computer

बिबट्या नरभक्षक असतो का? तो मानवी रक्ताला चटावला गेलाय? वन्यजीव अभ्यासकांच्या नजरेतून जाणून घ्या!!

 

महाराष्ट्रातील अनेक भागात हा शब्द जरी कानी पडला तर अनेकांचा थरकाप उडतो, कारण ही तसेच आहे. रोज आपण कुठे ना कुठे वाचतोय, ऐकतोय.. ह्या ठिकाणी त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला, बिबटय़ाच्या हल्ल्यात अमुक तमुक जखमी अथवा मृत, बिबट्या नरभक्षक बनला...

पण खरेच असे आहे का ?
बिबट्या नरभक्षक असतो का ?

अशा अनेक प्रश्नांची आज आपण उत्तरे घेणार आहोत. पण त्याआधी आपण बिबट्याविषयी जाणून घेऊयात.

ना जंगल का ना जमीन का अशा दुर्दैवी अवस्थेत जगणारा संघर्षमय वन्यजीव म्हणजे बिबट्या, मांजर कुळातील हा प्राणी. बिबट्या हा पूर्णपणे लाजाळू प्राणी आहे. सतत तो स्वत:ला लपवत फिरत असतो. तो निशाचर आहे. मागे सर्वांचं लक्ष लागून होतं त्या सोलापूर-बीडच्या घटनेत कथित नरभक्षक बिबट्याने अनेकांवर हल्ला केला व अनेकांचे बळी घेतले असं म्हटलं जातं होतं. शेवटी नरभक्षक ठरवून त्या बिबट्यास ठार मारण्यात आले. पण यावेळी बिबट्याला मृत्यूच्या दारात ढकलले, की माणसाने माणुसकीला? हा प्रश्न अनुत्तरितच राहील. कारण आधी माणसाने ह्या बिबटय़ाच्या अधिवासात आपला हस्तक्षेप करायचा, त्याच्या नैसर्गिक भक्ष्याची ही स्वत: शिकार करायची, मग भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने अनावधानाने हल्ला केला तर लगेच त्याला मानवनिर्मित कायद्याच्या कचाट्यात अडकवून नरभक्षक ठरवायचं, आणि मग त्याला ठार करायचा. हा कुठला न्याय? एखाद्या बिबट्याला मारले म्हणजे मानव-वन्यजीव संघर्ष संपेल का? बिबट्या-मानव संघर्षाच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत ते आपल्याला नेमकं काय सूचित करत आहेत?

बिबट्या मानवी रक्ताला चटावला गेलाय की तो आपल्या मानवी वस्तीत स्वत:ला सामील करण्यासाठी धडपडतोय?

खरे पाहता मनुष्यच सर्वात मोठा हिंस्र प्राणी आहे जो आपल्या चुका लपवून या प्राण्यांना दोष देतोय. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शहरीकरणामुळे मानवाचे जंगलावर अतिक्रमण वाढले. त्यामुळे या वन्यजीवांच्या भटकंतीचा मोकळा मार्गच बंद झाला. अशाने जंगलात खाद्यासाठी स्पर्धा वाढली. यातून कमी क्षेत्राच्या वनातून वाघ, सिंह अशा प्राण्यांकडून बिबट्याला बाहेर फेकले गेले आणि मानव-बिबटे संघर्ष उदयास आला. ही होती या संघर्षामागील पार्श्वभूमी.

तर जंगलातून बाहेर पडलेले बिबटे स्वतःच्या अस्तित्वासाठी जगत होते. ऊसशेती प्राधान्यित क्षेत्रात बिबट्याने आपला अधिवास बनवला. कारण ऊस हे पीक तसे घनदाट. त्यामुळे लपण्यासाठी योग्य जागा, संपूर्ण पीकवाढीसाठी लागणारा १ वर्षाचा कालावधी, या कालावधीत क्वचित शेतीकडे येण्याचा लोकांचा कल. त्यात भर म्हणजे शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्यामुळे बिबट्याची तहान तर भागेलच!! त्यात भक्ष्य म्हणजे उसाला नुकसान पोहोचवणारे घूस, साळींदर, रानडुक्कर हे प्राणी त्याला शेतीजवळ आयते भक्ष्य मिळत गेले. त्यामुळे उसाच्या शेतात, जवळच्या माळरानावर त्याने आपला अधिवास बनवला. काही काळाने लोकांनी रानडुक्कर, साळींदर ससे अशा प्राण्यांची अवैध शिकार करणे सुरू केली. यामुळे अजून भक्ष्याची कमतरता भासू लागल्याने बिबट्याने आपला मोर्चा शहरी भागात वळवला. कारण इथे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्रे होते, सोबतच डुक्करेही असत. बिबट्याने अशा प्राण्यांना भक्ष्य बनवणे सुरू केले. कारण हे प्राणी शिकारीलासुद्धा सोप्पे होते. अशा प्रकारे बिबट्या मानवी वस्तीजवळ पोहोचला. (वास्तविक मानवाने बिबटय़ाच्या वस्तीत प्रवेश केलाय ).

आधी लिहिल्याप्रमाणे बिबट्या हा लाजाळू आणि निशाचर आहे. तो आपल्या आसपासच्या परिसरात वावरतो, राहतो. पण क्वचित प्रसंगी तो आपल्या निदर्शनास पडतो. मग लगेच आपण वनविभागाला कळवणार, त्या बिबट्याला पकडण्यासाठी दबाव आणणार, मग नाईलाजाने का होईना त्या बिबट्याला पकडले जाते. पण मित्रांनो, त्या भागातील बिबट्या जेरबंद केला म्हणजे हा संघर्ष ही संपला असा मुळीच नाही. अशाने मानव-बिबट्या संघर्षाला नवे फाटे कसे फुटतात कसे ते आपण पाहूया..

प्रत्येक प्राण्यांचा एक अधिवास क्षेत्र असतो, त्याला आपण territory म्हणतो. या टेरिटरीवर फक्त एकाचे वर्चस्व असते. तिथल्या बिबट्याला जेरबंद केल्यास रिकाम्या झालेल्या टेरिटरीवर आपलं वर्चस्व करण्यासाठी तिथे आजूबाजूच्या टेरिटरीमधील दुसरे बिबटे येतातच. मग त्यांच्यामध्ये या टेरिटरीसाठी संघर्ष होतो, म्हणजे एका बिबट्याला जेरबंद करून दुसऱ्यांना आयते निमंत्रण केले असे म्हणायला काही हरकत नाही.

जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्यास नव्या अधिवासात सोडले जाते. या ठिकाणाची त्याला माहिती नसते. जसे पाणवठे कुठे आहेत, आसरा घेण्यास जागा कुठे आहे, भक्ष्य कुठे मिळू शकते इत्यादी.. यामुळे बिबट्या गोंधळून जातो आणि अनपेक्षितपणे तो शहरी भागांजवळ येतो. यातून मग आपल्या चुकांमुळे हल्ले होतात. ग्रामीण भागात एखादा वन्यप्राणी दिसला कि लगेच काही हौशी रिकामटेकडी लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्याच्या मागे लागतात. अनेकवेळा ऊस कापणीच्या वेळी लोकांना बिबट्याची पिल्लं आढळून येतात. अशा वेळी लोक पिल्लांना उचलून फोटो काढणे, त्यांना घरी नेणे असे प्रकार चालूच असतात. लाठ्या घेउन मागे लागलेले लोक पाहून स्वबचावासाठी हिंसक होणं अथवा आपल्या पिल्लांसाठी मादीचे हिंसक होणं हे निसर्गनियमांना धरूनच आहे. मग अशा प्रकारातून झालेल्या हल्ल्यांमुळे बिबट्याला नाहकपणे नरभक्षक ठरवले जाते. बिबट्या हा मुळात नरभक्षक नसतो. तो आपल्या आसपासच्या परिसरात राहू शकतो, स्वतःला आपल्या परिक्षेत्रात सामावून घेऊ शकतो.

एकंदर परिस्थिती पाहता आपण स्वत: विचार केला पाहिजे की यात चूक कोणाची आहे आणि शिक्षा कोणास मिळते?

आपण सामंजस्य जपलं तर बिबट्या आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. बिबट्या जगायला हवा, त्याचे अस्तित्व टिकले पाहिजे. बिबट्या अस्तित्वात असणे म्हणजे जंगल संपदेच्या सुदृढतेचे लक्षण आहे.

पुढील भागात आपण पाहूयात मानव-बिबटे संघर्ष कसा टाळला जाऊ शकतो..

 

लेखक: © शिवम सतीश आर्य
(वन्यजीव अभ्यासक)

सबस्क्राईब करा

* indicates required