यवतमाळमध्ये ६,००० वर्षे जुना खडक सापडलाय...विदर्भाच्या इतिहासाबद्दल कोणत्या नव्या गोष्टी समोर आल्या आहेत?
जमिनीखाली गाडल्या गेलेल्या कोणत्या पुरातन वस्तू केव्हा सापडतील याचा काहीच नेम नसतो. नुकतेच यवतमाळ जिल्ह्यात असेच घडले. या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असतात तब्बल ६ कोटी वर्ष जुने बेसाल्ट खडकाचे खांब सापडले आहेत.
हे दुर्मिळ खडक शिबला- पार्डी गावाजवळ सापडले आहेत. पर्यावरण आणि भूगोलतज्ञ सुरेश चोपाने यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, हा दुर्मिळ खडक कोलमनार बेसाल्ट म्हणून ओळखला जातो. ६ कोटी वर्षांपूर्वी प्रचंड मोठ्या ज्वालामुखीच्या लाव्हांपासून या खडकाची निर्मिती झाली होती. लाव्हाच्या आकुंचनाने हे षटकोनी खडक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
चोपाने हे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या रिजनल इम्पॉवरमेन्ट समितीचे सदस्य होते. त्यांच्यामते यवतमाळ जिल्ह्यातील वणी हा भाग भौगोलिकदृष्ट्या प्रचंड पुरातन आहे. त्यांनी पुढे म्हटले की, 'याच भागात मला गाळापासून बनलेला २ कोटी वर्षे जुना स्ट्रोमेटोलाईटचा शोध लावला होता.
विशेष म्हणजे ते सांगतात की, 'आजचा विदर्भ हा कधीकाळी समुद्र होता. पण ६ कोटी वर्षांपूर्वी क्रेटेशियस काळाच्या शेवटी काही भौगोलिक घटना पृथ्वीवर घडल्या आणि पश्चिम घाटातला लावा आताच्या यवतमाळ जिल्हा असलेल्या ठिकाणी आला. यालाच डेक्कन ट्रॅप असे म्हटले जाते.'
या ज्वालामुखीने मध्य भारतातील जवळपास ५ लाख चौरस किमीचा परिसर व्यापला होता. याच कारणाने या भागातील ८० टक्के खडक हा बेसाल्ट प्रकारातील आहे. चोपाने सांगतात की, कर्नाटकातील सेंट मेरी आयलँड हे याच कोलमनार बेसाल्टसाठी प्रसिद्ध आहे.
जेव्हा अतिशय गरम लावा हा नदीत वाहत जाऊन थंड होतो तेव्हा तो संकुचित होऊन अशाप्रकारचे षटकोनी खडक तयार होतात. याआधी हे खडक नांदेड, मुंबई आणि कोल्हापूर येथे सापडले आहेत. चोपाने यांनी दिलेली महत्त्वाची माहिती म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यात आधी डायनॉसोर सारख्या प्राण्यांचा अधिवास होता. तसेच तिथे घनदाट जंगल होते. पण ज्वालामुखीमुळे या सगळ्यांचा नाश झाला.
पृथ्वीच्या भूगर्भातून सापडणाऱ्या गोष्टी आपण राहतो त्या ठिकाणाबद्दल नवीनच माहिती देऊन जातात. या खडकांच्या निमित्ताने यवतमाळ आणि पर्यायाने विदर्भ यांच्याबद्दल नवीनच माहिती मिळाली आहे. पुढे जाऊन आणखी काय काय हाती लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.