बोभाटा स्पेशल: १८ व्या वर्षी रतन टाटा कडून गुंतवणूक मिळवणाऱ्या या मराठी मुलाचे विचार आपण सगळ्यांनी वाचले पाहिजेत

सध्या अर्जुन देशपांडे या अवघ्या १८ वर्षांच्या उद्योजकाची सर्वत्र चर्चा आहे. रतन टाटांसारख्या आदरणीय व्यक्तीने त्याच्या उद्योगात गुंतवणूक करणे हीसुद्धा एक मोठी गोष्ट. ही घटना उद्योजकांसाठी आणि विशेषत: तरूण उद्योजकांसाठी खूपच महत्त्वाची आहे. अर्जुनचा उद्योग काय, त्याला हे सर्व करण्याची प्रेरणा कुठून मिळाली, त्याला पुढे काय करायचं आहे, रतन टाटांसोबत संपर्क कसा आला वगैरे वगैरे प्रश्न तुमच्या डोक्यात आले तसे आमच्याही मनात होते. म्हणूनच आम्ही सरळ अर्जुनशी संपर्क साधला आणि खास बोभाटाच्या वाचकांसाठी त्याची मुलाखत घेऊन आलो आहोत. 

मुलाखतीपूर्वी थोडं अर्जुनबद्दल. अर्जुन देशपांडे. ठाण्यात राहणारा अठरा वर्षांचा, बारावीची परिक्षा दिलेला मुलगा. त्याने दोन वर्षांपूर्वी, म्हणजे सोळा वर्षांचा असताना जेनेरिक आधार नावाची सर्वांना परवडतील अशी औषधं पुरवणारी मेडिकल शॉप्सची मालिका सुरु करण्याचा उद्योग चालू केला आहे. नुकतीच म्हणजे मे २०२० मध्ये रतन टाटांनी या मुलाचं कौतुक करून त्याच्या कंपनीत गुंतवणूक जाहिर केली आहे. अर्जुनचं या यशाबद्दल मनापासून कौतुक आणि अभिनंदन करून आमच्या बोभाटा प्रतिनिधीचा त्याच्यासोबत झालेला संवाद आम्ही इथे प्रश्नोत्तर रुपात देत आहोत.

अर्जुन, तू तुझ्या स्टार्टअपबद्दल काही सांगू शकशील का? ही कल्पना मुळात तुला कुठून सुचली? हा उद्योग कसा सुरू झाला? हे सर्व जेव्हा चालू झालं त्यावेळी तू केवळ १६ वर्षांचा होतास, तेव्हा तुझ्या मनात काय विचार होते? 

सर्वांना परवडतील अशी औषधे उपलब्ध करून द्यावे हे माझे ध्येय आहे. त्यातूनच या जेनेरिक आधार या माझ्या उद्योगाची कल्पना साकार झाली.  जेनेरिक आधार हा माझा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. त्याद्वारे औषधे बनवणारी कंपनी ते प्रत्येक भारतीयापर्यंत एक पुरवठ्याची साखळी मी तयार करत आहे. त्यातून आपण सामान्य नागरिकांना परवडतील अशी औषधे मिळवण्याच्या मार्गाचा पर्याय आपण उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी मी माझ्यापरीने औषधे बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये माझी एक इकोसिस्टिम बनवली आहे. भारतीयांच्या प्रगतीसाठी सध्या चालू असलेल्या सिस्टिममध्ये एक नाविन्यपूर्ण क्रांती घडवून आणण्याचा माझा विचार आहे. 

एक नवी इकोसिस्टिमही छान संकल्पना आहे. तू तुझी ही इकोसिस्टिम थोडक्यात समजावून सांगू शकशील का?

इकोसिस्टिममध्ये एखादी व्यक्ती किंवा संस्था दुसऱ्यावर अवलंबून असते. आपल्याकडे व्यापाराच्या दृष्टीने पाहायचं झालं तर B2B(बिझनेस टू बिझनेस) म्हणजेच औषधनिर्मिती करणारी कंपनी ते दुकानदार ही इकोसिस्टिम सर्वत्र दिसते. माझी इकोसिस्टिम B2B2C(बिझनेस टू बिझनेस टू कस्टमर) प्रकारात मोडते, म्हणजेच थेट औषधनिर्मिती करणारी कंपनी ते दुकानदार ते ग्राहकापर्यंत पोचते. त्यातून औषधनिर्मिती करणारी कंपनी, दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये येणारा वितरक हे प्रकरणच निकालात निघाल्याने औषधे कमी किंमतीत ग्राहकापर्यंत पोचू शकतात. पण वितरक नसणं हे किंमत कमी होण्याचं एकमेव कारण नाहीय. 

औषधे निर्माण झाली की त्यांचं ब्रांडिंग होतं, ब्रांड्स आले की मार्केटिंग-जाहिराती हे सगळं आपसूक येतं. या सर्व गोष्टींवरही कंपन्या बरेच पैसे खर्च करतात आणि आडवळणाने का होईना, हा खर्च पुन्हा ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. हे सर्व टाळलं गेलं, तर ग्राहकाला ही औषधे जवळजवळ मूळ दरात मिळू शकतील. त्यामुळं औषधं जेनेरिक स्वरूपात आणि थेट कारखानदाराकडून ग्राहकाला विकली जाणं या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 

जेनेरिक औषधांच्या बाबतीत उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या जगात कोविड १९ मुळे हायड्रोक्लोरोक्वीनची मागणी खूप जास्त आहे. भारत या औषधांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. आता हायड्रोक्लोरोक्वीन हे जेनेरिक नाव आहे, ब्रांड नाही. सगळेजण सध्या आम्हांला हायड्रोक्लोरोक्वीन हवंय असंच म्हणत आहेत आणि कुणीही कुठल्या विशिष्ट ब्रांडची मागणी करत नाहीय. या भूमिकेमुळे बराच फरक पडतो. याउलट आपल्या नेहमीच्या औषधांचं पाहा. आपण उदाहरणार्थ क्रोसिन मागतो. पण मुळात क्रोसिन हे औषध नाही, तर ब्रांडचे नाव आहे आणि त्यातला प्रमुख औषधी घटकपदार्थ पॅरासिटामॉल आहे. माझ्या इकोसिस्टिममध्ये आम्ही प्रमुख औषधी घटकपदार्थ म्हणजेच उदाहरणार्थ पॅरासिटामॉलवर अधिक भर देऊन लोकांना उत्तम प्रतीचं आणि कमी किंमतीतलं, वाजवी दरातलं औषध देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 

या इकोसिस्टिमच्या मॉडेलबद्दल मी एक प्रश्न विचारु इच्छितो. जेनेरिक आधार ब्रँडचे काही मेडिकल दुकानं दिसली. त्यांचं मॉडेल काय आहे? फ्रँचाईझी मॉडेल आहे की कसे? त्याबाजूने तू हे नक्की कसं हाताळत आहेस हे सर्व समजून घ्यायला आवडेल.

आपल्या आजूबाजूला बरीच लहानमोठी मेडिकलची दुकानं दिसतात. यांतल्या छोट्या मेडिकल शॉप्सना माझ्या स्टार्ट अपमध्ये सामावून घ्यायचा मानस आहे. मोठी मेडिकल्स दुकानं, त्यांच्या मोठ्या चेन्स, मॉल्स, ऑनलाईन फार्मसीज या सर्वांसोबत या छोटेखानी दुकानदारांना स्पर्धा करणं खूप अवघड जातं. म्हणून त्यांना जेनेरिक आधारच्या छत्राखाली घेऊन फ्रँचाईझीच्या माध्यमातून एकत्र आणत आहोत. जेनेरिक आधारमुळे या छोट्या मेडिकल शॉप्सचा धंदाही वाढेल आणि आपण आपल्या ग्राहकापर्यंत पोचू शकू. 

ही एकत्रीकरणाची कल्पना छान आहे. पण सगळ्या ग्राहकांपर्यंत पोचायचं असेल तर भारतभर पसरावं लागेल. सध्या साधारण किती शहरांमध्ये जेनेरिक आधार पोचलं आहे?  किती स्टोअर्स आहेत?

मुंबई, ठाणे, ओदिशातलं भुवनेश्वर, बंगळुरू इथं सध्या जेनेरिक आधारची दुकानं आहेत. पण लवकरच महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश तमिळनाडूतल्या बऱ्याच शहरांत विस्तार करणार आहोत. 

गावागावांत विस्तार म्हणजे छोटेखानी मेडिकल शॉप दुकानदारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. ते तुमच्या संपर्कात येऊ शकतात. आमच्या मेडिकल दुकानदार वाचकांनी तुम्हांला संपर्क करायला हरकत नाही. तुम्ही सध्या अशा लोकांच्या शोधात आहात, हो ना?

नक्कीच. आणि अशा काही दुकानदारांना अडचणी असतील त्यांनाही आपण मदत करू शकतो. 

मी तुझी एक मुलाखत पाहिली, त्यातलं मला एक वाक्य आवडलं. त्यात तू काम शोधणाऱ्यापेक्षा काम देणारा व्हायला आवडेल असं काहीतरी म्हणाला होतास. मला या वाक्यामागची तुझी विचारधारा समजून घ्यायला आवडेल. तुझी याबाबतीत नक्की भूमिका काय आहे आणि मराठी तरूण मित्रांना काय सांगशील? आज तुला हा बिझनेस सुरु करून दोन वर्षे झाली. अठराव्या वर्षीच तू एका उंचीवर जाऊन पोहोचला आहेस. एक जॉब क्रिएटर म्हणून आणि ज्यांना आपला व्यवसाय चालू करायचा आहे त्या उत्साही लोकांना तू काय सांगशील?

आजच्या ती तरूण पिढीला माझं एकच सांगणं आहे की भारतीयांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करणे हे आपले एक ध्येय असले पाहिजे. आपण जॉब शोधणारे नाही, तर जॉब तयार करणारे बनले पाहिजे. आपण सुजाण भारतीय नागरिकत्वाची जबाबदारी घेऊन नोकऱ्या तयार केल्या तर त्या माध्यमातून आपण आपल्या अर्थव्यवस्थेलाही सपोर्ट करु शकतो. माझ्यापुरतं बोलायचं तर जेव्हा मी कुणाला फ्रँचाईझी देईन, तेव्हा त्यातून नक्कीच काही रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्या हिशोबाने मी हा उद्योग वाढवून अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मी तर पुढं जाऊन असंही म्हणेन की तुम्ही तुमच्या नावीन्यपूर्ण संकल्पना सत्यात आणण्यासाठी तुमच्या वयाचाही बाऊ करू नका. जर तुमच्याकडे काही आगळ्यावेगळ्या आयडिया असतील तर केवळ आज माझं वय अमुकच आहे, मी हे कसं करु हा विचार करू नका. सरळ तुमच्या विचार आणि संकल्पनेवर काम करायला सुरुवात करा. 

व्वा. खूप चांगला विचार आहे. एज इस जस्ट अ नंबर हे जे लोक म्हणतात ते तू खरंतर सिद्ध करत आहेस. आता आपण ॲग्रीगेशन मॉडेल म्हणजे द्कानांच्या एकत्रीकरणाची कल्पना, त्या कडे पुन्हा एकदा वळूया. या सगळ्याची माहिती तू कशी कुठून मिळवलीस? तुला लोकांना परवडतील अशी औषधं लोकांपर्यंत पोचवायला हवीत हे कळलं, पण मग त्यावरचं उत्तर शोधण्यासाठीचा रिसर्च, अभ्यास, नक्की काय आणि कसं केलंस?कोणत्या पद्धतीने आणि कुठून ही सारी माहिती मिळवलीस?

 खरं सांगायचं तर काम करत गेलो, प्रश्न पडत गेले आणि उत्तरंही मिळत गेली. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.  मी वेगवेगळ्या देशांत सहलींसाठी जायचो तेव्हा मला तिथलं चित्र वेगळं दिसलं. अमेरिका, चीन वगैरे ठिकाणी लोकांना परवडेल अशी औषधं मिळताना दिसली. पण आपल्याकडे असं होतंच असं नाही. पण असं असूनही भारत बरीच औषधं निर्यात म्हणजे एक्सपोर्ट करतो. त्यामुळे जेव्हा मी या प्रश्नावर काम चालू केलं, लोकांपर्यंत कसं पोचायचं हा विचार करू लागलो, किरकोळ दुकानदारांना कशी मदत करू शकतो हा विचारही मनात होता. त्यावेळेस बऱ्याच गोष्टी समोर आल्या. आणि जेव्हा प्रत्यक्ष काम चालू केलं तेव्हा आणखी माहिती मिळत गेली आणि मी माझ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवत गेलो. 

तू १८ वर्षांचा आहेस, १२वीची परिक्षा देली आहेस. आपल्या साधारण मराठी कुटुंबात असतं की, "तुझी आयडिया वगैरे सगळी ठीक आहे. पण अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे." यातून खेळाडू आणि कुणीच सुटले नाही आहेत. तर असं असताना तू तुझं शिक्षण पूर्ण करण्याच्या विचारात आहेस की इतर प्रसिद्ध लोकांसारखा ड्रॉप आऊट व्हायचा विचार आहे?

शिक्षणाचा विषय निघतो तेव्हा मी असंच म्हणेन की आपण सतत काही ना काही शिकत असतो. महविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचं तर आहेच, पण शिक्षण हे काही फक्त शाळाकॉलेजांच्या चार भिंतींतच मिळतं असंही नाही. आपण आयुष्यभर शिकत असतो. ज्ञान हे सतत आपल्याला मिळत असतं. मी घरीही पुष्कळ पुस्तकं वाचतो. अगदी दररोज वाचतो. आपण शिक्षण आणि पदव्यांची तुलना करता कामा नये. या दोन्ही महत्त्वाच्या पण एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं शिक्षण महत्त्वाचं आहे, आपण ते घेतलंच पाहिजे. जे मीही करत आहे. 

माझा प्रश्न असा आहे की तू त्या डिग्रीच्या मागे लागणार आहेस का? की सध्या जे करत आहेस त्यावर लक्ष्य अधिक केंद्रित करण्याचा विचार आहे? यात समतोल राखणं बरेचदा अवघड होतं. 

हो, काम आणि शिक्षण दोन्ही एकदम सांभाळणं अवघड आहे खरं. पण आजपर्यंत मी हे दोन्ही चांगलंच सांभाळू शकलो आहे. मी डिग्रीच्या मागे नाही, मला संधी मिळाली तर मी नक्कीच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही घेईन. आताही मी एम. बी. ए.ची पुस्तकं वाचत आहे, मोठमोठ्या कोर्सेसची पुस्तकं वाचत आहे. त्यामुळं मला संधी मिळाली तर डिग्री नक्कीच घेईन. माझा पदवी शिक्षणाला विरोध नाहीय, त्यामुळे संधी मिळाली तर मी नक्कीच शिक्षण पुढे चालू ठेवेन.

या सगळ्या धाडसी उपक्रमासाठी तुला घरून कसा सपोर्ट मिळाला आहे? विशेषत: आईबाबांचा आणि आजूबाजूच्या लोकांच्या पाठिंब्याबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल.  मराठी कुटुंबात स्वत:चा व्यवसाय चालू करण्याची वृत्ती तशी कमी असते. तू जेव्हा पहिल्यांदा आयडिया सांगितली तेव्हा घरच्यांचं काय म्हणणं होतं? तुझी आई फार्मा इंडस्ट्रीत काम करते. त्यांची या सर्व प्रकाराबद्दल काय प्रतिक्रिया होती? एकूणच घरच्यांचा या सगळ्यांमध्ये काय भूमिका आहे?

घरच्यांच्या बाबतीत बोलायचं हे फक्त मराठीच नाही, तर भारतभरातल्या सर्व कुटुंबांना लागू होतं असं मला वाटतं. जेव्हा नवीन काहीही करायचा विचार करतो तेव्हा आधी घरच्यांना समजावून सांगावं लागतं. पण जर तुमची आयडिया चांगली असेल, तर घरचे नक्कीच ती आयडिया उचलून धरतात. माझ्या आईबाबांना माझी ही संकल्पना खूप आवडली होती.  त्यामुळे त्यांचा मला पाठिंबा होता. मात्र आज जे काही आहे, ते सगळं माझ्या स्वत:च्या हिंमतीवर उभं केलं आहे. 

तुला या उद्योगाची व्याप्ती नक्की कशी वाढेल असं वाटतंय? कारण कोणत्याही उद्योगात तो सुरू करणं आणि तो वाढेल अशा बिंदूपर्यंत पोचणं हे एक असतं आणि वेगवेगळ्या मितींमध्ये त्याची व्याप्ती वाढणं हे दुसरं आव्हान असतं. तर तुझे याबाबतीतल्या पुढच्या योजना काय आहेत? बिझनेस सिक्रेट्स टाळून तुला याबाबत काही सांगता येईल का? साधारण तीनेक वर्षांनंतर हा बिझनेस कुठे असेल याचं तू काही प्लॅनिंग केले आहेस का?

आता हे कोरोना प्रकरण कमी झाल्यावर पुढच्या तीनचार महिन्यांत आणखी काही शहरांत उद्योगाचा विस्तार करण्याचा मानस आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खूप शहरांतून फ्रँजाईजीच्या मागण्या आहेत, लोकांच्या वेगवेगळ्या औषधांसंबंधी च्या मागण्या आहेत. उद्योगासोबतच एक समाजसेवेचा भाग म्हणूनही आपण काम करत आहोत. तर लवकरात लवकर जितक्या शहरांत पोचता येईल, तितकं करायचं आहे आणि तीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असणार आहे. 

या क्षेत्रात तुला काही स्पर्धा आहे? तुला काही विशेष अशी स्पर्धा जाणवते का? 

मोठ्या फार्मा कंपन्यांसोबत तर औषधांच्या बाबतीत स्पर्धा आहेच. मात्र आपली आयडियाच इतकी नावीन्यपूर्ण आहे की तिथे मला कुठे स्पर्धा असेल असं काही वाटत नाहीय. आपलं सगळं लक्ष्य आपल्या ध्येयावर केंद्रित असेल तर स्पर्धेचा तुमच्या उद्योगावर काही विपरित परिणाम होऊ शकतो मला वाटत नाही.

अत्यावश्यक सेवा या सदराखाली येत असल्याने कोविडचा या औषधांच्या उद्योगावर खूप वाईट परिणाम झाला नाहीय. पण पी. एम. केअर फंडाला तू तीन महिन्यांचा पगार दिलास. ही आयडिया कुठून आली? तसं आधीपासूनच तू समाजसेवेत असल्याने हे तर्कसुसंगत आहे, पण या एकंदर परिस्थितीकडे तू कसं पाहात आहेस? 

आपण आपल्या समाजाचे काही देणं लागतो. आणि ते ऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ते करताना एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला खूप काही महान करण्याची गरज नाहीय. देशासाठी अगदी लहानात लहान वाटा जरी उचलला, तरी आजच्या घडीला ते खूप महत्त्वाचं आणि परिणामकारक ठरणारं आहे. सध्याच्या घडीला पोलिस, आरोग्यसेवक सगळेजण काम करत आहेत. त्यामुळे आपल्याकडून जे होणं शक्य आहे, ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

या कोविडमुळे तुमच्या उद्योगाच्या सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळीवर किंवा इतर काही गोष्टींवर काही विपरित परिणाम झाला आहे का?

विपरित नसला तरी काहीएक. परिणाम आमच्या उद्योगावरही झाला आहेच. सध्याच्या काळात दुकानांमधले कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. पण आहे त्या परिस्थितीत आमची मेडिकल्स चालू आहेत. जितकं सुरळीत काम चालवता ये ईल, तितकं ते चालवण्याचा प्रयत्न चालूच आहे. 

रतन टाटांसोबतचा अनुभव कसा होता? संपर्क कुणी केला? हे सगळं कसं घडून आलं?

मी गेली दोन वर्षे सामाजिक जागरुकतेसाठी बरंच काम करत आलो आहे. मी काही आरोग्य शिबिरं आयोजित केले, २६ जानेवारी-१५ ऑगस्टला काही खास कार्यक्रम केले. हे सर्व मोठे लोक पाहात असतात. रतन टाटांसारख्या आदरणीय लोकांचंही याकडे लक्ष होतं. मला एके दिवशी त्यांच्याकडून अमक्या दिवशी भेटायला ये म्हणून फोन आला. एका एवढ्या यंग मुलाकडे त्यांचं लक्ष आहे हे पाहून मलाही तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. त्यांच्यासोबत पहिली मिटिंग २-३ तासांची झाली. माझा प्लॅन, हे बिझनेस मॉडेल आपण लोकांपर्यंत कसं पोचवू शकू या गोष्टी त्यांना तेव्हा खूप इंप्रेसिव्ह वाटल्या होत्या. त्यातूनच पुढच्या मिटिंग्ज होत गेल्या आणि जे घडलं ते तुमच्यासमोर आहे.

अर्जुनसोबतच्या या गप्पा छान रंगल्या. अवघ्या १६व्या वर्षी एक नवी संकल्पना मनात घेऊन या मुलाने दोनच वर्षांत तो नक्कीच पुढे जाऊन काहीतरी वेगळं करेल हे दाखवून दिलंय. त्याला त्याच्या कामासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद!!

 

सर्व फोटो स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required