कॅनडात सापडलाय चक्क अंड्याइतका मोठा हिरा? जाणून घ्या काय वैशिष्ट्य आहे याचं!!
मंडळी, नैसर्गिकरीत्या तयार होणारा हिरा हा साधारणपणे आकाराने लहान असतो, पण कॅनेडात एक चमत्कार घडला आहे. भौ तिथे चक्क अंड्याच्या आकाराचा हिरा सापडलाय.....हा हिरा साधारण हिऱ्यापेक्षा तब्बल ५००० पटीने मोठा आहे.
कॅनेडा मधल्या हिऱ्याच्या खाणी (स्रोत)
मंडळी, डॉमिनियम डायमंड माइन्स आणि रिओ टिंटो ग्रुप या दोन कंपन्यांनी मिळून हा हिरा शोधला आहे. त्याचं ५५२ कॅरेट वजन आणि ३३.७४ मिलीमीटर बाय ५४.५६ मिलीमीटर आकारामुळे तो एखाद्या अंड्याएवढा वाटतो. डॉमिनियम डायमंड माइन्सचे CEO शेन डर्गीन यांनी म्हटलंय की ‘खाण कामाच्या प्रक्रियेत हिऱ्याचा आकार शाबूत राहिला आहे ही गोष्ट कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही.’
मंडळी, या हिऱ्याची किंमत किती असेल असा प्रश्न पडला ना ? अजून तरी या हिऱ्याची किंमत ठरवण्यात आलेली नाही. कंपनीने म्हटलंय की इतक्यात याची किंमत लावणं अवघड आहे.
साधारणपणे पिवळसर रंगाचा हिरा हा कमी किमतीत विकला जातो, पण हा हिरा उत्तर अमेरिकेत सापडलेला आजवरचा सर्वात मोठा हिरा असल्याने त्याला मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे.
मंडळी, १९०५ साली दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ‘कलिनन हिरा’ हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे. तो सापडला तेव्हा त्याचे वजन ३,१०६ कॅरेट होतं. ब्रिटिशांनी त्याचे तुकडे करून ते दागिन्यात बसवले. त्यातले २ भाग हे Great Star of Africa आणि the Lesser Star of Africa या नावाने ओळखले जातात. आज हे हिरे ब्रिटनच्या राणीच्या दागिन्यात समाविष्ट आहेत.
तर मंडळी, कॅनेडत सापडलेला नवीन हिरा हा सर्वात मोठ्या नैसर्गिक हिऱ्यांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन बसलाय. त्याला किती रुपयांची बोली लागते ते आता पाहण्यासारखं असेल.