४५००० काचेच्या वस्तू असलेलं जगातील एकमेव 'काचवस्तू संग्रहालय'...!!
आज आपण एका म्युझियमची भेट घेणार आहोत. हे म्युझियम संपूर्णपणे ‘काचेला’ समर्पित आहे. हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे ४५००० काचेच्या वस्तू एका जागी पाहायला मिळतात. या संग्रहातील काही वस्तू तर तब्बल ३५०० वर्ष जुन्या आहेत राव.
चला तर या म्युझियम बद्दल आणखी माहिती जाणून घेऊया...
१. स्थापना
या म्युझियमचं नाव आहे ‘कॉर्निंग ग्लास म्युझियम’. न्यूयॉर्क मधल्या कॉर्निंग ग्लास वर्क्स’ने १९५० साली याची स्थापना केली होती.
२. काचेबद्दल सर्वकाही
कॉर्निंग संग्रहालय ‘नॉन प्रॉफिट’ तत्वावर चालत आहे. ‘काचेबद्दल सर्वकाही’ याच ब्रीदवाक्याला अनुसरून म्युझियम उभं राहीलं आहे. या जागी तुम्हाला काचेच्या विविध वस्तूंबरोबर त्याची बारीकसारीक माहिती वाचायला मिळतो.
३. काचेचा इतिहास
काचेचा इतिहास, त्यातील कला, कलेचे बदललेले विचार आणि संदर्भ हे सारे अतिशय विस्ताराने तेथे पहावयास मिळते. आशिया, युरोप, अमेरिका, इस्लामिक परंपरा अशा जगातील कानाकोपऱ्यातला काचेचा इतिहास दाखवणारा स्वतंत्र विभाग इथे आहे.
४. ३ लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि १२ व्या शतकापासूनची माहिती या संग्रहालयात आहे. जगातील ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये हे संदर्भ उपलब्ध आहेत.
५. आजवर न पाहिलेल्या काचेच्या गोष्टी
खिडक्यांच्या काचा, झुंबर, तावदाने, पेपरवेट, इत्यादी सर्वसामान्य काचेच्या वस्तूंच्या पलीकडे जाऊन हे संग्रहालय आपल्याला थक्क करणाऱ्या गोष्टींचं दर्शन घडवतं. आपण आजवर न पाहिलेल्या काचेच्या गोष्टी इथे पाहायला मिळतात.
६. संग्रहालयाची भव्यता
कॉर्निंग संग्रहालयात फक्त पाणी प्यायच्या ग्लासचे २४०० नमुने ठेवले आहेत. हे नमुने प्राचीन काळापासून ते आजवरच्या ग्लासचा प्रवास दाखवतात. राव यावरून या संग्रहालयाच्या भव्यतेचा अंदाज येतो.
७. १९७२ सालचं संकट
१९७२ साली न्यूयॉर्क भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. या पावसाने संग्रहालयातील जवळजवळ ४०% काचेच्या वस्तू चिखलात पडून त्याचं नुकसान झालं. संग्रहालयात असलेली पुस्तके पाण्यात भिजून त्यांचा लगदा झाला. या संकटानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून चिखलातली प्रत्येक वस्तू साफ करून पूर्ववत केली. त्याच बरोबर जी पुस्तके भिजली होती त्यांना उन्हात वळवण्यात आले.
८. नव्याने सुरुवात
या मोठ्या संकटानंतर १९८० साली वस्तुसंग्रहालय पुन्हा एकदा उभे राहिले. हा या संग्रहालयाचा नवा जन्म म्हणता येईल. १९८० नंतर संग्रहालयाने पूर्वी पेक्षा मोठी जागा व्यापली. आजच्या घडीला संग्रहालयात वस्तू ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे.
९. दरवर्षी ३ लाख पर्यटक कॉर्निंग म्युझियमला भेट देतात. येथे असलेला काचेचे बाजार विशेष लोकप्रिय आहे.
१०. 'हॉट ग्लास शो'
या म्युझियमचे मुख्य आकर्षण म्हणजे 'हॉट ग्लास शो'. या शो मध्ये पर्यटकांच्या समोर काचेच्या वस्तू बनवल्या जातात. ह्या अनुभवासाठी अनेकजण पुन्हा पुन्हा म्युझियमला भेट देतात. याशिवाय काचेच्या वस्तूंचा उपयोग देखील नीट समजावला जातो.
हे भव्यदिव्य संग्रहालय पाहण्यासाठी अमेरिका फारच लांब पडते राव. म्हणूनच आम्ही ठेव संग्रहालय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. खालील फोटो पाहा राव !!