१७व्या वर्षी घरच्याघरी न्यूक्लिअर रिॲक्टर बनवणारा मुलगा!! त्याचा छंद सगळ्यांनाच किती महागात पडला हे हे वाचा!!
आपल्या मुलांचे हट्ट जगावेगळे असतील तर प्रत्येक आई-वडिलांना चिंता ही वाटतेच. जगावेगळे हट्ट असणारी मुलेच काही तरी जगावेगळे बदल घडवून आणू शकतात हे जरी खरे असले तरी असे हट्ट पुरवताना आणि त्यांचे परिणाम भोगताना अक्षरश: आई-वडिलांच्या नाकी नऊ येतात. याचा पुरावा हवा असेल तर हा लेख नक्की वाचा.
ही गोष्ट आहे १९९८ सालची. आजच्या प्रमाणे त्याकाळी मुलांच्या हाताशी इंटरनेट नावाचा जादूचा दिवा नव्हता. त्यामुळे मुलांना आपल्या उत्सुकतेची भूक भागवायची असल्यास दोनच पर्याय उपलब्ध होते- एक तर पालकांना आणि शिक्षकांना प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडणे किंवा त्या त्या विषयावरील वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके आणून ती वाचून काढणे.
तर डेव्हिड हाही एक असाच पौंगडावस्थेतील मुलगा होता. त्याला रासायनिक प्रक्रिया आणि त्याच्या प्रयोगांबद्दल खूप उत्सुकता होती. डेव्हिडचे आई-बाबा त्याच्या लहानपणीच विभक्त झाले होते. त्याची आई बिचारी माहेरच्या आधारावर कसाबसा आपला आणि डेव्हिडचा खर्च सांभाळत होती. लहानपणापासून विविध प्रयोगात रमलेला डेव्हिड अबोल आणि शांत होता. तो स्वतःच्याच तंद्रीत मग्न असे. डेव्हिडला विविध प्रयोग करण्याची असलेली आवड पाहून त्याच्या आजोबांनी त्याला रसायन शास्त्रातील साध्यासोल्या प्रयोगकृतींचे 'गोल्डन बुक ऑफ केमिस्ट्री एक्स्परिमेंट्स' नावाचे एक पुस्तक आणून दिले.
या पुस्तकामुळे तो त्याच्या छंदात रमत असे. शाळा नसतील त्या दिवशी त्याची मोठ्यांच्या कामातील लुडबुड कमी होत असे. त्याच्या आईला त्याच्या आजोबांनी एक स्वतंत्र घर घेऊन दिले होते. या घराच्या तळमजल्यावर डेव्हिडची प्रयोगशाळा होती. डेव्हिडचा हा छंद तसा फारच खर्चिक होता. त्यामुळे थोडा मोठा झाल्यावर आपल्या त्याला कधी न्यूजपेपर विकून तर कधी फास्टफूड रेस्टॉरंटवर काम करून पैसे कमवावे लागत होते. जेणेकरून त्याच्या या छंदावर त्याला पुरेसा पैसा खर्च करता येईल.
आपल्या मोकळ्या वेळात तो वेगवेगळे प्रयोग करण्यातच व्यग्र असे. कधी कधी त्याच्या या प्रयोगशाळेतून छोटे मोठे स्फोट झाल्याचे आवाजही ऐकू येत असत. पण त्यापासून फार काही धोका झाला नव्हता. मात्र कृत्रिम टॅनिंगचा प्रयोग करत असताना त्याने कँथाझांथिनचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा संपूर्ण चेहरा तांबूस रंगाचा झाला होता. फटाके बनवण्यासाठी त्याने जमवलेल्या मॅग्नेशियमच्या पावडरला आग लागून मोठा जाळ झाला होता. असे छोटेमोठे उपद्रव तो करीत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याची आई त्याच्या या प्रयोगशीलतेच्या आड कधी येत नव्हती. एकदा मात्र त्याने असे काही केले की संपूर्ण प्रयोगशाळेतच आगीचा लोळ उठला आणि त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. राहत्या घराचे नुकसान झाले होते ते वेगळेच!
त्याच्या या वाढत्या उपद्व्यापांना वैतागून त्याच्या आईने राहत्या घराच्या पाठीमागच्या अंगणात एक छोटी खोली बनवून दिली आणि त्याचे हे काही प्रयोग होतील ते तिथेच हेही बजावून सांगितले. यामुळे डेव्हिडला आणखीनच प्रोत्साहन चढले. आता तो काय साहित्य जमा करतो, कोणते प्रयोग करतो यावर कुणाचीही नजर राहणार नव्हती.
१४ व्या वर्षी त्याने लिहिलेल्या 'न्यूक्लिअर रिॲक्टर मॉडेल, न्यूक्लिअर फ्युजन व न्यूक्लिअर एनर्जी' या विषयावर लिहिलेल्या शोधनिंबधाला ॲटॉमिक एनर्जी मेरीट बॅजदेखील मिळाला. या प्रोत्साहनाने त्याला आणखीनच स्फुरण चढले आणि त्यातूनच आपणच एक खरेखुरे न्यूक्लिअर रीॲक्टर का बनवू नये, अशी भन्नाट कल्पना त्याला सुचली. आता तो काय प्रयोग करतो हे पाहण्यास कुणीही नसल्याने त्याने यासाठी हळूहळू साहित्य जमवणे सुरू केले. दोन वर्षात त्याला न्यूक्लिअर रीॲक्टर बनवण्यात यशही आले. पण यासाठी त्याने काय काय शक्कल लढवली ती तरी वाचा.
एका मुलाला न्यूक्लिअर रिॲक्टर बनवण्यासाठीचे साहित्य मिळाले तरी कुठे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. यासाठी त्याने एक आपण फिजिक्सचे प्राध्यापक असल्याचे नाटक केले. त्याने न्यूक्लिअर रेग्युलेटरी कमिशनला पत्र लिहून कळवले की, आपल्याला वेगवेगळे न्यूक्लिअर रिॲक्टर कसे बनवतात, त्याची प्रक्रिया काय असते हे पाहायचे आहे. विविध किरणोत्सर्गी पदार्थांचे विलगीकरण कसे करतात हेही पाहायचे असल्याचे त्याने आवर्जून कळवले. वेळोवेळी त्याने या कमिशनशी पत्राद्वारे संपर्क करून त्याला हव्या त्या विषयावरची माहिती जमवली. किरणोत्सर्गी पदार्थ मिळवण्यासाठी त्याने विविध सरकारी संस्थांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून नमुन्यादाखल म्हणून ते पदार्थ मागवून घेतले. याच पद्धतीने त्याने २०० स्मोक डिटेक्टर्सही मिळवले.
मोठ्या प्रमाणात लिथियम जमवण्यासाठी त्याने १००० बॅटरीज विकत घेतल्या आणि त्यातील लिथियम काढून घेतले. डार्क क्लॉक आणि कॅम्पिंग लँटर्नमध्ये त्याकाळी थोड्याफार प्रमाणात रेडियम वापरले जात असे. त्यामुळे ते अंधारातही चमकत असत. त्याने खूप डार्क क्लॉक आणि कॅम्पिंग लँटर्न जमवून त्यातून रेडियम मिळवले. झेकोस्लोव्हेकियामधून त्याने युरेनियम मागवले. त्याच सुमारास सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्याने युरेनियम मिळवणे त्याकाळी खूप सोपी बाब होती.
अशी सगळी जमवाजमव झाल्यानंतर त्याचा न्यूक्लिअर रिॲक्टर एकदाचा बनून तयार झाला. या रिॲक्टरमुळे आजूबाजूच्या वातावरणातील किरणोत्सर्ग अचानकच वाढला. आपल्या या प्रयोगामुळे आपण आपल्या शेजाऱ्यांना धोक्यात घालतोय हे लक्षात आल्यावर तो गडबडीने हा रिॲक्टर निष्क्रिय करण्याच्या कामाला लागला.
त्या दिवशी तारीख होती ३१ ऑगस्ट १९९४ आणि पहाटे पावणे तीनच्या दरम्यान डेव्हिड या न्यूक्लिअर रिॲक्टरचे एकेक भाग काढून आपल्या गाडीत भरत होता. त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्या हालचाली विषयी शंका आली आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस आल्यानंतर डेव्हिडने सांगितले की त्याच्या गाडीत रेडीओॲक्टिव्ह पदार्थ आहेत आणि पोलीस गाडीच्या जवळ गेल्यास त्यांना धोका निर्माण होईल. रेडीओॲक्टिव्ह नाव ऐकताच पोलीस एकदम चक्रावून गेले. त्यांना वाटले हा मुलगा आपल्या गाडीत ॲटॉमिक बॉम्ब वगैरे लपवतोयकी काय. मग पोलिसांनी बॉम्ब स्क्वाडला पाचारण केले आणि डेव्हिडला अटक केली. त्या परिसरातील संपूर्ण न्यूक्लिअर मटेरीअल काढून टाकल्याशिवाय त्या परिसरात कुणीही फिरकायचे नाही असा नियम लागू करण्यात आला. डेव्हिडने गोळा केलेले ते पदार्थ निष्क्रिय करण्यासाठी अधिकाऱ्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला.
त्याच्या या अचाट प्रयोगामुळे त्याच्या शरीरावर काही परिणाम झाला आहे का हे तपासण्यासाठी न्यूक्लिअर रेग्युलेटरी कमिशनने त्याला तपासणीसाठी बोलावले होते. पण का कुणास ठाऊक, डेव्हिडने अशा चाचणीला नकार दिला. पुढे त्याचा हा छंदही मागे पडला आणि तो अमेरिकेच्या नौदलात भरती झाला. यावरून अर्थातच त्याच्या शरीरावर कोणतेही घातक परिणाम झाले नव्हते हे सिद्ध झाले.
नौदल अधिकारी म्हणून त्याने चार वर्षे काम केले आणि २०१६ साली वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी डेव्हिड मरण पावला. दुर्दैवाने डेव्हिडच्या मृत्यूचे कारण शत्रूची गोळी किंवा त्याने तरुणपणी केलेला किरणोत्सर्गाचा प्रयोग नव्हता. तर तो विषारी दारू प्यायल्याने मरण पावला. त्याच्या मृत्यूचे हे कारण अधिक दुर्दैवी होते.
मुले व्यग्र राहतात म्हणून त्यांना त्यांचे छंद करू देणे किती महागात पडू शकते हे डेव्हिड हनच्या या गोष्टीवरून लक्षात येते. मुलांचे छंद जरी त्यांना रमवण्यात मदत करत असले तरी त्याचे बरे-वाईट परिणाम समजावून घेण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी पालकांशी असलेला संवाद अधिक महत्वाचा आहे.
मुलांना त्यांचे छंद जोपासण्याचे स्वातंत्र्य देतानाच हेही लक्षात घ्यायला हवे, नाही का?
मेघश्री श्रेष्ठी