computer

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जगातील १६ प्राणी : भाग २

आजवरच्या माहितीनुसार पृथ्वी हा सजीव सृष्टी असणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह असावा. पृथ्वीवर जैवविविधता असल्याने अनेक प्रकारचे सजीव आपल्याला पहायला मिळतात. जेव्हा पृथ्वीवर सजीव निर्माण झाले त्यावेळी त्यांचे स्वरूप वेगळे होते. डायनोसॉरस, ऱ्हायनोसॉरस, महाकाय असे आकाराने प्रचंड जीव इथे होते याचेही दाखले मिळाले आहेत.. परंतू भूस्खलन, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, नष्ट होत गेलेले अधिवास इत्यादी कारणांमुळे हे जीव नामशेष होत गेले. कालांतराने पुन्हा जीवसृष्टीचा उदय झाला. हे नवीन सजीव आकाराने लहान व वैविध्यपूर्ण होते. यातच माणसाचाही समावेश होता.

आपल्या इतर सजीवांच्या मानाने विकसित बुद्धी आणि मेंदूच्या जोरावर माणसाने प्रचंड प्रगती केली. आपल्यासाठी अनेक भौतीक सुखसोयी निर्माण केल्या, आपले जीवन संपन्न बनवले. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या सोयीसाठी जंगले तोडली, अनेक प्रकारची प्रदूषणे आणि ग्रीनहाऊस गॅसेस सारख्या हानीकारण आणि पर्यावरण विघातक गोष्टी जन्मास घातल्या. याचा परिणाम होऊन इतर सजीवांपैकी जे जास्त संवेदनशील होते असे अनेक सजीव त्यांच्या संपत गेलेल्या नैसर्गिक अधिवासामुळे एकतर नष्ट झाले किंवा दुर्मिळ झाले किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यांपैकी बरेचसे सजीव केवळ प्राणी नाहीत तर अनेक वनस्पतीही आहेत..आणि त्यातले बरेचसे आपल्या अवतीभवती, शेजारच्या देशांमध्ये, आपल्या देशाच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ आढळणारे सजीव आहेत. असे अनेक प्राणी, ज्यांना आपण तरी पाहिलं असेल, पण आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांना केवळ पुस्तकांतून, चित्रांतून,अँनिमेशनमधून पाहतील. कारण, ते आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोण आहेत हे प्राणी? 

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' ने अशा ५१ संवेदनशील प्राण्यांची यादी केली आहे. त्यातील अनेक प्राणी आपल्या देशात, आपल्या खंडात आढळतात. कोण आहेत हे प्राणी जे जागतिक तापमानवाढीमुळे आणि संपत चाललेल्या नैसर्गिक अधिवासामुळे नष्ट होत आहेत? मागच्या भागात आपण ८ प्राण्यांची यादी बघितली होती. या यादीत आणखी ८ प्राण्यांची नावे पाहूया.

९) Asian elephant (आशियायी हत्ती ) :-

संपत चाललेल्या गवताळ जागा व कमी होत चाललेले जंगलांचे प्रमाण, सुकत चाललेले जलस्त्रोत, हस्तीदंतासाठी होणाऱ्या शिकारी, ह्या कारणांनी आफ्रिकन हत्तींप्रमाणेच आशियायी हत्तींची संख्याही वेगाने कमी होत गेली. याचबरोबर पाण्याची कमतरता आणि तापमानातील बदल यामुळे एकशिंगी गेंड्याप्रमाणेच यांचे अस्तित्वही धोक्यात आहे.

१०) Great white shark (शार्क) :-

मुळचा शिकारी प्रवृत्तीचा हा मासा कँलीफोर्निया, दक्षिण चिली, पूर्व आफ्रीका आणि गँलापॉज या ठिकाणी आढळतो. वाढत्या समुद्री तापमानामुळे आणि पाण्याच्या वाढत्या आम्लतेमुळे शार्कचे खाद्य असणारे व्हाईट फिश आणि इतर समुद्री प्राणी कमी होत आहेत. याचा परिणाम शार्क्स च्या संख्येवरही होत आहे. बदलत्या तापमानाचा शार्कच्या स्थलांतरावर आणि जनन पद्धतीवरही परिणाम होतोच आहे. सततचे स्थलांतर आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे शार्क्सना अवघड जात असल्याने हा शिकारी मासा देखील टप्प्याटप्प्याने संरक्षित प्रजातींमध्ये येवू घातला आहे.

११) Ivory Gull (आयव्हरी गल) :-

ग्रीनलँड व कँनडाच्या समुद्रतटावर आढळणारा हा आर्टिक पक्षी आढळतो. वितळत चाललेल्या बर्फामुळे यांचा अधिवास धोक्यात आला आहे. बर्फामधे लपलेले सी शेल्स आणि फिन मासे हे यांचे मुख्य खाद्य बर्फाच्या वितळण्यामुळे कमी होत आहेत. याबरोबरच त्यांच्या प्रजोत्पत्तीसाठी आवश्यक असणारा बर्फाचा जाड थर आता कमी होतो आहे. या सर्वांमुळे हा समुद्रपक्षी दुर्मिळ झाला आहे.

१२) Hippopotamus (पाणघोडा) :-

लहानपणी पुस्तकात तसेच अँनिमल प्लँनेटमधे दिसणारा हा प्राणी आता अतिशय दुर्मिळ झाला आहे ते त्याच्या संपलेल्या नैसर्गिक अधिवासामुळे. वाढत्या तापमानामुळे आटणारे जलस्त्रोत आणि त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींची कमतरता हे देखील या पाणघोड्यांच्या ऱ्हासाचे कारण बनले आहे.

१३) Orangutan (ओरँगउटान) :-

दक्षिणपूर्व आशियातील जावा, सुमात्रा बेटे ओरँगउटानचं घर आहेत. पण वाढत्या तापमानाचा त्यांच्या जगण्यावरही परिणाम झाला. तपमानवाढीमुळे नैसर्गिक वणव्यांचे प्रमाण वाढले त्यामुळे यांचे अधिवास कमी होत गेले तसेच त्यांचे मुख्य अन्नस्त्रोतही. परिणामी त्यांचा जननदर कमी होऊन ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

१४) Galapagos penguin (गालापागोज पेंग्वीन) :-

अल-निनो सारखी चक्रीवादळे, वाढत्या तापमानामुळे ध्रुवांवरील वितळत चाललेला बर्फ, वाढलेली समुद्राच्या पाण्याची पातळी यांमुळे या पेंग्वीनचा नैसर्गिक अधिवास, त्याचे खाद्य आणि त्याच्या विणीच्या जागा धोक्यात आले. समुद्राच्या पाण्यातील वाढत्या आम्लतेमुळे आख्खी एक सामुद्रीक जीवसाखळीच धोक्यात आली आहे. हा पेंग्वीनही त्या जीवसाखळीचा भाग असल्यामुळे याचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

१५) Blue whale ( निळा देवमासा ) :-

१८८ डेसिबल आवाज क्षमता असणारा हा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा समुद्री जीव. तो ही या ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यातून स्वतःला वाचवू शकला नाही. प्रचंड प्रमाणात वितळत चाललेल्या आर्टिक बर्फामुळे या समुद्रातील जीवांच्या अधिवासांवर, त्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम होत असल्याने ते दुर्मिळ होत चालले आहेत.

१६) Polar bear (ध्रुवीय अस्वले) :-

आर्टिक समुद्रातील हिमनग हे या ध्रुवीय अस्वलांचे नैसर्गिक अधिवास आहेत जे या जागतिक तापमानवाढीमुळे वितळत चालले आहेत. ध्रुवीय अस्वलांचे सारे जीवनच या हिमनगांवर अवलंबून असल्याने वितळत्या बर्फासोबत त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्यातच वितळलेल्या बर्फामुळे समुद्रातील अनेक ठिकाणांवर सुरू झालेला क्रूडऑईल व नैसर्गिक वायूंचा शोध या ध्रुवीय अस्वलांसाठी धोक्याची घंटा आहेत.

 

एकूणच वाढते तापमान, तुटत चाललेली अन्नसाखळी, संपलेले नैसर्गिक अधिवास,जल व अन्नस्त्रोतांची कमतरता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे हे एकापेक्षा एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी काही आपण पाहिलेत तरी पण हे चक्र असंच चालू राहिलं तर आपल्या पुढच्या पिढीला हे सजीव केवळ आणि केवळ पुस्तकातल्या चित्रांतूनच भेटतील.

 

लेखिका: मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required