computer

बोभाटा सल्ला: IPO, प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटची गुंतागुंत काय आहे? नक्की कशात केव्हा आणि किती पैसे गुंतवावेत?

प्रिय वाचक, गेल्या आठवड्यात फोमो आणि टीना या दोन मानसिक प्रवाहांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम वाचलाच असेल. नव्याने स्टॉक मार्केटची दिक्षा घेणार्‍यांना मार्केटमधले जुने जाणते लोक एक सल्ला नेहेमी देतात, ते असा की थेट सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रायमरी मार्केटचा अनुभव घ्या. आता प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय ते दोन ओळींत समजून घेऊ या आणि नंतर मूळ मुद्द्याकडे वळू या.

कोणत्याही नव्या कंपनीला भाग भांडवल उभे करायचे असते तेव्हा ती कंपनी इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्ज मागवते. त्या अर्जातून काहीजणांना समभाग मिळतात, तर काहींना मिळत नाहीत. ज्यांना समभाग मिळत नाहीत त्यांचे पैसे लगेच परत मिळतात. हे झाले प्रायमरी मार्केट. यामध्ये जोखीम बरीच कमी असते. पण गुंतवणूकीची चव चाखण्याचा हा सोपा मार्ग समजला जातो. 

समभाग स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत झाल्यावर त्याची खरेदी-विक्री सुरु होते. या नोंदणीला 'लिस्टींग' असे म्हणतात. स्टॉक मार्केटमध्ये त्याधीचे हजारो शेअर्स विकले-घेतले जात असतातच. त्यांच्या पंगतीत नव्या कंपनीचे समभाग जाऊन बसले की बाजाराच्या इच्छेने भाव वर खाली होत राहतात. याला म्हणतात सेकंडरी मार्केट! 
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर प्रायमरी मार्केट म्हणजे शाळेत प्रवेश मिळणे आणि सेकंडरी मार्केट म्हणजे प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसणे.

'लिस्टींग'  झाल्यावर समभाग अर्जाच्या किमतीच्या अधिक भावात विकला गेला तर त्वरीत फायदा दिसू लागतो. तो मिळवणे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून असते. आधी सांगीतल्याप्रमाणे प्रायमरी मार्केटमध्ये जोखीम कमी असते म्हणून नव्या गुंतवणूकदारांचा हा 'के. जी'चा वर्ग समजला जातो. 

जेव्हा बाजार तेजीत असतो असतो तेव्हा बाजारात भरपूर पैसा वाहत असतो. त्याचा फायदा घेऊन अनेक नव्या कंपन्या बाजारात आयपीओ म्हणजे 'इनिशिअल पब्लिक ऑफर'द्वारे भांडवल उभे करतात. मनात आलं आणि भांडवल उभे केलं असा हा प्रकार नसतो. कंपनीला त्याआधी अनेक महत्वाच्या चाचण्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी सगळ्यात महत्वाची चाचणी 'सेबी'या सरकारी संस्थेची असते. सेबीची मान्यता मिळाली की आयपीओ म्हणजे खुली ऑफर बाजारात आणता येते.

येत्या काही दिवसांत बर्‍याच कंपन्या भांडवल उभे करण्यासाठी बाजारात येत आहेत. त्यापैकी आज म्हणजे १४ जून रोजी ज्या कंपन्यांना तुम्ही अर्ज करू शकाल त्यांची नावे अशी आहेत.

 

१. श्याम मेटालीक्स लिमिटेड एंड एनर्जी लिमिटेड

२. सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जींग्ज.

कंपन्याच्या आयपीओसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा असतो ते आधी बघूया आणि त्यानंतर बाजाराचे काय मत आहे ते समजून घेऊया. सेबीच्या नियमाप्रमाणे अर्ज करणे किंवा न करणे यामध्ये 'बोभाटा' स्वत:चे मत देऊ शकत नाही.  

१. आयपीओचा साइझ म्हणजे किती भांडवल कंपनी जमा करते आहे: आयपीओ फार मोठा असला की गुंतवणूकदारांची संख्या जास्त असते. समभाग विपुल प्रमाणात विक्रीस येऊ शकतात. अशावेळी अर्जातला भाव आणि  बाजारातला भाव यामध्ये मोठी तफावत दिसून येत नाही. त्वरीत नफ्याचे प्रमाण कमी असते. दीर्घ मुदतीत काय होईल हे या घटकेस सांगणे अयोग्य असते. जमेची बाजू अशी असते की समभागाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो.

२. प्राइस बँड: समभाग वाटताना ते कोणत्या किमतीत दिले जातील याचा अंदाज दिलेला असतो. हा अंदाज म्हणजे प्राइस बँड उदहरणार्थ श्याम मेटालीक्सचा बँड ३०३ ते ३०६ असा आहे. सोना फोर्जींग्जचा बँड २८५ ते २९१ असा आहे. 

३. लॉट साइझ आणि रिझर्वेशन : एका अर्जात किती प्रमाणात अर्ज करायचा याचा आकडा म्हणजे लॉट साइझ.  मोठा लॉट साइझ म्हणजे गुंतवणूकदाराला अर्जामागे जास्त पैसे भारावे लागतात. जर लॉट साइझ कमी असला तर अर्ज करणार्‍यांची संख्या जास्त असते. या दोन्ही कंपन्यांचे लॉट साइझ अनुक्रमे ४५ आणि ५१ असे आहेत. लॉट छोटे आहेत. गुंतवणूक कमी होईल. रिझर्वेशन म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदारांना दिले जाणारे भांडवलाचे हिस्से. हे प्रमाण जेवढे जास्त त्या प्रमाणात समभाग गुंतवणूक योग्य समजला जातो. श्याम मेटालिक्स या कंपनीत ५०% तर सोना फोर्जींग्ज या कंपनीत ७५% भांडवल राखीव आहे.
 
४. भांडवल कशासाठी? आयपीओद्वारे उभे केलेले भांडवल कशासाठी वापरले जाणार आहे हे पण कंपन्या सांगत असतात. काही कंपन्या डोक्यावर असलेले कर्ज कमी करण्यासाठी तर काही कंपन्या नव्या उद्योगाच्या उभारणीसाठी पैसे उभे करत असतात. जर कर्जफेडीसाठी पैसे वापरले जाणार असतील आणि कंपनी फायद्यात असेल तर व्याजाचा बोजा कमी होऊन नफा वाढतो. जर कंपनी नव्या उद्योगासाठी पैसे उभे करत असेल तर नफा दिसण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. या दोन्ही कंपन्या पैशाचा विनियोग कर्ज कमी करण्यासाठी करणार आहेत. 

५.  कंपनीचे प्रमोटर आणि आर्थिक घडी : भांडवल जरी लोकांचे असले तरी ते वापरण्याचे अधिकार मॅनेजमेंटकडे असतात. मॅनेजमेंटमध्ये असलेल्या प्रमोटरची बाजारातील पत आणि आर्थिक व्यवहाराची शिस्त कंपनीचा भविष्यकाळाठरवत असते. याखेरीज सध्याच्या तारखेस कंपनीची आर्थिक घडी कशी आहे यावरही लिस्टींगनंतर बाजारात तेजी मंदी दिसते. या दोन्ही कंपन्यांच्या व्यवहाराबद्दल बाजारात सध्या वावगे बोलले जाताना दिसत नाही. सोबतच दोन आणखी मुद्दे महत्वाचे असतात, एक म्हणजे कंपनीचे सध्याचे प्लस आणि मायनस मुद्दे , दुसरा मुद्दा स्ट्रॅटेजी म्हणजे कंपनीची पुढील वाटचालीचा नकाशा! या दोन्ही मुद्द्यावर दोन्ही कंपन्यांचा म्हणजे श्याम मेटालिक्स आणि सोना फोर्जींग्ज सक्षम दिसत आहेत असा बाजारात मतप्रवाह आहे.
 
६. ग्रे मार्केट : आयपीओचे समभाग लिस्टींग होण्यापूर्वीच त्यांचा अनधिकृत व्यवहार बघायला मिळतो. त्याला ग्रे मार्केट ट्रेडींग म्हणतात. त्यात भाग घेऊ नका, पण ग्रे मार्केटचे भाव समभाग लिस्टींग झाल्यावर किती फायदा देऊ शकतील याचा अंदाज देऊ शकतात. 

७. या सर्व आयपीओचे अधिकृत प्रॉस्पेक्टस सेबीच्या संकेतस्थळावर वाचायला मिळतात, पण ते शेकडो पानांचे असतात. सोपा मार्ग म्हणजे 

- तुमच्या ब्रोकरचा सल्ला घेणे.
-सेबी अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे
-अर्ज बारकाईने वाचणे.
-वर्तमानपत्रातील विवेचन वाचणे 
- आंतरजालावर अनेक मतप्रदर्शने आणि रेटींग असतात ती वाचून निर्णय घेणे. 


  या दोन दिवसात अर्ज केल्यानंतर २२ ते २४ जून पर्यंत समभागाची वाटणी -लिस्टींग झालेले असेल. तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर आमच्या शुभेच्छा आणि समभाग मिलाल्यावर नफा झाला तर बोभाटाला पार्टी द्यायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required