computer

तुमच्या लहानपणीची आठवण असलेली ॲटलास सायकल आता इतिहासजमा होणार? का?

ॲटलास सायकल आठवते? तिच्यावर घोड्यावर बसल्यासारखे ताठ बसायला लागायचे. नंतरच्या काळात कितीही स्टायलिश सायकली चालवल्या असल्या तरी तुम्ही चालवलेली पहिली सायकल कदाचित ॲटलासचीच असेल किंवा फारतर हर्क्युलिसची असेल. ताशी एक दोन रुपये भाड्याने आणलेली, नाहीतर कुणा मोठ्या माणसाची मधूनच पाय टाकून बूड तिरके करुन चालवलेली ॲटलास सायकल!! आज जे कोणी पंचविशी किंवा त्यापुढचे असतील त्यांना ऍटलास सायकल म्हटल्याबरोबर हेच जुने दिवस आठवतील. आजही कित्येकांना सुनील शेट्टीने ऍटलासची केलेली जाहिरात आठवत असेल. मजबुती म्हणजे ॲटलास हे समीकरण रूढ झाले होते. भारतातील मध्यमवर्गाचा कधीकाळी अविभाज्य भाग बनलेली ही सायकल मात्र आता दिसणार नाही. हो, हे खरे आहे. ऍटलास कंपनीने आपली शेवटची फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढच्या काळात आपली ही लाडकी ॲटलास इतिहास बनून राहणार आहे. कित्येकांना घरी भांडून, कितीतरी दिवस स्वतः मेहनत करून मग विकत घेतलेली ही सायकल आठवत असेल. या सायकलने एका अख्या पिढीला कित्येक आठवणी दिल्या आहेत. पण आता स्वतः ही सायकल एक आठवण बनून जाणार आहे.

७० वर्षांपूर्वी हरियाणामधल्या सोनिपत येथे या कंपनीची सुरुवात झाली होती. तेव्हापासून ही सायकल आजवर भारतातील लोकांच्या परिवाराचा भाग असावा अशीच झाली होती. एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेली कंपनी वर्षभरात २५ एकरांत पसरली होती. पहिल्याच वर्षी या कंपनीच्या तब्बल १२ हजार सायकली विकल्या गेल्या होत्या. पुढील काही वर्षांत अगदी परदेशात देखील आपली लाडकी ॲटलास दिमाखात फिरायला लागली होती.

१९७८ साली झालेल्या एशियन गेम्समध्येसुद्धा ऍटलासच्या सायकलींचा वापर करण्यात आला होता. या सायकलची विक्री पुढे इतकी वाढली होती की सुनील शेट्टी, सानिया मिर्झा, अभिनव बिंद्रा यांसारख्या दिग्गजांना ॲटलासच्या प्रसिद्धीसाठी मैदानात उतरवण्याएवढी मोठी ही कंपनी झाली होती. नोबेल विजेते अमर्त्य सेन हे आपल्या संशोधनासाठी ऍटलास सायकलवर फिरत असत. ही अमर्त्य सेनांची ॲटलास सायकल तर चक्क स्टॉकहोमच्या नोबेल म्युझियममध्ये आजही तुम्हांला लावलेली दिसेल.

पण मोटर सायकलींचा जमाना आला तशी या सायकलची मागणी कमी व्हायला लागली. २००४ सालापासूनच या कंपनीला अडचणी यायला सुरुवात झाली होती. पण त्यांनी कशीबशी इतकी वर्षे कंपनी टिकवून ठेवली. साहिबाबाद इथे असलेली आपली शेवटची फॅक्टरी बंद करताना कंपनीने म्हटले आहे की,"आम्हाला रोजच्या व्यवहारासाठी पैशांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे. कच्चा मालसुद्धा विकत घेतला जात नाहीये. अशा परिस्थितीत कंपनी चालवणे शक्य नाही."

स्वीडनच्या नोबेल म्युझियमपासून भारतातल्या खेड्यांपर्यंत आजवर दिमाखात उभी असलेली या ॲटलास सायकल आता मात्र एक नॉस्टॉल्जिया म्हणून उरणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required