computer

'बजाऊ लाऊत’ - २००४ च्या प्रलयकारी भूकंपातून जिवंत वाचलेली एकमेव ‘समुद्री भटकी जमात’ !!

२६ डिसेंबर, २००४ रोजी हिंदी महासागरात आलेला भूकंप हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप होता. या भूकंपाचं केंद्रस्थान इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटानजीक होतं. ह्या भूकंपानंतर त्सुनामीचं अक्षरशः तांडव सुरु झालं. इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, थायलंड अशा १४ देशांमध्ये त्सुनामीने तब्बल २.३ लाख लोकांचा बळी घेतला. या प्रलयातही एक आदिवासी जमात मात्र आश्चर्यकारकरीत्या तग धरून राहिली. त्यांनाच खऱ्या अर्थाने समुद्राचा बदलणारा नूर समजला होता. ही जमात म्हणजे इंडोनेशियाची ‘बजाऊ लाऊत’ जमात.

चला तर जाणून घेऊया समुद्रावर राहणाऱ्या एकमेव भटक्या आदिवासी जमातीबद्दल. 

‘बजाऊ लाऊत’ ही आज एकमेव अशी भटकी जमात उरली आहे जी समुद्रावर राहते. या जमातीचं समुद्र हेच घर आहे. त्यांच्याकडे मासेमारीसाठी ‘लेपा लेपा’ नावाची निमुळत्या आकाराची होडी असते. अशाच आणखी एका होडीवर त्यांचा सगळा संसार असतो. आता हल्ली समुद्रातच बांबूच्या आधारे घरेही बांधण्यात आली आहेत. मासेमारी, समुद्रातले मोती शोधणे इत्यादी कामे ते करत असतात. मासेमारीची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. ते पाना नावाच्या भाल्यासारख्या अवजाराने नेम धरून मासे पकडतात. या जमातीतील लहान मुलंही पट्टीचे जलतरणपटू असतात राव. शार्क सोबत खेळणारा हा लहान मुलगा पाहा !!

मंडळी, तुम्हाला समजलं असेलच की समुद्रावर राहणारे हे लोक क्वचितच समुद्रावरून जमिनीवर पाय ठेवत असतील. असं असूनही त्यांनी चक्क त्सुनामिला तोंड दिलं. ही अविश्वसनीय गोष्ट वाटते नाही का ? जेम्स मॉर्गन या फिल्म डिरेक्टरने या जमातीचं आयुष्य जवळून पाहिलं आहे. या जमातीने त्सुनामीच्या काळात जीव कसा वाचवला याबद्दल जेम्स सांगतो की “बजाऊ लाऊत जमातीतील लोकांनी समुद्राला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखलं आहे की त्सुनामीच्या फार पूर्वीच त्यांनी जमिनीवर स्थलांतर केलं होतं.’ समुद्राशी असलेलं हे नातं अनेक वर्षांपासूनच्या वास्तव्यातून निर्माण झालं आहे.

जेम्सने टिपलेले ‘बजाऊ लाऊत’ जमातीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचे हे फोटो पाहा.

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

आपण फोटो मध्ये पाहत असलेली ही पिढी कदाचित समुद्रावर आयुष्य घालवलेली शेवटची पिढी ठरू शकते. शेवटची पिढी ? का ? खरं तर याचं कारण ते स्वतःच आहेत.

बाजाऊ लाऊत जमात का संपुष्टात येणार आहे ?

मंडळी, इंडोनेशियाच्या ज्या लहानशा भागात बजाऊ लाऊत’ राहतात तिथे एकेकाळी त्यांच्यासारख्या पुष्कळ जमाती होत्या. पण आधुनिक काळात त्यातील बरेचसे आदिवासी स्वतःहून किंवा शासनाच्या जबरदस्तीने जमिनीवर कायमचे स्थाईक झाले. विशेषतः २००४ च्या त्सुनामी नंतर या आदिवासींना कायम स्वरूपी जमिनीवर स्थाईक करण्यात आलं. समुद्रावर भटकणाऱ्या जमाती संपल्या त्याचं हे एक कारण.

बजाऊ लाऊत जमात ही मुख्यत्वे मच्छिमारीवर जगत आलेली आहे. जवळच्या बाजारात जाऊन मासे व मोती विकणे आणि त्यातून पैसे कमावणे हा त्यांचा दिनक्रम. वर उल्लेख केलेल्या पाना नावाच्या भाल्या सारख्या अवजाराने किंवा जाळीने ते लोक मासेमारी करत आलेले आहेत. पण आजच्या काळात या पारंपारिक अवजारांची जागा चक्क डायनामाईटने घेतली आहे.

मंडळी, आपण जे हल्ली शोभिवंत मासे पाहतो ते मासे विकण्याचं काम बजाऊ लाऊत जमात करत आहे.  शोभिवंत मासे हे हॉंगकॉंगहून जगभरात पाठवले जातात. हॉंगकॉंग मधल्या बाजारात येणाऱ्या माश्यांपैकी तब्बल ५०% मासे हे इंडोनेशिया भागातून येतात. हा आकडा गाठण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर हा अनिवार्य झाला आहे. याला बजाऊ लाऊत जमातही बळी पडली यात नवल काय.

 

या जमातीतल्या अनेकांना डायनामाईटमुळे शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत. हे व्यक्तिगत संकट सोडलं तरी समुद्रावर येणारं संकट ही आणखी एक समस्या आहे. आजच्या घडीला इंडोनेशिया भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत आहे की मासे आता दुर्मिळ होऊ लागले आहेत. पोटाचा प्रश्न असल्याने बजाऊ लाऊत मासेमारी सोडू शकत नाही आणि पारंपारिक पद्धत मोडून जमिनीवर स्थाईक होऊ शकत नाही. असा हा अजब पेच आहे.

मंडळी, एकंदरीत बजाऊ लाऊत जमातीचा ऱ्हास आणि जलजीवनाची हानी या गोष्टी हातात हात घालून चालल्या आहेत. एकूण निसर्गाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

चला तर या शेवटच्या पिढीचे हे अप्रतिम फोटो पाहून घ्या. यांचं जीवन पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटेल.

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

 

आणखी वाचा :

आजवर माणसांच्या संपर्कात न आलेल्या अंदमानच्या 'सेंटिनली' आदिवासी जमाती बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required