काय आहे आरूषी-हेमराज दुहेरी हत्याकांड : वाचा सविस्तर...

मंडळी, संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरूषी तलवार हत्याकांड हे १६ मे २००८ रोजी घडलं होतं. आज १० पेक्षा जास्त वर्षांनंतरही या केसचा समाधानकारक निकाल लागलेला नाही. काय आहे हे रहस्यमय आरूषी - हेमराज हत्याकांड? या जाणून घेऊया...

स्रोत

सीबीआयच्या म्हणण्यानुसार १६ मे २००८ च्या रात्री नोएडाच्या सेक्टर २५ (जलवायू विहार) मध्ये पेशाने डॉक्टर असलेल्या तलवार दांपत्याने स्वतःच्याच घरी आपली १४ वर्षांची मुलगी आरूषी आणि ४२ वर्षांचा नोकर हेमराजचा खुन केला आणि पुरावे नष्ट केले.

आरूषीचे वडील डॉ.राजेश यांनी आपल्या मुलीच्या खुनाचा संशयीत म्हणून हेमराजच्या नावाने पोलिसांकडे तक्रार केली. पण दुसर्‍याच दिवशी पोलीसांना हेमराजचा मृतदेह राजेश यांच्याच घराच्या छतावर सापडला.

या घटनेला अनेक रहस्यमय वळणं लागली. या दुहेरी खुनात नोकर हेमराजच्या साथीदारांचा हात असणे, बलात्कारानंतर हत्या होणे, अशा बातम्यांसोबतच तलवार दांपत्यानेच हे खून केल्याची  शक्यताही वर्तविण्यात आली. मिडीयाच्या दबावामुळे हे प्रकरण दाबता आलं नाही.

वारंवार चौकशी केल्यानंतल पोलीसांनी अॉनर कीलींगची शक्यता वर्तवत डबल मर्डर केसमध्ये डॉ. राजेश तलवारला अटक केली. 

स्रोत

२९ मे २००८ रोजी ऊ. प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी ही केस सीबीआयकडे सोपवली. सीबीआयने केलेल्या नार्को टेस्ट आणि लाय डीटेक्टर चाचणीमध्ये राजेश यांचा कंपाऊंडर कृष्णा दोषी ठरवला गेला. त्याला अटक करून राजेश यांना जामिन देण्यात आला. पण चार्जशीट फाईल न केल्यामुळे कृष्णा आणि अन्य नोकरांनाही जामिन मिळाला. 

२००९ मध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी पहिली सीबीआय टिम हटवून दुसरी टीम नियुक्त करण्यात आली. या टीमने डॉ. तलवारची नार्को टेस्ट केली आणि सीबीआय कोर्टाकडे अहवाल सादर केला. यात तलवार यांना आरोपी घोषित करण्यात आलं.

सीबीआयच्या दाव्यानुसार मध्यरात्री आरूषीच्या खोलीमध्ये डॉ. राजेश तलवार यांना आपली मुलगी आरूषी व नोकर हेमराज आपत्तीजनक अवस्थेत दिसून आले. राग अनावर झाल्याने त्यांनी गोल्फ स्टीक घेऊन दोघांवर वार केले. यात आरूषी मृत झाली तर हेमराज बेशुद्ध झाला. यानंतर हेमराजचा टेरेसवर खून करण्यात आला. आरूषीची आई नुपूर यांनीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

स्रोत

९ फेब्रुवारी २००९ रोजी गाझियाबादच्या विशेष न्यायालयाने तलवार दांपत्यावर पुरावे नष्ट करणे आणि आरूषी हत्याकांडात सहभागी असल्याच्या आरोप सिध्द झाला. आपल्यावर लावलेल्या आरोपांविरूध्द तलवार दांपत्याने अलाहाबाद हायकोर्टात अपिल केले. अलाहाबाद हायकोर्टाने हे अपिल फेटाळून लावल्यानंतर तलवार दांपत्याने सुप्रिम कोर्टामध्ये अर्ज केला.

२०१२ म्हणजेच खुनानंतर ४ वर्षांनी आरूषीची आई नुपूर तलवार हिने कोर्टासमोर शरणागती पत्करली. २६ नोव्हेंबर २०१३ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तलवार दांपत्याला दोषी ठरवत आजीवन तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

२१ जानेवारी २०१४ रोजी तलवार दांपत्याने सीबीआय कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. सप्टेंबर २०१६ पासून सुरु असलेल्या या सुनावणीवर अलाहाबाद हायकोर्टाने आज निकाल देत तलवार दांपत्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

स्रोत

नक्की काय झालं असावं हे माहीत नाही, पण या खूनखटल्यातल्या पुराव्यांत आणि जबाबांमध्ये बरेच बदल होताना दिसले. गच्चीवर राजेश यांच्या रक्ताने माखलेल्या हाताचे ठसे मिळणे, हेमराजच्या रक्ताने माखलेला उशीचा अभ्रा शेजारच्या घरचा नोकर कृष्णाच्या खोलीत मिळणे, आरुषीच्या मानेवर अगदी निष्णात सर्जनने केल्यासारख्या सर्जरीच्या हत्याराच्या खुणा असणे, त्यात त्यांचे दुसऱ्या डॉक्टरसोबत असलेले विवाहबाह्य संबंध...  आरुषीची आई पूर्वाश्रमीची चिटणीस म्हणजेच मराठी आहे. तिच्या परदेशातल्या बहिणीने तिच्या विरुद्ध म्हणणे मांडले होते. बरेच पुरावे आणि इतर गोष्टी तलवारांच्या विरोधात होत्या. तरीही कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केलीय... 

अशा विविध रहस्यमय रंगांनी रंगलेल्या या मर्डर मिस्ट्रीवर रहस्य आणि तलवार नावाचे दोन चित्रपटही बनवले गेलेत.

सबस्क्राईब करा

* indicates required