले की एशियन पेंटच आठवते याची ती खूण होती.
एशियन पेंट्सविषयी आमच्या या लेखात सविस्तर वाचा:
ब्रिटीशांच्या बंदीमुळे अशी उभी राहिली देशातली सर्वात मोठी पेंट कंपनी!!
३. महिंद्रा अँड महिंद्रा
भारताच्या कोणत्याही शहरात जा, महिंद्राच्या आलिशान गाड्या रस्त्यांवर धावताना तुम्हाला दिसतील. भारताच्या कोणत्याही खेडेगावात जा… शेतांमध्ये महिंद्राचे ट्रॅक्टर राज्य करताना दिसतील. इतका लोकप्रिय आहे हा ब्रँड! पण कदाचित अनेकांना माहीत नसेल, या कंपनीचे सुरुवातीचे नाव महिंद्रा अँड महंमद असे होते. या ब्रँडने १९४५ ला स्टीलच्या व्यवसायापासून सुरुवात केली. नंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि सहसंस्थापक असणारे मलिक महंमद हे पाकिस्तानात निघून गेले. ते तिकडे जाऊन पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री बनले. इकडे या कंपनीचे नाव बदलून महिंद्रा अँड महिंद्रा केले गेले. ही कंपनी १९४८मध्ये वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली आणि पुढचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. आजच्या घडीला महिंद्रा जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे मंडळी. भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे ना हे?
जाता जाता : एकेकाळी जीप म्हणजे महिंद्रा असं समीकरण होतं, त्या काळात ते स्टेटस सिंबॉल होते. नंतर टाटांची सुमो आली आणि काही काळ लोकं महिंद्राला विसरले. पण त्यांनतर स्कॉर्पीओ आली आणि सुमो मागे पडली. आता तर जमाना आहे महिंद्रा थारचा!
४. पारले जी
बाळाचे उष्टावण हा आपल्या घरघरातला जिव्हाळ्याचा सोहळा असतो. मामाकडून सोन्याच्या अंगठीने खीर मुलाच्या तोंडास लावून हा संस्कार करतात. पण भारतातल्या बहुतांश बाळांचे उष्टावण करण्याचा मान मामाला नाही, तर पार्लेजीलाच मिळायला हवा.
भारतात एकही व्यक्ती अशी नसेल, जिला पारले-जी बिस्कीट माहीत नसेल. मोठ्या मोठ्या मॉलपासून ते गल्लीबोळातल्या टपरीपर्यंत तुम्हाला कुठेही पारले जी मिळेल. अगदी स्वस्त आणि तेवढंच मस्त असणारं हे बिस्कीट भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीमंत असो वा गरीब, पारले जी सर्वांच्याच मनावर अधिराज्य करते. १९३९ मध्ये सुरुवात झालेला हा अस्सल भारतीय ब्रँड आज जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्कीट बनवणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो.
जाता जाता : ज्यांना चहा पण वारंवार पिणं परवडत नाही असे अनेक मजूर पार्लेजी पाण्यात बुडवून खातात हे दृश्य तुम्ही बघितलं आहे का? ते पाहून डोळ्यात पाणी उभं राहील.
५. बजाज ऑटो
१९४५ मध्ये बजाज कंपनीची स्थापना झाली. बजाज ऑटो सुरुवातीला परदेशातून स्कूटर आयात करून भारतात विकत असे. नंतर १९५९ मध्ये स्कूटर निर्मिती करण्याची परवानगी भारत सरकारकडून मिळवल्यानंतर बजाजने मागे वळून पाहिलेच नाही. १९८६ मध्ये या कंपनीने मोटरसायकल निर्मिती सुरू केली. त्यानंतर वेळोवेळी कावासाकी, केटीएम वगैरे इतर देशातील ब्रँड्ससोबत भागीदारी करून आपला आलेख चढता ठेवला. मंडळी, आज बजाज ऑटो ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी रिक्षा उत्पादक कंपनी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक कंपनी आहे. बुलंद भारत की बुलंद तस्वीर -हमारा बजाज अगदी सार्थ ठरवणारा हा ब्रँड आहे.
जाता जाता : बजाज म्हटल्यावर चित्रपट रसिकांना 'अंदाज अपना अपना'चा हा डयलॉग आठवतोच ब्रेड का बाहशाह और आम्लेटका किंग बजाज -हमारा बजाज!!
६. फेविकॉल
"ये फेविकॉल का मजबूत जोड है, टुटेगा नहीं!!" काय मंडळी, आठवतात ना या जाहिराती? ऐंशी आणि नव्वदच्या दशकात फेविकॉलच्या धमाल क्रिएटिव्ह जाहिरातींनी धुमाकूळ घातला होता. दोन हत्तींचे चित्र असणारा लोगो घेऊन हा ब्रँड १९५९ मध्ये स्थापन झाला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाला. लहान मुलांचे क्राफ्ट पेपर असो, वा मोठ्या इंडस्ट्रीमधील वस्तू चिकटवायच्या असो… पहिल्यांदा फेविकॉलचीच आठवण येते. चिकटवण्याच्या क्षेत्रात या ब्रँडची एकाधिकारशाही आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फक्त भारतातच नाही तर अमेरिका, ब्राझील, थायलंड, इजिप्त अश्या अनेक देशांमध्ये फेविकॉल निर्यात केले जाते.
जाता जाता : दोन हत्तींच्या लोगोमागे 'मॅगडॅबर्ग ' प्रयोगाची एक कथा आहे. हवेचा दाब सिध्द करण्यासाठी १६५४ साली हा प्रयोग करण्यात आला होता. आपल्या पाठ्यपुस्तकात ते तुम्ही वाचलंच असेल. आठवत नसेल तर हे चित्र पाहा!
७. एअर इंडिया
मान झुकवून स्वागत करणारा मॅस्कॉट 'महाराजा' ही एअर इंडियाची खासियत आहे. अनेक भारतीयांचे आकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न एअर इंडियाने पूर्ण केले. मुळात हा ब्रँड स्थापन केला तो जेआरडी टाटा यांनी. १९३२ मध्ये टाटा ग्रुपने टाटा एअर सर्व्हिस ही कंपनी सुरू करून कराची ते चेन्नई अशी विमानाद्वारे प्रवासी सेवा देण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर १९५३ साली भारत सरकारच्या अखत्यारीत ही कंपनी गेली आणि याचे एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. आपल्या ताफ्यात जेट एअरक्राफ्ट आणणारा हा आशियातील पहिला ब्रँड आहे.
जाता जाता : विमानाने प्रवास केला असेल किंवा नसेल अशा काळात घरच्या शोकेसमध्ये हा महाराजा असायचाच!
८. रुह अफजा
या ब्रँडची कथा अगदी मजेशीर आहे मंडळी. दिल्लीतल्या युनानी हकीम अब्दुल माजिद यांनी हमदर्द नावाचा दवाखाना 1907 मध्ये सुरू केला. या दवाखान्यामध्ये रुग्णांवर उष्माघात, डायरिया, डिहायड्रेशन वगैरे आजारांवर उपचार केले जात. या उपचारांचा एक भाग म्हणून अब्दुल माजिद यांनी सरबताच्या रुपात विशिष्ट फॉर्म्युला वापरून एक औषध बनवले. हेच ते रुह अफजा! या औषधाची चव लोकांना इतकी आवडली की खास रुह अफजा घेण्यासाठी लोक हमदर्द दवाखान्यात रांगा लावत असत. रुह म्हणजे आत्म्याला अफजा म्हणजे राहत किंवा शांती देणे असा रुह अफजाचा अर्थ आहे. लाल रंगाचे हे गोड सरबत एक शतकानंतरही आपली तीच चव राखून आहे. माजिद यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी नंतर रुह अफजा पाकिस्तान, बांगलादेश या देशातही नेले. आज मध्यपूर्व देशांमध्ये रुह अफजा प्रचंड लोकप्रिय आहे
जाता जाता : उन्हाळ्याच्या दुपारी साधे व्हॅनिला आइसक्रीम आणायचे आणि त्यात चार थेंब रुह अफजाचे टाकायचे आणि आहा!! म्हणत आत्म्याला आराम द्यायचा हा प्रयोग तुम्ही केलाच असेल.
९. अरविंद लिमिटेड
गुजरात मध्ये महिलांना साडी विकण्यापासून या कंपनीची सुरुवात झाली. पण आज आपण अरविंद लिमिटेड (पूर्वीचे नाव अरविंद मिल्स) ला जीन्स या वस्त्रप्रकारातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखतो. नव्वदच्या दशकात जनसामान्यांमध्ये Ruf and Tuf या नावाने अरविंद मिल्सने जीन्स लोकप्रिय केली. या कंपनीचे Flying Machine, Newport आणि Excalibur हे स्वतःच्या मालकीचे ब्रँड आहेत, तर इंटरनॅशनल लेव्हल वर Arrow, Tommy Hilfiger आणि Calvin Klein या ब्रँड्सचे लायसन्स सुद्धा त्यांनी मिळवले आहे. आज जगातील डेनिम उत्पादनामध्ये अरविंद लिमिटेड आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.
जाता जाता : एकेकाळी पोरांकडून हवं ते काम करवून घेण्यासाठी Ruf and Tuf ही लाच देण्याचं एक नामी चलन होतं.
१० ओल्ड मंक
ना कुठे जाहिरात, ना कुठली प्रसिद्धी… पण गेल्या कित्येक दशकांपासून ओल्ड मंक रम भारतीयांची आवडती रम आहे. बहुतेक सर्वांनीच पिण्याची दिक्षा ओल्ड मंक च्या घोटानेच केली असणार. अतिशय स्वस्त किंमत हा या ब्रँडचा प्लस पॉईंट. १८५५ मध्ये एडवर्ड डायर याने कसौली, हिमाचल प्रदेश येथे मद्यनिर्मिती कारखाना स्थापन केला. हा एडवर्ड म्हणजे जालीयनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार जनरल डायर याचा पिता! स्वातंत्र्यानंतर मोहन मैकिन यांनी या कारखान्याचा ताबा घेतला. १९६० मध्ये ओल्ड मंक बनवली गेली आणि तेव्हापासून आजतागायत मैकिन लिमिटेड या कंपनीचा ओल्ड मंक ब्रँड फक्त भारतीयच नव्हे तर युरोप, उत्तर अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडातील मद्यप्रेमींची तहान भागवत आहे. पण मंडळी, ओल्ड मंक बाबत लोकांना इतकी आपुलकी का वाटते हे बोभाटा सांगू शकणार नाही. जगात अनेक उत्तमोत्तम मद्य उपलब्ध असताना लोक ओल्ड मंकवर इतके प्रेम का करतात!!
जाता जाता : ओल्ड मंक या विषयावर बोभाटाचा हा लेख नक्की वाचा !
ओल्ड मॉंक- जालियनवाला बाग हत्याकांड आणि भारतातल्या पहिल्या रमचं काय कनेक्शन आहे ??
तर असे हे निवडक ब्रँड जे आपल्या आठवणींसोबत जन्मभर जोडले गेलेत. तुमच्या आवडीच्या ब्रँडबद्दल जरूर लिहा आणि बोभाटानी अनेक ब्रँडवर लेख लिहिले आहेत ते पण वाचा.
आणखी वाचा:
२० मार्च!! पाण्याच्या ब्रॅंडला हे नाव देण्यामागे कोणत्या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे?
'पॉलिएथिलीन'च्या गाळापासून बनलेल्या टप्परवेअर आणि Tupperware® होम पार्टीच्या जन्माची कहाणी!!