ताजमहाल विकणाऱ्या ‘मिस्टर नटवरलाल’ बद्दल या ९ गोष्टी माहित आहेत का ?
मिथिलेश कुमार श्रीवास्तव हे नाव कधी ऐकलंय का हो भाऊ? नाही? मंडळी हा माणूस ‘मिस्टर नटवरलाल’ नावाने ओळखला जायचा. अमिताभ बच्चन यांच्या मिस्टर नटवरलाल या सिनेमा मागची प्रेरणा याच माणसापासून मिळाली. आता हा मिस्टर नटवरलाल हा एखादी व्यक्ती नसून ठगाचा चेहरा बनला आहे. दुसऱ्यांना फसवून पैसा कमावणारे, लुबाडणारे, तद्दन ‘४२०’ लोक असे सगळेच या कॅटेगरीत आले. मंडळी नटवरलाल इतका करामती होता की त्याने चक्क ताजमहाल तीनदा विकला होता, आहात कुठं !!
मंडळी, हा नटवरलाल नेमका होता तरी कोण आणि त्याने असे काय केले, की त्याची आजही आठवण काढली जाते. चला तर बघूयात नटवरलालबद्दल माहित नसलेल्या या ८ गोष्टी.
१. सुरुवातीच्या काळातील वकिली
नटवरलाल हा बिहारच्या ‘सिवान’ जिल्ह्यात जन्मला. तो सुरुवातीला वकिली करत होता. वकिली करतानाच त्याला शोध लागला की आपण बनावट सही करू शकतो. आणि इथूनच त्याचा नवा प्रवास सुरु झाला. त्याच्या ‘मिथिलेश कुमार श्रीवास्तव’ पासून ‘नटवरलाल’ बनण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल काही दंतकथाही प्रसिद्ध आहेत.
२. खोटी सही करण्यात तरबेज
त्याने वकिली सोडून बनावट सह्या करण्याच्या जोरावर गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याची तब्बल ५० वेगवेगळी नावे होती. तो वेष बदलण्यात माहीर होता. त्याने तर एकदा चक्क तत्कालीन राष्ट्रपती ‘डॉ. राजेंद्र प्रसाद’ यांची हुबेहूब सही करून लोकांना फसवलं होतं. त्याने ज्यांना फसवलं त्या लिस्टमध्ये धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्लासुद्धा होते राव!! ७०, ८० आणि 90 च्या दशकात नटवरलालची दहशत होती.
३. राजीव गांधीच्या नावाने लूट.
नटवरलालने राजीव गांधींच्या नावाने एकदा ३२००० चा चुना लावला होता. तो एका म्हाताऱ्या माणसाचा वेष धारण करून घड्याळाच्या दुकानात शिरला आणि त्याने राजीव गांधींच्या नावाने ९३ घड्याळांची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी तो घड्याळ घेण्यास दुकानात गेला आणि त्याने घड्याळाची किंमत म्हणून ३२,८२९ रुपयाचा बँक ड्राफ्ट दिला. घड्याळ नटवरलालकडे सोपवल्यानंतर समजलं की हा ड्राफ्ट नकली होता. तोपर्यंत अर्थातच नटवरलाल पसार झालेला.
४. याने तर ताज महाल, लाल किल्ला सुद्धा विकला.
कोणी ताजमहाल कसं काय विकू शकतं भौ? मंडळी, नटवरलाल फॉरेनर्सना स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून सांगायचा. यातून त्याने ३ वेळा ताजमहाल, २ वेळा लाल किल्ला आणि एकदा राष्ट्रपती भवन विकून टाकलं होतं. कळस म्हणजे त्याने संसद भवन त्यात असणाऱ्या खासदारांसह विकलं होतं. (ये बिक गई हे गोर्मिंट)
५. ११ मुलखोंकी पुलिस
नटवरलाल ९ वेळा पोलिसांच्या हाती लागला पण प्रत्येकवेळी तो जेलमधून पाळण्यात यशस्वी झाला. ८ राज्यात त्याच्यावर १०० पेक्षा जास्त खटले चालू होते. ‘मोस्ट वाँटेड’ असूनही तो कधी पोलिसांच्या हाती लागला नाही.
६. ११३ वर्षांची शिक्षा.
नटवरलालला ११३ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. पण त्यातील जेमतेम २० वर्ष तो जेलमध्ये राहिला. वेगवेगळ्या मार्गाने तो जेल मधून निसटला. त्याला शेवटचं पकडलं तेव्हा तो ८४ वर्षांचा होता. ते वर्ष होतं २४ जून, १९९६. कानपूर जेलमधून हॉस्पिटल मध्ये नेत असताना तो सटकला आणि पुन्हा कधीही दिसला नाही.
७. रॉबिनहूड नटवरलाल
सरकारच्या दृष्टीने तो एक गुन्हेगार असला तरी त्याच्या मुळच्या ‘बंगरा’ गावात तो त्याच्या चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होता. तो जेव्हा श्रीमंत होऊन गावात आला तेव्हा त्याने गावात पैसे वाटले होते. त्यामुळे गावातल्या लोकांच्या नजरेत तो आजही एक हिरो आहे. गावातल्या लोकांप्रमाणे तो श्रीमंतांना लुटून गरीबांत वाटायचा. म्हणजेच ‘रॉबिनहूड’. असं म्हणतात की या गावात नटवरलालचा पुतळाही उभारणार आहेत.
८. चित्रपटांवर प्रभाव
अमिताभ बच्चन यांच्या ‘मिस्टर नटवरलाल’ पासून ते आताच्या ‘इम्रान हाश्मीने’च्या ‘राजा नटवरलाल’ पर्यंत त्याने चित्रपटांवर आपला प्रभाव पाडला. अनेक ‘ठग’ असलेल्या व्यक्तिरेखा त्याच्याकडून प्रभावित झाल्या होत्या. नटवरलालच्या आयुष्यावर आधारित ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर ‘जुर्म’ नावाची मालिका देखील होऊन गेली.
९. मरताना देखील फसवून गेला.
२००९ साली नटवरलालच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली की नटवरलालच्या नावावर असलेल्या सगळ्या केसेस मागे घेण्यात याव्यात. कारण २५ मे, २००९ साली त्याचा मृत्यू झाला आहे. याविरुद्ध नटवरलालच्या भावाचं म्हणणं होतं की नटवरलाल मरून चक्क १३ वर्ष झाली आहेत. म्हणजेच १९९६ सालीच तो मेला. तो नक्की कधी मेला हे आजही गूढ आहे.
मंडळी, असं म्हणतात की नटवरलालने इथवर सांगितलं होतं की ‘मी माझ्या ठगण्याच्या कौशल्याच्या जोरावर देशाचं सगळं कर्ज माफ करू शकतो.’