सिनेमातल्या फाईव्हस्टार हॉटेल्ससारख्या दिसणाऱ्या शाळा भारतात खरोखर अस्तित्वात आहेत, ही घ्या यादी !!
करण जोहरच्या सिनेमांमधली कॉलजेस, कॉलेज कमी आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स जास्त वाटतात. मोठी आणि एकदम पॉश इमारत, कॉलेजबाहेर लागलेल्या महागड्या गाड्या.. हे पाहून अनेकांना वाटते की श्रीमंत निर्माता असल्याने तो तसा सेट तयार करतो. पण भारतात काय एवढी सुंदर शाळा-कॉलेजेस नाहीत असं तुम्हांला वाटत असेल, तर हे खोटं आहे. भारतात अशा पॉश शाळा-कॉलेजेस आहेत. त्यातलीच काही शाळा-कॉलेजेस आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अशा शाळा-कॉलेजमध्ये शिकायला मिळाले असते तर एकदाही बंक मारला नसता.
1) हैद्राबाद पब्लिक स्कूल, बेगमपेठ
या शाळेचे फोटो तुम्ही जर इंटरनेटवर बघितले तर हा एखादा महाल वाटण्याची शक्यता जास्त आहे. पण खरंतर ही शाळा आहे. या शाळेत होस्टेलचीसुद्धा सुविधा उपलब्ध आहे. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १२२ एकरच्या कॅम्पसमध्ये ही शाळा पसरलेली आहे. ही शाळा ब्रिटिशकाळात १९२३ साली बांधण्यात आलीय, म्हणजे लवकरच ती १०० वर्षे पूर्ण करेल. व्हिन्सेंट इस्क असे हिच्या आर्किटेक्टचे नाव. शाळेत ८ घोडे आहेत. मोठ्या स्विमिंगपूलसहित इतर अनेक सवलतीसुद्धा इथे आहेत. इथे एकावेळी १६०० विद्यार्थी शिकतात. हैदराबादचे सातवे नवाब मीर इस्मान अली खान यांनी या शाळेची स्थापना केली होती. तेव्हा मुख्यत्वे इथे नवाब, जहागीरदार, जमीनदारांची मुले शिकत असत.
2) मसूरी इंटरनॅशनल स्कूल.
मसूरी किती सुंदर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तिथे दोन-तीन दिवस राहायला मिळाले तरी किती आनंद होतो. अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी शिकण्याची काय मजा असेल!! ३६ वर्षं जुनं मसूरी इंटरनॅशनल स्कूल हिरव्या पर्वतरांगांमध्ये बांधण्यात आलं आहे. ही शाळा फक्त मुलींसाठी आहे. आधुनिक सोयीसुविधा, शाळेची भव्यता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे इथे शिकणे अनेकांचे स्वप्न असते. शाळेत ऐसपैस लायब्ररी, मोठी लॅब, मेडिकल सेंटर अशा सोयी आहेत.
3) गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल, उटी
या शाळेत वेगवेगळे कोर्सेस आहेत्. व्हिज्युअल आर्ट स्टुडिओ, ऑडिओ व्हिज्युअल थिएटर यांसारख्या सुविधा असलेले गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू काही स्वर्गच आहे. उटीचे डोळ्यात भरणारे सौंदर्य आणि शाळेचे उठावदार कॅम्पस यामुळे इथे शिकणे आनंददायक आहे. हे कॉलेज तब्बल ४६५ एकर जागेत वसलं आहे. गोल्फ, हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस अशा सर्व खेळांसाठी इथे मैदाने आहेत.
4) एसजीविपी इंटरनॅशनल स्कूल, अहमदाबाद
प्रत्यक्षदर्शनी एखाद्या पॅलेससारखी वाटणारी ही शाळा १९९९साली बांधण्यात आलीय. स्पोर्ट्स आणि आध्यात्मिक शिक्षणावर इथे जास्त भर देण्यात येतो. फक्त मुलांना इथे प्रवेश घेता येतो. दिवसाची सुरुवात योगापासून होत असल्याने अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना इथे शिकायला पाठविण्यासाठी उत्सुक असतात.
5) डाली कॉलेज, इंदूर
या कॉलेजची रचना पाहून एखादे पॅलेस पाहत असल्याचाच भास होतो. ब्रिटिश काळात सर हेन्री डाली यांच्या पुढाकाराने ही कॉलेज सुरू झाल्याने त्यांचेच नाव या शाळेला दिले गेले आहे. ११८ एकरमध्ये पसरलेले भव्य दिव्य कॅम्पस आणि दोन कृत्रिम तलाव यांमुळे या कॅम्पसमध्ये एक वेगळीच जान आलेली पाहायला मिळते. मोठी सायन्स लॅब, ऑडिटोरियम, प्रशस्त लायब्ररी अशा सुविधा इथे आहेत. २४ तास इंटरनेट आणि एसी अशा सुविधा असल्यावर कुणाला तिथे शिकण्याचा मोह होणार नाही?
6) सिंदीया स्कुल, ग्वाल्हेर
एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंगमध्ये पहिल्या नंबरात येणारं सिंदीया स्कूल हे भारतातलं सर्वात चांगले बोर्डिंग स्कूल मानलं जातं. इथे मुलांना स्पोर्ट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्यात येते. भारतीय नेव्ही, लष्कर, एअरफोर्स, लोकसभा अशा सर्व क्षेत्रांत या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आपले अनुराग-अभिनव कश्यप बंधू आणि सलमान- अरबाझही याच शाळेत शिकले आहेत.
7) डून स्कूल, देहराडून
देहराडूनच्या हिरवळीने नटलेल्या आणि निसर्गरम्य परिसरात हे बॉईज स्कूल पसरलेले आहे. १९२३ साली तयार झालेला ७० एकरमधील परिसर हा कमालीचा सुंदर आहे. वेगवेगळे अभ्यासविभाग हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते अमिताव घोष तसेच सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठ ज्यांच्या सुटेबल बॉय नावाच्या पुस्तकावर सिरीज येत आहे तेसुद्धा इथे शिकले आहेत. इथली फी वर्षाकाठी तब्बल 10 लाख रुपये आहे.
8) मेयो कॉलेज अजमेर
मेयो कॉलेज इथल्या गोल्फ आणि पोलो खेळांच्या ग्राउंडसाठी प्रसिध्द आहे. मुलांसाठी असलेले हे कॅम्पस इथल्या भव्यता आणि चांगल्या शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. १० मुलांमागे एक शिक्षक अशी इथे पद्धत आहे. याठिकाणी जवळपास २० स्पोर्ट्सचे प्रशिक्षण दिले जाते. काश्मिरचे शेवटचे राजे हरिसिंग, विवेक ओबेरॉय तसेच टिनू आनंद हे इथे शिकले आहेत.
9) आर्मी पब्लिक स्कूल, दगशाई
भारतातल्या सर्वाधिक प्रतिष्ठित शाळांमध्ये या शाळेचा ६ वा क्रमांक लागतो. समुद्रसपाटीपासून २१०० मीटरवर वसलेली ही शाळा ४० एकरांत पसरली आहे. भारतीय सैन्याशी निगडित प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये इथे देशभक्ती वृद्धिंगत होत असते. आर्मीतील बरेच अधिकारी इथून शिकलेले असतात. कमांडो सिनेमा फेम अभिनेता विद्युत जामवालची सुद्धा हीच शाळा आहे.
10) लॉरेन्स स्कूल, सनावर
वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळणारी मुलं इथे शिकायला येत असतात. ब्रिटिश काळात सर हेन्री आणि लेडी होनोरिया लॉरेन्स यांनी या शाळेची स्थापना केली होती. या शाळेचे विशेष महत्व असे की इथे भारतीय सैन्याबद्दल प्रशिक्षण दिले जात असते. या शाळेतले विद्यार्थी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात टॉपवर दिसतील. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग, ओमार अब्दुल्ला, मनेका गांधी, संजय दत्त, प्रीती झिंटा, सैफ अली खान ही यादी खूप मोठी आहे.
11) शेरवूड कॉलेज, नैनिताल
नैनिताल म्हटले म्हणजे सुंदर अशा पर्वतरांगा!! त्यांच्यामध्ये बांधलेले शेरवूड कॉलेजसुद्धा खूप सुंदर आहे. भारतातल्या सर्वात जुन्या कॉलेजेसपैकी हे एक कॉलेज आहे. १९६९ साली डॉ कंडन यांनी प्रसिद्ध अयारपाटा हिलवर हे कॉलेज बांधले. स्पोर्ट्स, संगीत, थिएटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रशिक्षण इथे दिले जाते. अमिताभ बच्चन, राम कपूर, कबीर बेदी सुद्धा याच कॉलेजमध्ये शिकले आहेत.
12) द्रुक व्हाइट लोटस स्कूल, लेह
स्थानिक ठिकाणी द्रुक पद्म कार्पो स्कुल असे याला म्हटले जाते. पद्म म्हणजे कमळ आणि कार्पो म्हणजे सफेद!! स्थानिक लडाखी पद्धतीने या शाळेचे बांधकाम केले गेले आहे. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर लावण्यात आलेले सोलर पॅनल. या शाळेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १४वे दलाई लामा हे या शाळेचे देणगीदार आहेत.
13) बिशप कॉटन स्कूल, शिमला
आशियामधल्या सर्वात सुंदर शाळांमध्ये या शाळेची गणना केली जाते. या शाळेने देशाला अनेक आर्मी ऑफिसर, न्यायाधीश, राजकारणी दिले आहेत. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः शाळेतर्फे सिलॅबस तयार केला जातो तर 9 वी ते 12 वी ICSEचा सिलाबस असतो
तर ही होती भारतातली सर्वात सुंदर शाळा आणि कॉलेजेस. तुम्ही म्हणत असाल इथे महाराष्ट्रातल्या शाळा कुठे आहेत? तर त्या आम्ही मुद्दाम टाकल्या नाहीत. तुम्हाला माहीत असलेल्या महाराष्ट्रातल्या सुंदर शाळा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा.