कथा तेलगीच्या विळख्याची - भाग २ : कसे अडकवले तेलगीने सगळ्यांना ?

देशातील स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार ‘अब्दुल करीम तेलगी’ याचा २३ ऑक्टोबर २०१७ साली मृत्यू झाला. काळ या घटनेला ३ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने ‘अरुण हरकारे’ लिखित ‘कथा तेलगीच्या विळख्याची’ या पुस्तकातील एक महत्वाचं प्रकरण खास बोभाटाच्या वाचकांसाठी दोन भागांमध्ये प्रकाशित करत आहोत.

भाग १

भाग २ :

‘तेलगीने मशीन खरेदी केल्या. स्टॅम्प पेपर छापायला सुरुवात केली. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॅम्प चोरून विकणे ही काही साधी गोष्ट नव्हती.’

‘जसजसा पैसा मिळत गेला तसतसा तेलगीने त्याच्या धंद्याचा प्रसार केला. त्याने त्याच्या प्रतिनिधींना सांगून ठेवलं होतं की अशा राजकीय नेत्यांकडे आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे लक्ष ठेवा, ज्यांना पैशाची गरज आहे. त्यांच्याशी दोस्ती वाढवा. आज ना उद्या अटक झाली की तेच तुम्हाला सोडवतील.’

‘तेलगीसाठी काम करणारी आणखी काही खास माणसं असतील ?’

‘हजारो होती.’

‘त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल ?’

‘कोणत्या विभागातील ? प्रेसमधली, पोलीस खात्यातली, बँकेची, फिल्म इंडस्ट्रीमधली की राजकारणातली ?’

‘या सर्व विभागात त्याची माणसं होती ?’

अर्थातच. त्याशिवाय का एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं ? सुरुवातीला बोगस स्टॅम्प विकणारे, स्टॅम्प  तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठ करणारे, स्टॅम्प  इकडून तिकडे नेणारे, त्यांना अटक होत होती. २००२ साली तेलगी पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. पण तेलगीचे खास मित्र आंधळे आणि कामत हे होते मुंबईला.

‘पण कामत आणि आंधळे हे दोघे छोटे पोलीस अधिकारी. त्याचं पोलीस आयुक्त, उपायुक्त वगैरे कसं ऐकायचे ?’

आंधळे हे गोपीनाथ मुंडे यांच्या पी. ए. च्या नात्यातले. अनेक मंत्री खासदार, आमदार यांच्याशी त्यांच्या ओळखी, ते राजकारणातल्या व्यक्तीकडून दबाव आणायचे, तर कामत पैशाचा पाऊस पाडायचा. पाच, दहा, पन्नास लाखांपर्यंत पैसे ऑफर केले जायचे.’

‘म्हणजे तेलगी स्वतः हे व्यवहार करत नव्हता ?’

‘करायचा. तेलगी तर ब्लॅकमेलिंग करायचा. तो फोनवर जे बोलायचा ते रेकॉर्ड करून ठेवायचा. त्यामुळे त्या व्यक्तीविरुद्ध पुरावा तयार व्हायचा. कामत किंवा आंधळे आधी त्या व्यक्तीशी बोलायचे, मग मोबाईल तेलगीला देण्यात यायचा. तेलगी विचारायचा,

‘कौन सब बोल रहे है ?’

‘मै इन्स्पेक्टर डाल.’

‘अँधेरी पुलिस ठाणे से ?’

‘नहीं, क्राईम ब्रांच, धारावी.’

‘अच्छा अच्छा, समज गया. नमस्ते साब.’

‘नमस्ते.’

‘ये मामला ख़तम करो ना साब. गलती हो गई. अब नहीं होगी. कामत बोलता था आपको दस चाहिए. ये बहोत जादा होता है साब. आठ लाख में ख़तम कर डालो.’ हे सगळं संभाषण टेप केलं जायचं. ती व्यक्ती कुठे काम करते ? तिने किती पैसे मागितले ? तिचे नाव काय ? हे सगळं टेप व्हायचं. त्यामुळे पोलीस ऑफिसर जास्त अडचणीत आले. एकदा अडकले की त्यांना तेलगीला नकार देता येत नव्हता.’

‘आंध्रप्रदेशात बऱ्याच जणांना अटक झाली असं म्हणतात.’

‘हो. त्यांनी चार पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. त्यांचा एक एम. एल. ए. जेलमध्ये आहे. त्याला टी. डी. पी. मधून काढून टाकण्यात आलं. दुसऱ्या मंत्र्याच्या भावाला अटक झाली म्हणून त्याला राजीनामा द्यावा लागला. आणखी बरेच सापडताहेत.’

‘टी. डी. पी. म्हणजे ?’

‘तेलगु देसम पार्टी.’

‘आंध्र प्रदेशातल्या आमदाराला का पकडलं होतं ?’

१९९९ साली आंध्र प्रदेशातल्या एका बँकरला त्याला मिळालेले स्टॅम्प बनावट असावेत असा संशय आला. त्यावेळी चाळीस जणांना अटक करण्यात आली. तेलगीलासुद्धा चौकशीसाठी बोलावलं होतं, पण नंतर सोडून देण्यात आलं.’

‘आणि ते आमदार ?’

‘आमदार कृष्णा यादव. हे आधी पशुपालन मंत्री होते. १९९८ सालापर्यंत आमदार कृष्णा यादव यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून तेलगी व अनैतिक उद्योगाला संरक्षण पुरवलं. त्यांनी तेलगीकडून आर्थिक स्वरुपाची मदत घेतली. पुढे आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला. त्यामुळे यादव यांनी अब्दुल वाहिद आणि सदाशिव नावाच्या तेलगीच्या दोन साथीदारांचे अपहरण केलं. या दोघांच्या मुक्ततेसाठी त्याने तेलगीकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. तेलगीने पाच लाख रुपये देऊन सहकाऱ्यांची सुटका करून घेतली. जानेवारी २००३ मध्ये तपास पथकाने कुलाब्यातील पास्ता लेनमधील तेलगीच्या निवासस्थानावर धाड घालून एक मायक्रो कॅसेट जप्त केली. या कॅसेटमध्ये तेलगी व यादव यांच्यात सदाशिव व वाहिद यांच्या सुटकेसंदर्भात झालेली बोलणी टेप केली होती. तेलगी आणि यादव या दोघांनी अशी बोलणी झाल्याचा इन्कार केला. यासंबंधी विशेष तपास पथकाला यादव यांनी सहकार्य केलं नाही. आरोपपत्रात दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी १९९८ रोजी यादव यांचे सहकारी शामसुंदर प्रसाद, राजू श्रीवास्तव यांचा  तेलगीसमवेत पैशांवरून वाद निर्माण झाला. त्या वेळी दोघांनी वाहिदचं अपहरण केलं. त्यानंतर १५ दिवसांनी सदाशिवचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्याकडून व्यंकटेश्वर इंटरप्रायझेसच्या नावाने ३ लाख ५२ हजार रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्या. नंतर वाहिद व सदाशिव यांना यादव यांच्याकडे नेण्यात आलं. हे समजल्यावर यादव यांना अटक झाली. यादव यांची सर्वप्रथम शास्त्रीय चाचणी करण्यात आली. २३ सप्टेंबर २००३ रोजी झालेल्या या चाचणीत त्यांना संपूर्ण माहिती दिली नाही. काही माहिती दडवून ठेवली.’

‘आता या भानगडीत अनेक राज्यांचे लोक अडकले आहेत. त्यात केंद्र शासनाला पाठींबा देणारे अनेक पक्ष आहेत. त्यांच्या भानगडी उजेडात आल्या तर केंद्र शासनावरसुद्धा परिणाम होऊ शकतो.’

(समाप्त)

 

‘कथा तेलगीच्या विळख्याची’

प्रकाशक :

अरुण हरकारे

कुलस्वामिनी प्रकाशन,

ऋषभ अपार्टमेंट, गांधीनगर,

डोंबिवली (पूर्व)

दूरध्वनी : ९८३३४४१३८३

सबस्क्राईब करा

* indicates required