या एका जाहिरातीनं बदललं समाजाचं कुटुंबनियोजनाबद्दल मत!!
कुटुंब नियोजन म्हणजेच् फॅमिली प्लॅनिंग हे आता काही नवं राह्यलं नाहीय. किंबहुना सर्वजण ते करतातच, हे सर्वांनी अलिखितपणे मान्य केलंय.जरा आसपास नजर टाका. हम दो , हमारे दो किंवा हमारा एक अशीच समाज रचना नजरेस येते. पण एक काळ असा होता की कुटुंबनियोजन हा मोठा थट्टेचा विषय होता. घरात मुलांची संख्या कमी असणं म्हणजे नवऱ्यात काही 'पुरुषार्थ' नाही असं समजलं जायचं. पुरुषांनी निरोधसारखी साधनं वापरणं किंवा स्त्रियांनी लूप,कॉपर टी असलं काही वापरणं याला "नस्ती थेरं " म्हटलं जायचं. अनेक बाळंतपणामुळं बाईची खालावत जाणारी तब्येत -मुलांची आबाळ- पैशाचं नियोजन करताना नवर्याच्या तोंडाला येणारा फेस... या सर्व समस्यांकडं दुर्लक्ष करण्याचीच फॅशन होती.
बरं, हे फक्त भारतात होत होतं का? तर, असंही काही नव्हतं. पाश्चात्य देशात पण हीच परीस्थिती होती. यावर समाजाला कुटुंबनियोजनाचं शिक्षण देणं, जागरुकता निर्माण करणं हा एकच उपाय होता. प्रत्येक राष्ट्राचं सरकार लोकशिक्षणाचा वापर करत होतं. पण लोकांच्या, विशेषतः पुरुषांच्या मनात हे स्थित्यंतर काही घडून येत नव्हतं. असं म्हणतात की हजारो शब्दांचे काम एक चित्र करू शकतं. कुटुंबनियोजनाच्या बाबतीत नेमका हाच चमत्कार या एका जाहिरातीनं घडवून आणला. या जाहिरातीच्या निर्मितीचं श्रेय साची अँड साची या जाहिरात कंपनीकडं जातं.
साची अँड साची या जाहिरात कंपनीने पुरुषांना बायकांच्या समस्येची जाणीव करून दिली. हे पोस्टर येण्यापूर्वी ही एक छोटी जाहिरात कंपनी समजली जायची. जेरेमी सिंक्लेअर नावाच्या एक नविन कॉपी रायटर होता. त्याने ही संकल्पना “Pregnant man” ब्रिटनच्या हेल्थ एज्युकेशन काउन्सील समोर मांडली.
या जाहिरातीला अर्थातच अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर हीच कल्पना वापरून अशाच जाहिराती सगळ्या देशांत आल्या. भारतातही वसंत सरवटेंनी " अशीच वेळ तुमच्यावर आली तर " असे एक पोस्टर तयार केले होते.
आता, कुटुंब नियोजन आणि सामाजीक स्वास्थ्य या विषायात कोणालाही मार्गदर्शनाची आवश्यकता भासत नाही. पुरुषांना दिवस जाणं हा आता कॉमेडीचा विषय झाला आहे. मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत या विषयावर चित्रपटपण आले आहेत.
पण सावधान.. विज्ञान ज्या वेगाने धावतंय ते लक्षात घेता, येणार्या काही वर्षांत लग्नापूर्वीच मुलंमुली बाळंतपणाचा कोटा ठरवून घेतील.