लॉकडाऊनचे १११ दिवस आणि १३० बोलकी अक्षरे!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/typography.jpg?itok=yb0GhJ1r)
या सक्तीच्या सामाजिक दुराव्याच्या काळात आपल्या सर्वांचे काम थबकले आहे. स्तब्ध झाले आहे. पण सर्जनशीलतेला ही बंधने मंजूर नसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे चित्रकार सुनिल धोपावकर! १११ दिवसांच्या लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळात त्यांनी १३० बोलक्या अक्षरांची निर्मिती केली आहे. आज काही निवडक नमुन्यातून श्री. सुनिल धोपावकर यांच्या निवडक टायपोग्राफीची अदाकारी बघूया!
धोपावकरांच्या चित्राक्षरांचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य आहे की त्यांची चित्राक्षरे मनात अनुभूतीची कंपने निर्माण करतात. पण मनावर आघात करत नाहीत. या अक्षरांना जोडलेल्या प्रतिमा अक्षरांसोबत एकजीव होतात. त्यांचे वेगळे अस्तित्व जाणवू देत नाहीत. अक्षरांना बोलके करण्यासाठी हाच प्रभाव अपेक्षित असतो. तो नेमका या अक्षरांमध्ये साधलेला आहे.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107874618_4711294555563392_3487380552057664549_o_0.png?itok=2Dndp2PL)
सुरुवात कोरोनाच्या चित्राक्षरापासून करू या . या चित्रात विषाणूची आतापर्यंतची वारंवारता चित्रित झाली आहेच, पण बंदूकीची फैर झाडल्यासारखे छिन्नविच्छीन झालेले आयुष्य त्यातून चित्रित होते आहे.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107755551_4711297472229767_5434347117208030159_o_0.png?itok=qvuwoKFQ)
त्यानंतर सुरु झाली अस्थायी कामगार आणि स्थलांतरितांची ओढाताण! आपल्या गावापर्यंत पोहचण्यासाठीची दिवसरात्र धडपड, त्यांची 'पायपीट' या चित्राक्षरातून दिसते आहे.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107632909_4711298612229653_6049330507077437563_o_0.png?itok=m9s6PBAh)
कोरोनाने केलेला आघात हा जगाच्या कल्पनेच्या पलीकडे होता. तो समजून घेण्यासाठी प्रबोधनाची गरज आपल्या सगळ्यांनाच होती. या प्रबोधनातूनच सगळ्यांची मने हतबल न होता संकटाला सामोरे जाण्यास तयार झाली.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107609527_4711303098895871_8057767537414254714_o_0.png?itok=reEILyJ1)
यानंतर बरेच दिवस आपण सगळेच कोंडीत अडकलो होतो. त्यातून प्रायोगिक सुटका म्हणून 'पुनश्च हरिओम' किंवा अनलॉक-१ चे दिवस सुरु झाले. या चित्राक्षरात उघडलेले कुलुप कसे वापरले आहे ते बघा.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/108013912_4711303558895825_7403235938435583688_o.png?itok=z_HnV3CL)
याच लॉकडाऊनच्या दरम्यान काही मनाला धक्का देणार्या घटना घडल्या. सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या ही त्यापैकी एक!
जितेजागते अस्तित्व एक क्षणात निखळणे हे अक्षर मूकपणे सांगते आहे.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/108225295_4711305668895614_459110052712669034_o.png?itok=D-RVFQwR)
या साथीचे ग्रहण लागलेले असतानाच आकाशात पण ग्रहण लागले होते. ग्रहणाचा अंधःकार आणि तो तात्पुरता आहे हे सांगणारे हे ग्रहण हे चित्राक्षर बघा.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/108397122_4711303842229130_7352798489880290834_o.png?itok=LJrYe7uM)
दु:खाच्या अंधारात पण अधूनमधून सुखाची अनुभुती देणारे काही दिवस येतातच. वेळेवर आलेला मान्सून हा त्यापैकीच एक अनुभव!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107667963_4711302278895953_4744048322455899858_o.png?itok=_uPQwweO)
वाचकहो, आतापर्यंत तुम्ही सुनिल धोपावकरांच्या अविष्काराची जी मालिका बघितली त्यावरून ती फक्त कोरोनाच्या बद्दल होती. पण त्यांचे काम त्यापलीकडेही आहे हे सांगणारे काही नमुने बघूया!
जर भविष्यात गूगलने मराठी जीमेल स्वतंत्र कार्यरत केली तर त्यासाठी ही नाममुद्रा अगदी योग्य असेल.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107707713_4711303312229183_2757055313991317326_o.png?itok=sUTWh-pp)
आणि मायक्रोसॉफ्टने विंडोजची पुढची आवृत्ती आणली तर ही मानमुद्रा अगदी 'फिट्ट' म्हणतात तशीच असेल.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/107832983_4711306005562247_8850827656895377550_o.png?itok=98N0rxS-)
मध्यंतरीच्या काळात आम्ही त्यांना सहजच विचारले होते की 'बोभाटा' कसे दिसते, यावर त्यांनी आमच्या प्रश्नाला एका चित्राक्षरातून उत्तर दिले होते, ते पण बघा!
सुनिल धोपावकर यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 97633 38020 या क्रमांकावर संपर्क करा.