टायटॅनिक बरोबर जलसमाधी मिळालेल्या १० अमुल्य गोष्टी !!
टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळून आज १५ एप्रिलला १०८ वर्ष पूर्ण होतील. टायटॅनिकबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्यावर एक अप्रतिम सिनेमासुद्धा तयार झाला. टायटॅनिक हा विषयच असा आहे की त्यातून पुढेही अनेक गोष्टी बाहेर पडत राहतील. आज आम्ही अशाच काही गंमतीदार गोष्टी घेऊन आलो आहोत.
टायटॅनिकचं नाव निघालं आणि चित्रपटात दाखवलेला निळ्या रंगातील ‘हार्ट ऑफ ओशन” या हिऱ्याबद्दल बोललो नाही, असं होईल का? आधी ‘हार्ट ऑफ ओशन” बद्दल जाणून घेऊया.
टायटॅनिक सिनेमात हिरोईनच्या गळ्यात एक निळ्या रंगाचा हिरा दाखवलेला तुम्ही पहिला असेल. या हिऱ्याला “हार्ट ऑफ ओशन” म्हणतात. मंडळी, खऱ्या टायटॅनिक जहाजावर देखील हा हिरा होता. पण त्याची गोष्ट आणि सिनेमातील हिऱ्याची गोष्ट थोडी वेगळी आहे.
सिनेमात हा हिरा ‘रोझ’ म्हणजे आपल्या हिरोईनला तिचा होणारा नवरा भेट म्हणून देतो. पण खऱ्या आयुष्यात हा हिरा एका मालकाने आपल्या नोकराणीला दिला होता. ही नोकराणी त्याची भावी पत्नी होणार होती. त्या व्यक्तीचं नाव होतं ‘हेन्री मोर्ले’. हेन्री हा टायटॅनिकवरून त्याची असिस्टंट केट फिलीप हिच्या बरोबर प्रवास करत होता. हा प्रवास खरं तर लपून-छपून चालला होता. दोघांनाही अमेरिकेत जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. हेन्री बुडून मरण पावला, तर केट जिवंत वाचली. ती सुखरूप वाचल्यानंतर तिच्याकडे हा हिरा होता. आज आपण ज्याला 'हार्ट ऑफ ओशन' म्हणतो तसा हा हिरा नव्हता. त्याचं नाव होतं “दि लव्ह ऑफ दि सी’!!
ही झाली आपल्या 'हार्ट ऑफ ओशन'ची खरी गोष्ट! पण अशा अनेक मौल्यवान गोष्टी टायटॅनिकबरोबर समुद्राच्या पोटात निघून गेल्या. त्यातील काही गोष्टी पुन्हा मिळवण्यात यश आलं, तर काही ह्या आजवर मिळू शकलेल्या नाहीत. चला पाहूयात टायटॅनिकसोबत जलसमाधी मिळालेल्या १० मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ते...
१. समुद्रात हरवलेले ७३ वर्ष जुने दागिने
१९१२ साली समुद्राने गिळलेल्या टायटॅनिक जहाजाला ७३ वर्षांनी १९८५ साली शोधलं गेलं. या शोधात तब्बल १२००० फूट खोल समुद्रात एक चामड्याची बॅग सापडली, ज्यात मौल्यवान दागिने ठेवलेले होते. आश्चर्य म्हणजे हे दागिने ७३ वर्षानंतरही अगदी जसेच्या तसे सापडले होते. कातडे कमावण्याच्या प्रक्रियेमुळे चामड्याच्या बॅगेत समुद्रातील सूक्ष्मजीव जाऊ शकले नाहीत आणि दागिने जसेच्या तसे राहिले.
२. रेनॉ कार
मंडळी, टायटॅनिकवरून प्रवास करणारे प्रथम श्रेणीतील माणसं अनेक सुखसोयीच्या गोष्टी घेऊन प्रवास करत होते. असाच एक प्रवासी होता विल्यम कार्टर. विल्यम कार्टरने आपल्या बरोबर चक्क रेनॉ कंपनीची आलिशान ‘Coupe De Ville’ ही कार घेतली होती. दुर्दैवाने त्याचं अमेरिकेत या कारवरून फिरण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. टायटॅनिकबरोबर ही कार देखील बुडाली.
कार तर बुडाली, पण विल्यम कार्टर आणि त्याचं कुटुंब सहीसलामत वाचलं होतं. त्यानंतर त्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम देखील केला होता. २००३ साली अशीच एक रेनॉ कार तब्बल २,६९.५०० डॉलर्सना विकण्यात आली होती.
३. दागिन्यांनी मढवलेले ओमार खय्यामच्या रुबायत असलेलं मौल्यवान पुस्तक
प्रसिद्ध पर्शियन कवी ‘ओमर खय्याम’च्या रुबायत असलेलं पुस्तक देखील टायटॅनिकवरून प्रवास करत होतं. १८६० साली ओमर खय्यामच्या रुबायातचं इंग्रजी भाषांतर Edward Fitzgerald या कवीने केलं. इंग्रजीत पहिल्यांदाच भाषांतर झाल्याने त्या काळात ते प्रचंड प्रसिद्ध झालं. १९११ साली या पुस्तकाची एक खास आवृत्ती काढण्यात आली. ही आवृत्ती खास होती, कारण त्याचा पुठ्ठा हा चामड्याने मढवलेला होता, त्याचबरोबर दागिन्यांनी त्यावर नक्षीकाम करण्यात आलं होतं. ओमर खय्यामच्या रुबायत खऱ्या अर्थाने श्रीमंत करण्यात आलेल्या होत्या.
या आवृत्तीला अमेरिकेच्या एका व्यक्तीने लिलावात विकत घेतलं. पुस्तकाच्या प्रकाशकांनी त्याप्रमाणे पुस्तकाला अमेरिकेला पाठवण्यासाठी टायटॅनिकची निवड केली. शेवटी टायटॅनिक आणि हे पुस्तक कधीही अमेरिकेला पोहोचू शकले नाही.
४. अफूच्या ४ थैल्या
‘जॉन जेकब अॅस्टर चौथा’ हा त्याकाळातील धनाढ्य लोकांमध्ये गणला जायचा. त्याने अफूच्या व्यवसायातून पैसा कमावला. १९०९ साली अफूवर कायदेशीररीत्या बंदी घालण्यात आली. पण अॅस्टरचा हा व्यवसाय त्यानंतरही तेजीत होता. १९१२ साली त्याने टायटॅनिकवरून अमेरिकेला अफू नेण्याचा प्रयत्न केला. पण अफूने भरलेल्या त्याच्या ४ थैल्या समुद्राने गिळंकृत केल्या.
५. ‘स्टेन्वे’ पियानो
हिंदी सेनेमात दिसतात तसे ५ मोठे पियानो टायटॅनिक जहाजावर होते. यातील ३ हे प्रथम श्रेणीतील प्रवाश्यांसाठी खास राखीव ठेवण्यात आले होते. त्या काळातील प्रसिद्ध पियानो उत्पादक कंपनी ‘स्टेन्वे’ ने त्यांची निर्मिती केली होती. हे पाचही पियानो नंतर शोध मोहिमेत जहाजाच्या आत सुस्थितीत सापडले.
६. चिनीमातीची भांडी
टायटॅनिकच्या प्रत्येक श्रेणीत चिनीमातीची वेगवेगळी भांडी प्रवाशांसाठी ठेवण्यात आली होती. टायटॅनिकचा शोध लागल्यानंतर ही भांडी पुन्हा बाहेर आणली गेली. ऐतिहासिक वस्तूंच्या बाजारात या भांड्यांना मोठी मागणी आहे. २०१२ साली झालेल्या एका लिलावात ही भांडी तब्बल १८९ दशलक्ष डॉलर्सना विकण्यात आली.
७. घड्याळ
टायटनिक वरील एका प्रबंधकाचं घड्याळ नंतरच्या शोध मोहिमेत समुद्रात सापडलं. हे घड्याळ २ वाजून १६ मिनिटांवर बंद पडल्याचं दिसून आलं. ही तीच वेळ होती जेव्हा तो प्रबंधक पाण्यात बुडून मेला होता. टायटनिकवरील अनेक गोष्टी आजवर विकल्या गेल्या आहेत. त्यातील सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या वस्तूंमध्ये या घड्याळाचा समावेश आहे. २००८ साली तब्बल १,३०,००० लाख युरोंना हे घड्याळ विकलं गेलं होतं.
८. वॅलेस हार्टलेचं व्हायलीन
टायटॅनिक सिनेमात जहाज बुडत असताना काही व्यक्ती व्हायलीन वाजवू लागतात. हा प्रसंग थोडा फिल्मी असला तरी तो खऱ्या टायटॅनिकच्या कथेवरून घेतला आहे. टायटॅनिक जेव्हा बुडत होतं तेव्हा ‘वॅलेस हार्टले’ नामक व्यक्तीने व्हायलीन वाजवायला सुरुवात केली होती. जहाज बुडत असूनही तो वाजवत राहिला आणि अखेर त्याचा अंत झाला. ही व्हायलीन नंतरच्या काळात समुद्रातून बाहेर काढण्यात आली. ती आता टायटॅनिकचा एक अमूल्य ठेवा बनली आहे.
९. दागदागिने
टायटॅनिक जहाजावर अनेक लहानसहान मौल्यवान गोष्टी होत्या. समुद्रात टायटॅनिक नेमकं कोणत्या जागी आहे याचा पत्ता लागल्यानंतर तिथे असलेल्या अनेक गोष्टींना जगासमोर आणण्यात आलं. यात अनेक दागदागिने होते. हार्ट ऑफ दि ओशनची कथा तर तुम्ही वाचलीत. त्यासारखेच आणखी काही दागिने नंतरच्या काळात समुद्रातून बाहेर काढण्यात आली. या दागिन्यांमध्ये हिऱ्यांच्या ब्रेसलेटचा संग्रह देखील होता. हे ब्रेसलेट लिलावात तब्बल १.७ दशलक्ष युरोंना विकले गेले.
१०. इटलीचा ज्युझेप्पे गारीबाल्डीचा स्वाक्षरी केलेला फोटोग्राफ
टायटॅनिकवरून ‘Emilio Ilario Giuseppe Portaluppi’ हा माणूस अमेरिकेला जात होता. त्याच्याकडे इटालियन राजकारणी आणि सेनानी ज्युझेप्पे गारीबाल्डीचा एक फोटोग्राफ होता, ज्यावर खुद्द गारीबाल्डीची सही होती. हा फोटो जहाजाबरोबर बुडाला. पण एमिलिओ मात्र आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला होता.
मंडळी, अशा प्रकारे टायटनिक बुडाली पण तिने आपल्या बरोबर अनेक गोष्टींना कायमची जलसमाधी दिली.