काचेचा झुलता पूल पाहण्यासाठी आता परदेशात जायची गरज नाही...भारतातच आहेत हे दोन पूल !!
पाश्चिमात्य देशातील काचेच्या इमारती आणि काचेचे पूल पाहून आपले डोळे विस्फारतात. प्रत्येकालाच प्रत्यक्ष या अशा ठिकाणी जाता येत नसले तरी इंटरनेटवरून अशा ठिकाणाचे फोटो पाहून आश्चर्य तरी वाटतेच. परंतु अशा काचेच्या पुलावरून चालण्याचा अनुभव घेण्यासाठी आणि खालच्या खोल दरीतील दृश्य पाहण्यासाठी आता परदेशातच गेले पाहिजे असे नाही. आपल्या देशातही असे दोन पूल सध्या तयार आहेत.
हो दोन पूल, बरोबर वाचलंत! यातील पहिला पूल उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे बांधण्यात आला आहे, ज्याला आपण सर्वजण लक्ष्मणझूला म्हणून ओळखतो. तर आता बिहार मध्ये देशातील दुसरा आणि बिहार मधील पहिला पूल बांधून तयार आहे. बिहारमधील काचेचा हा पूल बांधून तयार झाला असला तरी, अजून हा पूल पर्यटकांसाठी खुला झालेला नाही. मार्च २०२१ पर्यंत हा पूल पर्यटकांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.
बिहारच्या नालंदा भागातील राजगीर हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. अगदी पुराणातही राजगीरचा उल्लेख केलेला आढळतो. पटनापासून १०० किमी अंतरावर पाचही बाजूनी डोंगरांनी वेढलेले राजगीर हे पुराण काळापासून एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे इथे कोणत्या एकाच धर्माचे तीर्थस्थान नाही, तर जैन, बौद्ध आणि हिंदू अशा तिन्ही धर्मातील लोकांसाठी हे ठिकाण एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. विशेषत: बौद्ध संस्कृतीशी याचा जवळचा संबंध आहे. अशा या पर्यटन स्थळावर आता काचेच्या पुलाचाही आनंद घेता येणार आहे. काचेचा हा पूल २०० फुट उंच, ८५ फुट लांब आणि ६ फुट रुंद आहे. यावरून एकावेळी किमान ४० पर्यटक जाऊ शकतात.
याठिकाणी तुम्ही निसर्ग भटकंती आणि रोपवे सायकलिंगचाही अनुभव घेऊ शकता. या पुलासह एकूण ५०० एकर क्षेत्रात पर्यटनासाठी काही विशेष आकर्षण स्थळे निर्माण केली जाणार आहेत. इथल्या रोपवेवर १८ काचेची केबिन्स बसवले आहेत. एका केबिनमध्ये किमान आठ पर्यटक एकावेळी उभे राहू शकतात. पाच मिनिटांत ७५० मी. या वेगाने या ग्लास केबिन फिरतात. यातून तुम्ही निसर्ग सफारीचा आनंद घेऊ शकता.
दोरींच्या साहाय्याने रोप सायकलिंग करण्याचाही मस्त अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. ज्यांना साहसी खेळात भाग घ्यायला आवडतो त्यांच्यासाठी तर हे ठिकाण अगदी अवर्णनीय आनंदाचा खजिनाच ठरणार आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी सुरक्षित आणि सुसज्ज असे कॉटेजेस बांधण्याचे कामही सुरु आहे.
सिक्कीममध्येही असाच एक काचेचा पूल उभारण्यात आला आहे, मात्र त्याला खालून आधार देणारे अनेक खांब आहेत. पण ज्याला खालून अजिबात आधार देण्यात आलेला नाही असा हा पहिलाच पूल असणार आहे. कॅन्डीलिबर आर्म्सच्या स्वरूपाचा हा पूल आहे. डोंगराच्या एका टोकापासून निघून हा पन्नास फूट पुढे जाऊन थांबतो. या पुलाला कसलाच आधार देण्यात आलेला नाही. हेही याचे एक खास वैशिष्ट्य आहे. अजूनही याची लांबी वाढवली जाणार आहे. तसेच या पुलावर सेन्सरही बसवले जाणार आहेत, ज्य्यामुळे काचेवर पाय पडताच स्क्रीन फुटल्याचा आभास निर्माण होईल. या सेन्सरमुळे या पुलावरून चालताना अजूनच जास्त रोमांचक अनुभव येणार आहे. निसर्ग सफारीच्या या उपक्रमात निसर्गाचे जवळून दर्शन घेण्याचीही संधी मिळणार आहे.
याशिवाय लवकरच इथे झू सफारीही लाभ करून देण्यात येणार आहे. केबिनरोपवेसारख्या सोयी इथल्या पर्यटकांना पर्यटनाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय आनंद देतील, यात शंका नाही. या स्कायवॉकवरून राजगीरच्या निसर्गसौंदर्याचा आणखी मजेदार अनुभव घेता येईल. मुळातच निसर्गरम्य असलेल्या राजगीरच्या या पर्यटन स्थळामध्ये या स्कायवॉकमुळे आणखी भर पडणार आहे.
बिहारचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यात राजगीरचा क्रमांक वरचा असेल. बिहारमध्ये अजूनही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, ती सर्वच ठिकाणे अशा प्रकारे पर्यटकांसाठी सुसज्ज आणि अद्यावत करून पर्यटनाच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल निर्माण होईल अशी सरकारची योजना आहे.
कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर योजण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हा पर्यटन व्यवसायालाच बसला आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा काही वेगळ्या आणि अद्भुत क्लृप्त्यांची गरज आहेच. यामुळे कोलमडलेला पर्यटन व्यवसाय सावरायला मदतच होईल.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी