चिपको आंदोलन ते हिमालयातील वृक्षतोड बंदी...सुंदरलाल बहुगुणा यांच्या कार्याचा आढावा घेऊ या !!
प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव घेतले की पहिल्यांदा आठवते ते चिपको आंदोलन. चिपको आंदोलनाचे मुख्य प्रणेते म्हणून ते ओळखले जायचे. डोंगराळ भागात पाणी, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नाबाबत त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी ते प्राधान्याने लढले. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बहुगुणा यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून २००९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म ९ जानेवारी १९२७ साली हिमालयाच्या कुशीतील उत्तराखंडमध्ये टिहरीजवळ मरोडा या गावात झाला. बहुगुणा यांना सच्चा हिमालयपुत्र मानले जाते. त्यांनी हिमालयावर होणाऱ्या मानवी आक्रमणांना थांबवले. आलिशान पर्यटन आणि हिमालयात हॉटेल्स सुरू करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. बहुगुणा यांनी हिमालयाची पाच हजार किलोमीटरची यात्रा केली होती. अनेक पदयात्रांद्वारे गावागावांत जाऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून त्यांनी पंधरा वर्षे वृक्षतोडबंदी लागू करा ही मागणी केली आणि ती मान्यही झाली.
१९७४ ला उत्तर प्रदेशात चिपको आंदोलनात जंगलातील झाडे वाचवण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला. त्या लढ्यात ते इतके एकरूप झाले होते की त्यांचे नाव चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून घेतले जाते. गुगलने चिपको आंदोलनाला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डुडल तयार केले होते. त्याबद्दल या लिंकमध्ये वाचू शकता.
चिपको आंदोलनासोबतच त्यांनी टिहरी धरणाविरोधात लढा दिला. १९९५मध्ये त्यांनी टिहरी प्रकल्पाविरोधात ४५ दिवस उपोषण केले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होते असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला होता. २००१ मध्ये अटक झाल्यावर २००४ नंतर त्यांची सुटका झाली. पर्यावरण संरक्षण हे बहुगुणा यांचे जीवनध्येय होते. हिमालयातील वृक्षतोड थांबवण्यासाठी त्यांनी शांतपणे संघर्ष केला. ते गांधींजींच्या विचारांचे अनुयायी होते. १९४७च्या स्वातंत्रलढ्यात ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. त्यांनी पत्नीसोबत नवजीवन मंडळ स्थापन केले आणि दारूबंदीसाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी डोंगराळ भागातील महिलांना एकत्र केले.
आयुष्यभर इतरांसाठी लढणाऱ्या बहुगुणा यांना अनेक पुरस्कार दिले गेले. १९८१ मध्ये जाहीर झालेला पद्मश्री त्यांनी नाकारला. १९८६ मध्ये जमनलाल बजाज पुरस्कार आणि १९८७ मध्ये चिपको आंदोलनासाठी राइट लाईवलीहूड अवॉर्ड दिले गेले. २००९ साली त्यांना भारताचा सर्वोच्च पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
सुंदरलाल बहुगुणा यांना बोभाटाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.