भारत मातेला पहिल्यांदा चित्ररूप देणारे अबनिन्द्रनाथ टागोर होते तरी कोण ?? वाचा एका क्रांतिकारकाबद्दल !!
टागोर म्हटलं की आपल्याला आठवतात ‘जन गण मन’ लिहिणारे नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, पण आज आपण एका अज्ञात टागोरांना भेटणार आहोत. हे अज्ञात टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे अबनिन्द्रनाथ टागोर (७ ऑगस्ट १८७१ - ५ डिसेंबर १९५१). त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. इंग्रजांनी भारतावर पूर्ण नियंत्रण आणलेल्या काळात अबिनिन्द्र्नाथांनी इंग्रजांशी एका वेगळ्या प्रकारे लढा दिला. हा लढा होता कलेच्या माध्यमातून.
चला तर आज जाणून घेऊया इतिहासातील एका अज्ञात टागोरांना.
टागोर कुटुंबात कला आणि साहित्याची मोठी परंपरा होती. कुटुंबातील हीच परंपरा पुढे रवींद्रनाथ आणि मग अबनिन्द्रनाथांनी पुढे नेली किंवा असं म्हणू त्यांनी परंपरेला आणखी वृद्धिंगत केलं. अबनिन्द्रनाथांनी चित्रकलेला वाहून घेतलं होतं. त्यांचं आधुनिक भारतीय चित्रकलेतील योगदान अनन्यसाधारण आहे.
अबनिन्द्रनाथांनी युरोपच्या दिग्गज चित्रकारांकडून कलेचे धडे घेतले होते, पण त्यांनी भारतीय कलेलाच सर्वाधिक महत्व दिलं. मुघल चित्रकला आणि राजपूत चित्रकलेने त्यांना प्रभावित केलं होतं. या दोन्ही चित्रशैलीना आधुनिक रूप देण्याची कल्पना त्यांचीच. या कल्पनेतून आधुनिक भारतीय चित्रकलेच्या वाढीस चालना मिळाली.
भारतीय कलेला आधुनिक रूप देण्याची कल्पना भारतीय कलेत प्रगती व्हावी या हेतूने तर होतीच पण त्यासोबत इंग्रजांविरोधातील लढ्याचा हा एक भाग देखील होता. १८९० साली कलकत्ता कला महाविद्यालयात असताना अबनिन्द्रनाथांनी पाहिलं की भारतीय कलेवर पाश्चात्य कलेचं अतिक्रमण होत आहे. अबनिन्द्रनाथांचं भारतीय कलेवर निस्सीम प्रेम होतं. त्यांना भारतीय कलेवर होणारं हे अतिक्रमण मोडून पटलं नाही.
भारतीय कलेत स्वदेशी विचार आणून त्यांनी भाऊ गगनेन्द्रनाथ टागोर यांच्या सोबत मिळून ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’ ची स्थापना केली. त्यांनी अस्सल भारतीय चित्रशैलीला महत्व प्राप्त करून दिलं. त्यांनी काढलेली चित्रे आजही भारतीय चित्रशैलीचं प्रतिनिधित्व करतात. त्याचे हे काही नमुने पाहा.
भारतीय स्वतंत्र लढ्याच्या काळात पहिल्यांदाच भारत देशाला मातेचं स्वरूप आलं. भारत भूमी ही आमची माता असून तिला आपण बंधनातून मुक्त केलं पाहिजे असा विचार त्याकाळी प्रसिद्ध झाला होता. १९०५ साली बंगालची फाळणी करण्यात आली. या घटनेने स्वदेशी चळवळीचं लोण भारतभर पसरलं. अशा धामधुमीच्या काळात भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अबनिन्द्रनाथांनी पहिल्यांदाच भारत मातेला चित्ररुपात साकारलं. भारत मातेला चित्ररूप देणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी अबनिन्द्रनाथ एक होते. चित्रामध्ये त्यांनी भारत मातेच्या हाती देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी जसे की जपमाळ, भाताच्या लोंब्या, ग्रंथ, कापड या गोष्टी दर्शवल्या आहेत. चळवळीच्या काळात हे चित्र प्रेरणादायी ठरलं होतं.
मंडळी, अबनिन्द्रनाथांचा भारतीय कलेचा अट्टाहास हा क्रांतिकारी ठरला. त्यांच्या चित्रांना भारताच्या राष्ट्रीय चित्रशैलीचा दर्जा खुद्द ब्रिटीश आर्ट इन्स्टिट्यूटने दिला आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्यांनी दिलेला लढा हा यशस्वी झाला होता.
त्यांच्या चित्रकलेचा उत्तम नमुना म्हणजे त्यांनी तयार केलेली अरेबियन नाईट्सचं चित्रे. १९३० साली त्यांनी कलकत्त्याचं बदलणारं रूप दाखवण्यासाठी अरेबियन नाईट्स मधल्या कथांचा आधार घेतला होता. या संग्रहातील काही नमुने पाहा.
स्वदेशाचा हा मोठा पुरस्कर्ता कलाकार लोकांना फारसा माहित नाही हे दुर्दैवच. कला ही देशाचा अविभाज्य भाग असते. कलेवर होणारं आक्रमण हे देशाच्या एकंदरीत इतिहासावर परिणाम करत असतं. इंग्रजी सत्तेच्या काळात भारतीयांवर येणाऱ्या कलेच्या गुलामगिरीला समर्थपणे तोंड देणारा हा इतिहासातील कदाचित पहिलाच कलावंत असावा.
अबनिन्द्रनाथ टागोरांना बोभाटाचा सलाम !!