महाराष्ट्रातील या ८ लेण्यांना भेट द्यायलाच हवी....यादी पाहून घ्या !!
हळूहळू निर्बंध कमी झाले आणि सर्वांची मुशाफिरी सुरू झाली. हवेत मस्त गारवा जाणवू लागल्याने सगळ्यांना जवळपासची ठिकाणे खुणावू लागली आहेत. गेले नऊ महिने घरात अडकलेल्या आणि कंटाळलेल्या ट्रेकर्सना आता वेध लागले आहेत नवनव्या जागांना भेटी देण्याचे. लॉंग विकेंड आला की कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन ठरत असतो. पण नक्की कुठे जायचे? हे अनेकदा ठरत नसते. म्हणूनच बोभाटाच्या वाचकांसाठी आजचा खास लेख घेऊन येत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्यांविषयी जिथे सुट्टीत एखादी भेट सहज ठरवता येईल ...
महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास लेण्यांमध्ये दडलेला आहे. पण लेणी म्हणजे नक्की काय? तर लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंध व कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघता येतात.
लेणी म्हणलं की सर्व प्रथम नाव येतं ते महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जवळच्या अजिंठा-वेरूळ येथील लेण्यांचं. अजिंठा वेरूळ येथे जगभरातून पर्यटक दरवर्षी भेट द्यायला येतात. येथील लेण्याने भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे
अजिंठा (औरंगाबाद)
अजिंठ्यात एकूण ३० लेणी आहेत. त्यातील काही लेणी खूपच अप्रतिम आहेत. अजिंठ्यातली लेणी चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत. सह्याद्री पर्वताजवळ वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. एकूण ३० गुहांचा समावेश असणार्या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धपंथीय लेणींचा समावेश आहे. या डोंगररांगेतील बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे.
वेरूळ (औरंगाबाद)
'आधी कळस मग पाया' या संकल्पनेवर बांधलेल्या कैलास मंदिरामुळे हे लेणं जगभरात प्रसिद्ध आहे. औरंगाबादपासून सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळ लेणी वसली आहेत. भारतीय पर्यटक तर वेरूळला भेट देतातच पण परदेशी विद्यार्थी आणि अभ्यासक देखील येथे अभ्यास करायला येतात.
कार्ला (पुणे)
मुंबई-पुणे च्या अगदी जवळ असलेले या प्रसिद्ध लेणी आहेत. बौद्ध भिक्षुंनी ही लेणी कोरली आहेत. इ.स.पू. ३ रे व २ रे शतक या काळात थरवेदा या बौद्ध भिक्षूने लोणावळ्याजवळील निसर्गरम्य भागात या लेण्यांची निर्मिती केली. भारतात काही मोजक्या दगड कापून तयार करण्यात आलेल्या लेण्यांमध्ये या लेण्यांचा समावेश होतो.
पांडव लेणी (नाशिक)
पांडव लेणी या नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’ या नावानेच ओळखल्या जाणार्या डोंगरावर आहेत. यामध्ये एकूण २४ लेणी असून त्या सर्व बौद्ध धर्मीय आहेत. १२०० वर्षांपूर्वी हे लेणे कोरले गेले. या लेण्यांमध्ये असणार्या गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना स्थानिक जनता पाच पांडवांच्या मूर्ती समजते. त्यामुळे कदाचित या लेण्यांना पांडव लेणी म्हणत असावेत. पांडव या लेण्यामध्ये काही दिवस राह्यले होते असेही मानले जाते.
एलिफंटा (मुंबई)
मुंबईपासून ११ कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर ही लेणी आहेत. इ.स. ३ ते इ.स. ७ या काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी. या लेणींमधील अकरा हात उंचीची तीन मुखे असलेली शिवाची मूर्ती जगातील सर्वात भव्य आणि सुंदर आहे. अर्धनारीनटेश्वराची मूर्तीदेखील या ठिकाणी बघायला मिळते. या लेणींचा शोध लागला तेव्हा इथे एका हत्तीचे शिल्पही होते. या शिल्पावरूनच या लेण्यांना ‘एलिफंटा केव्ह्ज’ हेही नाव मिळाले. या लेण्यांचा ‘जागतिक वारसा’ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये समावेश झाला आहे.
कान्हेरी(मुंबई)
मुंबईमध्ये बोरिवली येथे कान्हेरीच्या लेणी वसली आहेत. इ.स. पू. १ ले शतक ते इ.स. ९ वे शतक या काळात या लेण्यांची निर्मिती झालेली आहे. बेसॉल्ट खडकावर या लेणींची निर्माण करण्यात आली आहेत. इथे १०९ छोटी-छोटी लेणी आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात या लेण्या आहेत. या लेण्यांच्या पायथ्याशी-सभोवताली दाट जंगल असल्याने हे पर्यटकांचे खूप आवडते ठिकाण आहे.
कुडे लेणी (मुरुड)
कुडे मांदाड ही बौध्दकालीन लेणी मुरूड शहरापासून केवळ २५ किमी. अंतरावर आहेत. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी समुद्रसपाटीपासून २०० फुट उंच असून एका डोंगर रांगेत इस १८४८ साली या लेण्यांचा शोध लागला. तेथे एक भव्य स्तूप आहे. लेण्यांच्या सुरूवातीला असलेले खांबदेखील खूप बघण्यासारखेच आहेत. येथील ऐतिहासिक पाण्याची टाकीही पाहण्यासारखी आहे.
लेण्याद्री (जुन्नर, पुणे)
अष्टविनायकपैकी एक स्थान म्हणून लेण्याद्री सर्वाना परिचित असेल. जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह आहे. जवळपास ३२५ कोरीव लेणी तिथे आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप आहेत आणि तीन बाजूंना वेगवेगळे वीस कक्ष (खोल्या) आहेत. भिंतीतील दोन कक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला आहे. तिथे “गिरीजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज" नावाने ओळखला जातो.
याशिवाय महाराष्ट्रात भाजे (पुणे), जिंतूर ( परभणी), बेडसे ( पुणे), हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर या ठिकाणी देखील हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय लेणी आहेत. इतिहासाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की तत्कालीन राज्यकर्त्यांनी शिल्पकलेच्या विकासाला चालना दिली. तो वारसा आता जपण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. त्यामुळे नेहमीची पर्यटन स्थळ सोडून या लेण्यांनाही सुटीत भेट देऊन पुढच्या पिढीला ही याचे महत्व पटवून देऊयात काय? तुम्ही कोणत्या लेण्यांना भेट दिली आहे? तुमचा अनुभव कसा होता हे आम्हालाही कमेंटमधून कळवा.
लेखिका: शीतल अजय दरंदळे