computer

भारतातल्या पायऱ्यांच्या ८ प्रसिद्ध विहिरी- हे स्थापत्य कलेचे अप्रतिम नमुने बघितलेत का??

आज पाण्याचा साठा करण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. पूर्वी अशी साधनं नव्हती, म्हणून विहीर अत्यंत महत्त्वाची  होती. जवळपास नदी किंवा अन्य नैसर्गिक स्रोत नसल्यास  पाण्याचा जो काही स्रोत असायचा तो म्हणजे विहीर. भारतात या विहिरींना कालांतराने वेगळं स्वरूप मिळालं. विशेषतः गुजरात आणि राजस्थान सारख्या पाण्याचा अभाव असलेल्या भागात विहिरी आणि स्थापत्यकला यांचा सुंदर मिलाफ बघायला मिळतो. अनेक पायऱ्या, शिल्पांनी सजवलेल्या भिंती आणि कुशलतेने केलेलं कोरीवकाम असं विहिरींना स्वरूप मिळालं. आता ही भारतातली एक महत्त्वाची ऐतिहासिक ठेव बनली आहे. गुजरातच्या ‘राणी की बांव’ विहिरीला तर युनिस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिलं आहे.

आजच्या लेखात आपण भारतातल्या ८ महत्त्वाच्या पायऱ्यांच्या विहिरींची ओळख करून घेणार आहोत.

१. चांद बावडी, आभानेरी - राजस्थान

राजस्थानच्या जयपूरजवळच्या आभानेरी गावात चांद बावडी आहे. या विहिरीचं बांधकाम राजा चांदने केलं. त्याच्याच नावावरून विहिरीला चांद बावडी नाव मिळालं. नवव्या शतकात विहिरीच्या बांधकामाला सुरुवात झाली.पुढे मुघल काळात विहिरीचा वरचा भाग तयार करण्यात आला.

जास्तीतजास्त पाणी सहजपणे काढता यावं म्हणून विहिरींचा आकार मोठा ठेवण्यात आला होता. चांद बावडीत १३ माजले असून तब्बल ३५०० पायऱ्या आहेत. २०१२ साली आलेल्या ‘द डार्क नाईट रायझेस’ सिनेमात एका दृश्यात चांद बावडी दिसली होती.

 

कसे जाल ?

आभानेरी हे जयपूरपासून ९५  किलोमीटरच्या अंतरावर आहे. आभानेरीला पोहोचायला जयपूर येथून टॅक्सी आणि मिनीबसची व्यवस्था आहे.

२. राणी की बाव, पाटण – गुजरात

११व्या शतकात राजस्थान आणि गुजरातवर राज्य करणाऱ्या चालुक्य साम्राज्याची साक्ष देणारी वास्तू म्हणजे ‘रानी की वाव’. चालुक्य राजा ‘राजा भीम पहिला’ याच्या आठवणीत त्याच्या राणीने स्मारक रूपाने ही विहीर बांधली होती. विहिरीचं बांधकाम अत्यंत कलात्मकतेने करण्यात आलं आहे. विहीर बांधणीतले बारकावे आणि आतील शिल्पांमुळे ही विहीर म्हणजे कलेचा उत्तम नमुना ठरते.

१८९० साली सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे राणी की बाव पूर्णपणे मातीने झाकली गेली होती. १९४० साली विहीर पुन्हा शोधण्यात आली. १९८६ साली विहिरीचं जतन करण्यात आलं. २०१४ ला युनेस्कोने राणी की बावला जागतिक वारसा यादीत दाखल केलं आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या १०० रुपयांच्या नोटेवर राणी की बावचं चित्र आहे.

 

कसे जाल ?

पाटण हे अहमदाबादपासून वायव्येला १३० किलोमीटरवर आहे. अहमदाबादमधून टॅक्सीने ३ तासात पाटणला पोहोचता  येतं. शिवाय बसची व्यवस्थाही आहे.

३. अग्रसेन की बावली, दिल्ली

‘अग्रसेन की बावली’ विहीर तुम्ही ‘पिके’ सिनेमात बघितली असेलच. नवी दिल्लीच्या जंतरमंतर भागात शहराच्या मधोमध ही विहीर आहे. या विहिरीचं बांधकाम कोणी केलं याबद्दल वाद आहेत. असं म्हणतात की राजा अग्रसेनने विहीर बांधली म्हणून त्याच्या नावावरूनच विहिरीला ‘अग्रसेन की बावली’ म्हटलं जातं.

संशोधनानुसार आज आपण जी अग्रसेन की बावली बघतो ती १४ व्या शतकातील तुघलक काळात बांधली गेली असावी.

 

कसे जाल ?

ही विहीर नवी दिल्लीच्या मधोमध आहे. दिल्लीच्या कोणत्याही भागातून इथे सहज पोहोचता येऊ शकतं.

४. अडालज बावली, अदालाज गुजरात

‘अडालज बावली’ ‘गुजरातच्या गांधीनगर जवळ असलेल्या अडालज गावात आहे. या विहिरीचं बांधकाम राणी की बाव इतकंच सुरेख आहे. आतील संपूर्ण वास्तू ही हिंदू  पद्धतीची आहे, पण ती बनवली मुहम्मद बेगडा (१४५८-१५११) या मुसलमान सुलतानाने. असं म्हणतात की तिथल्या राजाचा पराभव केल्यानंतर त्याच्या विधवेचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने ही विहीर पूर्ण केली. विहिरीचं बांधकाम त्याला एवढं आवडलं की पुन्हा अशी वास्तू बनू नये यासाठी त्याने विहीर बनवणाऱ्या कारागिरांना मारून टाकलं.

कसे जाल ?

अहमदाबाद येतून टॅक्सी आणि रिक्षाने ३० मिनिटात अडालजला पोहोचता येतं.

५. हम्पीची पुष्करणी, कर्नाटक

ही विहीर नसून कुंड म्हणजे पुष्करणी आहे. या कुंडाची बांधणी उत्तर भारतात आढळणाऱ्या पायऱ्यांच्या विहिरी सारखी आहे. कर्नाटकात अशा प्रकारच्या पुष्करणी मंदिराच्या भागात पूजा विधींसाठी बांधलेल्या आढळतात. हम्पीच्या प्रसिद्ध विजयनगर साम्राज्याच्या अवशेषात आढळणारी पुष्करणी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.

कसे जाल ?

कर्नाटकच्या ‘होस्पेट’ रेल्वे स्थानकावरून बसने हम्पी पर्यंत जाण्याची सोय आहे.

६. राजों की बावली, दिल्ली

दिल्लीच्या २०० एकरमध्ये पसरलेल्या ‘मेहरौली पुरातत्व पार्क’मध्ये ‘राजों की बावली’ आहे. या पार्कमधल्या १०० पेक्षा जास्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये या विहिरीचा समावेश होतो. लोधी साम्राज्यातील दौलत खान या सुभेदाराने ही विहीर बांधली. विहिरीचं बांधकाम हे मुख्यत्वे इस्लामिक परंपरेतील आहे.

लोधी साम्राज्यातील मुस्लीम सुभेदाराने बांधलेली विहिरी तरी तिच्या नावात ‘राजा’ शब्द कसा ? खरं तर हे कोणत्याही राजाला समर्पित नाही. ज्या राजमिस्त्रींनी विहीर बांधली त्यांच्याच नावावर विहिरीला ‘राजों की बावली’ नाव मिळालं. बांधणाऱ्या कारागिरांना समर्पित दुर्मिळ वास्तूंमध्ये या विहिरीचा समावेश होतो.

कसे जाल ?

मेट्रोने तुम्ही दिल्लीच्या कोणत्याही भागातून मेहरौलीपर्यंत पोहोचू शकता.

७. सूर्यकुंड विहिरी, मोढेरा – गुजरात

गुजरातच्या मोढेरा येथे असलेल्या सूर्यमंदिराबाहेरील कुंडाची निर्मिती ही विहिरीसारखी करण्यात आली आहे. या कुंडाला रामकुंडही म्हटलं जातं. स्थानिक आख्यायिकेनुसार याठिकाणी राम आणि सीता यांनी ब्रह्म हत्येच्या पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी यज्ञ केला होता. एका कथेनुसार इथल्या सूर्यमंदिराची निर्मिती ही अशाप्रकारे करण्यात आली होती की वसंतसंपाताच्यावेळी सूर्याची किरणे थेट मंदिराच्या गाभार्यापर्यंत पोहोचतील.

सूर्यकुंडाचं विशिष्ट्य म्हणजे पायऱ्यांलगत असलेली लहानलहान देवळं. आतल्या बाजूस अशी १०० देवळं आहेत.

 

कसे जाल ?

मोढेराला जाण्यासाठी तुम्हाला अहमदाबाद ते मेहसाणा आणि मेहसाणा ते मोढेरा असा प्रवास करावा लागेल. तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला राणी की बाव आणि सूर्यकुंड दोन्ही बघता येतील.

८. बारा मोटेची विहीर, लिंब – सातारा

साताऱ्याच्या लिंब भागात असलेली बारा मोटेची विहिरी ही महाराष्ट्रातील एकमेव पायऱ्यांची विहिरी आहे. शके १६४१ ते १६४६ कालावधीत विरुबाई यांनी ती बांधली. १२ मोट असलेली विहीर म्हणून विहिरीला ‘बारा मोटेची विहीर’ असं नाव पडलं. वरून बघितल्यास विहिरीचा आकार हा शिवलिंगासारखा दिसतो. विहिरीचा आतील भाग हा स्थापत्याकलेसाठी प्रसिद्ध आहे.मुख्य विहीर ही अष्टकोनी आहे आणि शेजारी तिला जोडून आयताकृती लहान विहीर आहे. या दोन्ही विहिरींना जोडणाऱ्या भागात महाल बांधलेला आहे. वास्तुकलेसोबत आतील शिल्पकला सुद्धा बघण्यासारखी आहे. आतील खांबांवर गणपती, हनुमान आणि महाराजांचं शिल्प कोरलेलं आहे.

कसे जाल ?

लिंब हे साताऱ्यावरून १६ किलोमीटर लांब आहे. बसने सातारा ते लिंब असा प्रवास करता येतो. पुण्यापासून लिंब पर्यंतचं अंतर हे १०० किलोमीटरवर आहे.

 

आणखी वाचा :

भारतात आहेत ही १३ जागतिक वारसा स्थळं. यातल्या किती ठिकाणांना तुम्ही भेट दिलीय??

हंपी मध्ये जाऊन पाहायलाच हवीत ही ऐतिहासिक आणि अफलातून ६ ठिकाणं!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required