computer

दिल्लीतल्या एकाच घरातल्या ११ जणांच्या एकत्र आत्महत्येचे गूढ!! कितपत उकललं, किती प्रश्न अद्याप बाकी आहेत?

अंधश्रद्धा हीच दृढ श्रद्धा वाटू लागते तेव्हा लोक कोणतेही कृत्य करण्यास धजावतात. अगदी महिना-दीड महिन्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात एका मुलाचा नरबळी दिल्याची घटना तुम्ही ऐकलीच असेल. अंधश्रद्धा जेव्हा कुणाच्याही मनाचा ताबा घेते तेव्हा त्यातून काय निष्पन्न होऊ शकते हे एक याचे ताजे उदाहरण! आजच्या तंत्रज्ञान युगातही अंधश्रद्धा लोकांवर इतकी हवी होते हे पाहून सखेद आश्चर्य वाटते.

दोन वर्षांपूर्वी अशाच अंधश्रद्धेतून दिल्लीतील बुरारी भागातील संत नगरात राहणाऱ्या भाटीया कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली होती. कुटुंब म्हणजे अगदी भारतीय कुटुंबपद्धतीला शोभणारे तीन पिढ्यांचे एकत्र कुटुंब. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य ७७ वर्षांची आजी होती, तर सर्वात लहान सदस्य म्हणजे तिचा पंधरा वर्षाचा नातू. दोन भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची दोन-दोन मुले, एक बहिण आणि तिची मुलगी असे एकूण अकरा जणांचे हे एकत्र कुटुंब आणि एकेदिवशी सकाळीच या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांनी पहिले. खरे तर आत्महत्या रात्रीच केल्या गेल्या होत्या. पण त्याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली

१ जुलै २०१८ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. आरुषी तिवारी मर्डर केसने जसे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते अगदी तसेच काहीसे याही घटनेबाबत घडले होते. एकाच घरातील ११ सदस्यांची पार्थिवे एकाचवेळी पाहून शेजाऱ्यांनाही धक्का बसला होता. साध्यासरळ आणि सधन कुटुंबात असे काही घडेल याची कुणी कल्पनाही केली नसेल. आजही शेजारी या घराजवळून जायलाही घाबरतात. भूतप्रेताच्या भीतीने नव्हे, तर त्या घटनेने त्यांच्या मनावर जो परिणाम झाला तो त्यांना आजही विसरता येत नाही. त्या घराजवळ येताच अनेकांना त्या भयाण दिवसाची आठवण होतेच होते.

या कुटुंबाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य भोपाल सिंह यांचे २००७ मध्ये निधन झाले होते. या कुटुंबातील ललित आपल्याला आपल्या वडिलांचे भूत दिसत असल्याचा दावा करत होते. ललित हे प्रचंड अध्यात्मिक होते. वडिलांच्या आत्म्याशी त्यांचा वरचेवर संवाद होत होता आणि त्यांनी वडिलांनी दिलेले आदेश आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले असल्याचे म्हटले जाते.

एकदा का मोक्ष मिळाला की पुन्हा मृत्यू नसतो, या अध्यात्मिक तथ्यावर या कुटुंबाचा विश्वास होता आणि मोक्ष मिळवण्याच्या धार्मिक विधीचा भाग म्हणूनच या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दहा शवांचे पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा या घराची तपासणी केली तेव्हा त्यात त्यांना काही डायऱ्या मिळाल्या आणि या सगळ्या गोष्टींची नोंद त्यात आधीच केली असल्याचे पोलिसांना आढळले.

ललित भाटीया हा या कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा. या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा दीपक आणि त्याचे कुटुंब राजस्थानला मूळ गावी राहतो, तर धाकटे दोन भाऊ व्यवसायाच्या निमित्ताने दिल्लीत राहत होते. राजस्थानला राहणाऱ्या दीपक यांना जेव्हा आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आत्महत्या केल्याचे समजले तेव्हा त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. एकीकडे पोलिसांची तपासणी, दुसरीकडे मिडीयाचा ससेमिरा अशात त्यांना आपल्या कुटुंबांसाठी शोक करण्याचा अवधीही मिळाला नाही, असे ते म्हणतात.

त्यांच्या मते आपल्या कुटुंबात कोणीही असे टोकाचे धार्मिक नव्हते, आपले कुटुंबीय धार्मिक कारणाने आत्महत्या करेल या गोष्टीवर आपला विश्वासच नाही पोलिसांनीच या घटनेला असे वळण दिले आहे असे त्यांचे मत आहे. मग या आत्महत्या नसून खून असावा का अशी शंका उपस्थित केली पण त्यांनी तीही धुडकावून लावली. "आमच्या कुटुंबाला कुणीही शत्रू नव्हते, आम्ही तर कुणाला अरे-तुरे ही करत नाही. मग संपूर्ण कुटुंब संपवण्या इतके कुणाशी वैर कशाला घेऊ", असे त्यांचे म्हणणे होते. आपल्या कुटुंबाच्या अशा मृत्यूमागे नेमके काय कारण असावे याचा उलगडा त्यानाही होत नाहीये.

पोलिसांच्या मते ललित हा एका मानसिक विकाराने ग्रस्त होता. आपल्या वडिलांशी आपले बोलणे होते हे सांगून तो घरांच्यांवर दबाव आणत होता. कलाकथित वडिलांच्याच आदेशानुसारच तो वर्तन करत होता आणि इतरांनाही त्याचप्रमाणे वर्तन करण्यास भाग पाडत होता.

संपूर्ण कुटुंबाच्या सामुहिक आत्महत्येच्या या घटनेने पोलिसांनाही बुचकळ्यात टाकले आहे. कारण इतर कोणत्याही गुन्ह्यात काही तरी साम्य असते, काहीतरी धागा सापडतो किंवा कुणी तरी साक्षीदार तरी सापडतो, तसे या घटनेत पोलिसांना कोणताच ठोस पुरावा सापडत नाहीये. त्या डायरीतील नोंदी एवढाच काय तो पोलिसांच्या हाती लागलेला पुरावा. हा पुरावा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखेच आहे.

या कुटुंबातील सदस्यांबाबत जेव्हा शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनीही हे कुटुंब कुठल्या तांत्रिक-मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे काही आढळले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तर हे गूढ आणखीनच वाढले. २०१८ पासून हे घर एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे रिकामेच पडले होते. तब्बल दीड-दोन वर्षांनी या घरात दोन भाडेकरू राहायला आले आहेत, तेही अगदी नाममात्र भाडे भरून. काही लोकांच्या मते या घरात त्या अकरा लोकांचे आत्मे अजूनही फिरतात. मात्र या घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी या सगळ्या अफवा असून आम्ही याची शहानिशा करूनच इथे राहायला आलो असल्याचे म्हटले आहे.

बुरारी भागातल्या या भाटीया कुटुंबासोबत नेमके काय घडले हे रहस्य कदाचित कधीच उलगडणार नाही. पण या घटनेचा पार्च्ड आणि राजमा राईस सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या लीना यादव यांच्या मनावर खूपच परिणाम झाला. या घटनेच्या मुळाशी जाऊन ती समजून घेऊन त्यांनी या घटनेवर प्रकाशझोत टाकणारी ‘द सिक्रेट हाऊस’ नावाची एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. ती या महिन्याचा ८ तारखेलाच नेटफ्लिक्सवरून प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही भयाण घटना चर्चेत आली आहे. या घटनेत नेमके काय झाले होते, कसे झाले होते, यात कुणाची काय भूमिका होती, अकराजणांपैकी एकानेही या अशा प्रकारच्या धार्मिक विधीला विरोध का केला नाही, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर नेटफ्लिक्सवरील ही डॉक्युमेंटरी काही प्रमाणात तुमच्या या शंकांचे निरसन करण्यात यशस्वी ठरेल.

तरीही हे घडले की घडवून आणले गेले? हे प्रश्न मात्र कायम अनुत्तरीतच राहतील की काय अशी शंका वाटते.

बुरारी सामुहिक आत्महत्येच्या या घटनेबाबत तुम्हाला नेमके काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required