computer

भारताने चीनच्या नाकावर टिच्चून तयार केलाय आसामचा पूल....वाचा ५ महत्वाच्या गोष्टी !!

तब्बल २१ वर्षांनी ब्रम्हपुत्र नदीवरील बोगीबील पूल बनून पूर्ण झाला आहे. आज २५ डिसेंबर रोजी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडेल. हा पूल महत्वाचा का आहे याची अनेक करणं सांगता येतील, पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे “सीमा सुरक्षा”. या पुलापासून अगदी जवळच अरुणाचलप्रदेशला खेटून भारत-चीन सीमा आहे. त्यामुळे हा पूल चीनच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

चला तर आता जाणून घेऊया बोगीबील पुलाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी :

१. बोगीबील पूल ४.९४ किलोमीटर लांबीचा आहे. पूल बांधण्यासाठी ५,९०० कोटी रुपये एवढा खर्च आला.

(वेंबनाड रेल्वे पूल)

२. आजवर केरळचा ‘वेंबनाड रेल्वे पूल’ (४.६२ किमी) हा भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल होता, पण बोगीबील पुलाने नवा विक्रम केला आहे.

३. हा पूल डबल डेकर असल्याने एकाचवेळी रेल्वे आणि गाड्या एकत्र प्रवास करू शकणार आहेत. वरच्या मजल्यावर गाड्यांसाठी तीन पदरी रस्ता आहे तर खाली दोन रेल्वे मार्ग बनवण्यात आलेत.

४. बोगीबील पूल ब्रम्हपुत्र नदीच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडतो. पुलामुळे आसामचं डिब्रूगढ आणि अरुणाचलप्रदेशच्या धेमाजी जिल्ह्यातलं अंतर कमी झालं आहे. आता जर आसाम ते अरुणाचलप्रदेश पर्यंतचा प्रवास करायचा झाला तर तब्बल १० तास वाचतील. हे अंतर आता ५०० किमी वरून अवघ्या १०० किमीवर आले आहे.

५. बोगीबील पूल हा भारतीय सैन्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आसाम ते अरुणाचलप्रदेश जवळ असलेल्या सैन्याच्या तळापर्यंतचं अंतर आता ३ ते ४ तासांनी कमी होईल. पुलाची बांधणी एवढी भक्कम आहे की पुलावरून सैन्याचे अवजड टँक्स सहज प्रवास करू शकतील.

मंडळी, याखेरीज आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोगीबील पूल भागात पाऊस आणि भूकंपाचा धोका लक्षात घेऊन पुलाची रचना करण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने तसेच वेळोवेळी पुलाच्या बांधकामात, तंत्रज्ञानात बदल केल्याने पूल बांधून पूर्ण व्हायला २१ वर्षांचा कालावधी लागला. ब्रम्हपुत्र नदीच्या पत्रात पूल तयार करणं सोप्पं काम नव्हतं.

मंडळी, अशारीतीने अखेर बोगीबील पूल तयार झाला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे.   

सबस्क्राईब करा

* indicates required