इतर विमा योजनांपेक्षा 'टपाल जीवन विमा योजना' वेगळी कशी आहे? हे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या !!
१९९५ नंतर भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहायला लागले. सन २००० च्या आसपास अर्थिक उदारीकरणाला मूर्त स्वरुप आले. त्यानंतर अनेक परदेशी विमा कंपन्या देशी कंपन्यांचा हात हातात धरून भारतात आल्या. त्यांनी नव्या 'मार्केटींग'च्या सर्व पध्दती अंमलात आणून आयुर्विम्याबद्दल एक जागरुकता आणली. तोपर्यंत आयुर्विम्याच्या क्षेत्रात फक्त -एलआयसी - भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यरत होते. आजही खाजगी विमा कंपनीची पॉलीसी घेतली तरी बोलताना ' मी बजाज कंपनीची एलआयसी घेतली' असेच संभाषण तुमच्या कानावर पडेल.
वाचकहो, एलआयसी सोबतच आपले पोस्ट ऑफीसही आयुर्विम्याच्या अनेक उत्तम पॉलीसी देते याची आजही बर्याच लोकांना माहिती नाही. त्यामागे जाहिरातींचा अभाव- मर्यादीत मार्केटींग टीम आणि अशी बरीच कारणे आहेत. भारत डाक विभागाच्या टपाल जीवन विमा योजना हा आजच्या आमच्या लेखाचा विषय आहे. या विमा योजनांना काहीजण पीएलआय म्हणजे पोस्टल लाइफ इन्शुरन्स या नावाने ओळखत असतील. या लेखात टपाल विमा किंवा पोस्टाचा विमा असा उल्लेख केला आहे.
एक महत्वाची बाब या लेखाच्या सुरुवातीला तुमच्या नजरेस आणून देऊ इच्छितो, ती अशी की टपाल विमा योजना फक्त राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचार्यांपुरतीच मर्यादीत आहे हा सर्वांचा गैरसमज आहे. निमशासकीय कर्मचारी, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, राष्ट्रीयकृत बँका, महानगरपालिका, तालुका आणि ग्रामपंचायत, जिल्हापरिषद यामध्ये काम करणार्या सर्व कर्मचार्यांना हा विमा घेता येतो. प्रश्न असा आहे की खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांना या टपाल विम्याचा वापर कसा करून घेता येईल. तर वाचकहो, नव्या नियमानुसार स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत कंपन्यांच्या कर्मचार्यांना पण या टपाल विमा योजनेचा फायदा मिळू शकतो.
पोस्टाच्या विमा योजना विकत घेण्यात ग्राहकाला सगळ्यात मोठा फायदा असा की, पैसे गडप होण्याची- बुडण्याची भितीच नाही. या योजना भारत सरकारच्या असल्याने प्रत्येक रुपयाच्या मागे सरकारी सुरक्षा आहे. अशीच सुरक्षा एलआयसीच्या पॉलीसीत आहे, परंतु येऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या प्रस्तावात हा फायदा मिळेल अथवा नाही याबद्दल शंका आहेच.
आता दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की, पोस्टाच्या सर्व विमा योजनांचे दर इतर कोण्त्याही विमा कंपनीपेक्षा कमी आहेत. खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्या त्यांच्या अभिकर्त्याला (Agent) भरमसाठ कमीशन देतात. त्यांच्या टीमसाठी देशी परदेशी जाण्याच्या स्पर्धा आयोजित करतात. शेवटी या सगळ्याची किंमत ग्राहकालाच भरावी लागते. पोस्टाच्या अभिकर्त्याला हे फायदे दिले जात नाहीत, त्यामुळे ग्राहकांचा खर्च कमी होतो. साहजिकच विम्याचा हप्ता पण कमी असतो.
इतर विमा कंपन्यांकडे जी सुविधा नाही आणि दिली जात नाही ती 'पासबुक' सुविधा पोस्टाच्या विम्यात आहे. हप्ता भरल्यावर बचतखात्याच्या पासबुकासारखीच भरलेल्या हप्त्याची नोंद या पासबुकात केली जाते. सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्यांची वारंवार बदली होते. त्यांना बदली झाल्यावर विम्याचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न छळत असतो. पासबुकाच्या सोयीमुळे जवळच्या कोणत्याही पोस्टात जाऊन हप्ता भरता येतो. कर बचतीसाठी विमा घेण्याकडे बर्याच ग्राहकांचा कल असतो. पोस्टाच्या विमा बचतीला सेक्शन ८० चे सर्व फायदे लागू होतात. त्यामुळे कराचे व्यवस्थापन करण्याची गरज असेल तर टपाल विमा योजनेचा फायदा मिळू शकतो. पासबुकात असलेली एंट्री हा करबचतीसाठीचा पुरेसा पुरावा असतो.
सध्या एकूण ६ योजना पोस्टाच्या विमा योजनेत आहेत :
१. संपूर्ण जीवन विमा म्हणजे व्होल लाइफ पॉलीसी.
२. परिवर्तन संपूर्ण जीवन विमा योजना म्हणजेच कन्व्हर्टीबल व्होल लाइफ पॉलीसी. (अशीच योजना एलआयसीकडे होती. त्यांनी ती योजना बंद केली आहे.)
३. संतोष - मुदतीचा विमा म्हणजेच एंडोवमेंट स्कीम.
४. सुमंगल -प्रत्याशित मुदतीचा विमा
५. युगल सुरक्षा- पतीपत्नीचा एकत्र विमा (दोघांपैकी एकजण शासकीय - निमशासकीय कर्मचारी असणे आवश्यक.)
६. मुलांसाठी विमा योजना : जर तुम्ही टपाल विमाधारक असाल तरच ही पॉलीसी मुलांसाठी घेता येते.
आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू या. या योजनेत परतावा किती मिळतो. टपाल विमा योजनांचा खर्च कमी असल्याने परतावा खूपच चांगला मिळतो. संपूर्ण जीवन विमा योजनेत विम्याच्या दर हजारी रकमेवर रुपये ८५ परतावा मिळतो. इतर योजनांमध्ये रुपये ५८ इतका परतावा मिळतो. तुम्ही इतर कंपन्यांच्या सोबत तुलना करून बघा. पोस्टाचा विमा अधिक फायदा देतो. पोस्टाच्या विम्यात एकच मर्यादा खटकण्यासारखी आहे ती म्हणजे जास्तीतजास्त ५० लाखांचाच विमा घेता येतो. कदाचित येत्या काळात ही मर्यादा पण दूर होईल असे वाटते. ही त्रुटी वगळता इतर कोणत्याही विमा योजनेपेक्षा पोस्टाचा विमा अधिक फायदेशीर आहे हे वेगळे सांगायला नको.
वाचकहो, तुम्हाला हा विमा घ्यायचा असेल तर एक अडचण जाणवेल, ती अशी की पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे अभिकर्ते तुम्हाला पटकन मिळणार नाहीत. त्यांची संख्या मर्यादीत आहे. यावर एक उत्तम उपाय म्हणजे टपाल खात्याचे पोस्टइन्फो हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करा. या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून तुमच्या आसपास असलेल्या अभिकर्त्याची माहिती सहजच मिळेल.
आयुर्विमा म्हटल्यावर ज्यांच्या कपाळाला आठ्या पडतात त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना : तुम्हाला आवडो न आवडो, आयुर्विमा घेणे आवश्यकच आहे. सतत पाठपुरावा करणार्या अभिकर्त्याचा तुम्हाला बर्याच वेळा राग येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा :
Hate insurance agents, no worries!
Do not hate insurance, that is worrisome!!
आणखी वाचा: