अत्यंत दुर्लक्षित एरंडाचे तेल आज आंतरराष्ट्रीय प्रश्न का झाला आहे? याचा भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ?
एरंडेल म्हटलं की कोणाचही तोंड वाकडं होतं. आपल्या सर्वांनाच लहानपणी ते बळजबरीने पाजलेलं तेल आठवलं तरी पोटात मळमळ सुरु होते. तसंही या एरंडाच्या झाडाला फारशी 'इज्जत' नाहीच. त्याची मोठ्ठी हिरवीगार पानं गाढव पण खात नाही म्हणे. तुकारामांनी त्यांच्या अभंगात तर म्हटलंय की ‘उंच वाढला एरंड। तरि का होईल इक्षुदंड।’. बरं, एखाद्या संताने म्हटलंही असेल तर समजू शकतो. पण मराठीतल्या अनेक वाक्प्रचारात पण एरंडाला काहीच किंमत नाही असं दिसतं. 'पाडया रानांत एरंड बळी', 'ओसाड गांवीं एरंड बळी' असे अनेक उल्लेख वाचले की लक्षात येतं की एरंडाच्या झाडाला काहीच किंमत नव्हती.
पण... गेले काही दिवस एरंडाचे तेल म्हणजे एरंडेल हा आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल आहेच. तेलावरून आंतरराष्ट्रीय झगडे होतात ते कच्चे तेल कुठे आणि हे बुळबुळीत यक्क्क..एरंडेल तेल कुठे? "कहां राजा भोज और कहां गंगू तेली"! पण हा एरंडाचा तेलाचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे.
त्यासाठी या तेलाची थोडी अधिक माहिती घेऊया.
संपूर्ण जगाला जे एरंडाचे तेल लागतं त्यापैकी ९०% तेल भारतात तयार होतं. या तेलाच्या चढत्या उतरत्या भावामुळे त्यात प्रचंड सट्टा होत असतो. या सट्ट्याची पारंपारिक राजधानी आहे गुजराथमधील राजकोट! राजकोटचा सट्टा बाजार भारतातला सगळ्यात मोठा सट्टा बाजार आहे. फक्त तेलबिया आणि तेलं याचाच नव्हे, तर बर्याचशा कृषी उत्पन्नावर राजकोटमध्ये सट्टा खेळला जातो. गेली काही वर्षे कमोडीटी मार्केट अधिकृत झाल्यापासून त्या बाजारावरही राजकोटवाल्यांचीच सद्दी चालते. अधिकृत बाजार संपला की रात्री उशिरापर्यंत अनधिकृत सट्टा चालूच राहतो. त्यात बरीच वर्षे मुख्य सट्टा एरंड्याचा म्हणजे एरंडाच्या तेलाचा आणि गवार गमचा असतो. गवार गम म्हणजे गवारीच्या शेंगांपासून मिळणारा गोंद.
इथे महाराष्ट्रात असलेल्या माणसांना हे सट्टा खेळण्याचे 'आयटम' आहेत यावर विश्वास बसणं कठीणच आहे. पण राजकोट म्हणजे एरंड हे फार जुने समीकरण आहे. काही वेळा हा सट्टा इतका उतू जातो की सरकार या सट्ट्यावर बंदी घालते. १९६८, १९९५ या दरम्यान अनेक वर्षं सट्ट्याला परवानगी नव्हती. काही वर्षांपूर्वी अशीच घातलेली बंदी २०१६ साली उठवण्यात आली. पण हा सट्टा का चालतो त्याचे कारण असे की या तेलावर आपली मोनोपली आहे आणि पुरवठा पावसावर अवलंबून असतो. हा सट्टा इतका बेभरवशाचा असतो की घटकेत सौभाग्यवती, तर घटकेत गंगाभागिरथी अशी स्थिती असते.
आता एक गोष्ट सांगीतली तर विश्वास बसणार नाही. पण या सट्ट्यामुळे भारतातली एक मोठी कंपनी आज दिवाळखोर झाली आहे. या कंपनीचे आहे नाव रुची सोया. नावावरून फारसा बोध होणार नाही, पण 'न्युट्रेला' बनवणारी कंपनी म्हटलं की लक्षात येईलच. तर सोयाबीन आणी इतर स्वयंपाकघरात वापरली जाणारी ही कंपनी एरंडेलाच्या सट्टा केल्यामुळे बुडीत खात्यात गेली. जानेवारी २०१५ साली या कंपनीने कमोडीटी मार्केटमध्ये एरंडेल ₹५,१०० च्या भावाने खरेदी केले. त्यानंतर भाव कोसळतच राहिला आणि कंपनीला त्यांचा सौदा एकसारखा करण्याची संधीच मिळाली नाही. २०१६ मध्ये सगळे सौदे ₹३,०५१ च्या भावात विकावे लागले. एका क्विंटलमागे २,००० रुपयांचे नुकसान!! आधीच संकटात असलेल्या कंपनीला घरघरच लागली. थोडक्यात असे हे बुळबुळीत एरंडेल, पाय पडला की घसरणारच!
आपण आता मुख्य मुद्द्याकडे वळूया की आता हा आंतरराष्ट्रीय प्रश्न कसा निर्माण झाला आहे?
आपण आधी वाचल्याप्रमाणे या तेलावर आपली मोनोपली आहे. दरवर्षी आपण साधारण ₹६,००० कोटी रुपयांचे तेल निर्यात करतो. आपला सगळ्यात मोठा ग्राहक आहे चीन! गेली अनेक वर्षे आपण चीन आपल्याकडून एरंडेल तेल विकत घेते. हे तेल वंगण, सौंदर्य प्रसाधने बनवण्यात वापरले जाते. उदाहरणार्थ, अतिथंड हवामानात हे तेल गोठत नाही म्हणून विमानाच्या वंगणात त्याचा वापर केला जातो. त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी सौंदर्य प्रसाधनात त्याचा वापर केला जातो.
यावर्षी चीनने त्यांचा 'गेम' बदलला आहे. एरंडेल तेलाऐवजी त्यांनी एरंडाच्या बियांची मागणी केली आहे. म्हणजे 'फिनिश्ड प्रॉडक्ट' च्या ऐवजी 'रॉ मटेरीयल' घ्यायला सुरुवात केली आहे. याचे दोन अर्थ निघतात. एकतर आपल्यापेक्षा चांगले तेल काढण्याची व्यवस्था त्यांनी उभी केली आहे किंवा लॉकडाऊनमुळे भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन ते माल भरून ठेवत आहेत. भारतीय तेल उत्पादकाला त्यामुळे नुकसान होते आहे. कारण शेतकर्याला डायरेक्ट चीनी कंपन्या भाव देत असल्याने त्यांनाही चढता भाव द्यावा लागतो आहे. त्यामुळे त्यांनी तेलबिया निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
पण अशा संकटाला एक वेगळी बाजू असते ती म्हणजे 'कॉन्स्पीरसी थिअरी'. कट कारस्थान असल्याचा संशय! या संशयाचे मूळ आहे 'रिसीन' नावाच्या विषात! एरंडाच्या बियांमध्ये 'रिसीन' अत्यल्प प्रमाणात असते. हे विष शुध्दीकरण करून त्याचा साठा बनवण्याचा चीनचा प्लॅन आहे असे लोकांचे म्हणणे आहे. गरज पडल्यास 'रिसीन'चा बायो-टॉक्झीन म्हणून जैविक शस्त्रांमध्ये चीन वापर करू शकेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. मोहरीच्या दाण्याएवढे 'रिसीन' पोटात गेले किंवा श्वसनमार्गात पोहचले तर ४८ तासात लिव्हर आणि किडन्या बंद पडून वेदनादायी मृत्यू येतो.
आता ही 'कॉन्स्पीरसी थिअरी' किती सत्य आहे हे कळणे कठीण आहे. पण शेवटी चीन्यांचा भरवसा काय??