इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांच्या कसोटी सामन्यात एक महिला फोर्थ अंपायरचं काम करणार !!
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान क्रिकेट मॅचेस सुरू आहेत. आज ७ जानेवारीपासून या दोन संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यातली एक खास बाब म्हणजे पुरुषांच्या या कसोटी सामन्यात यावेळी एक महिला चौथ्या पंच म्हणजेच फोर्थ अंपायर म्हणून काम बघणार आहे. तिचं नाव आहे क्लेअर पोलोसाक. हा एक विक्रमच आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांच्या कसोटी सामन्यात अंपायर म्हणून एका महिलेकडे जबाबदारी सोपवली गेली आहे. पॉल रिफेल आणि पॉल विल्सन ही जोडगोळी मैदानावरचे पंच म्हणून काम पाहणार आहे, तर ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे थर्ड अंपायर आहेत.
पुढे वाचण्यापूर्वी फोर्थ अंपायर म्हणजे काय ते जाणून घेऊया.
क्रिकेट मॅच सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल, दोन पंच किंवा अंपायर्स प्रत्यक्ष मैदानावर असतात. याशिवाय अजून दोन अंपायर्स असतात. त्यात थर्ड अंपायरला मॅचच्या व्हिडीओ रिप्लेला थेट ऍक्सेस असतो. विशिष्ट परिस्थितीत खेळाडू आऊट आहे की नाही याचा निकाल देण्यासाठी थर्ड अंपायर नियुक्त केलेला असतो.
जेव्हा मैदानावर असलेल्या दोनपैकी एका पंचाला काही कारणासाठी मैदानाबाहेर जावं लागतं तेव्हा त्याची जागा थर्ड अंपायर घेतो. त्याचप्रमाणे गरज पडल्यास मैदानात नविन बॉल घेऊन येणं, मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरसाठी ड्रिंकची व्यवस्था करणं, लंच आणि टी ब्रेक असतो त्या काळात पिचची देखभाल करणं, मैदानावरील प्रकाशयोजनेची व्यवस्था पाहणं अशा अनेक गोष्टी असतात, ज्या प्रत्यक्ष मॅचइतक्याच महत्त्वाच्या असतात. ही कामं आणि या स्वरूपाचं व्यवस्थापन करणारा मनुष्य म्हणजे फोर्थ अंपायर. अगदी पुलंच्या नारायणप्रमाणे अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारा. शिवाय जेव्हा थर्ड अंपायरला मैदानावर जबाबदारी पार पाडावी लागते, तेव्हा चौथा अंपायर हा तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडतो.
पोलोसाक मूळची ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स येथील. यापूर्वी ही ३२ वर्षीय महिला पुरुषांच्या वनडे क्रिकेट मध्ये अंपायर म्हणून काम पाहणारी पहिली महिला ठरली होती. २०१९ मध्ये नामिबिया आणि ओमान यांच्यामध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये तिने अंपायर म्हणून काम केलं होतं. याखेरीज तिने ऑस्ट्रेलियामध्ये २०१७ मध्ये झालेल्या देशांतर्गत पुरुषांच्या लिस्ट ए सामन्यात अंपायर म्हणून काम केलं होतं. तेव्हाही ती पुरुषांच्या सामन्यात अंपायर म्हणून काम करणारी पहिली महिला ठरली होती.
कसोटी सामन्यासाठी आयसीसीच्या नियमानुसार यजमान देश चौथा अंपायर म्हणून आपल्या देशातला आयसीसीचा अंपायर नेमू शकतो. आता ऑस्ट्रेलियाने तेच केलं आहे, आणि हे करताना एका महिलेचा यथोचित सन्मान झाला आहे ही बाब सगळ्यात महत्त्वाची!