हॅकरचा हल्ला - बँकेवर डल्ला : भाग १- आरबीआयची ग्राहक संरक्षण नियमावली

कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडेखोरांनी ९४ कोटींचा डल्ला मारल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच. कॉसमॉस बँकेने खातेदारचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली आहे.  तरी पण ही बातमी वाचल्यावर ऑनलाईन पैशांचे व्यवहार नको रे बाबा अशा निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचले असाल याची आम्हाला खात्री आहे. 

ऑनलाइन आर्थिक व्यवहार आपण कितीही टाळायचे म्हटले तरी ते पूर्णतः टाळता येणे अशक्य आहे, सोबत हॅकरची भीती पण आहे, अशा परिस्थितीत ग्राहकांना काय संरक्षण आहे याची नियमावली  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जाहिर केली होती.  

या नियमावलींचा ग्राहकाच्या चष्म्यातून आपण आढावा घेऊ या ! 

सायबर फ्रॉड दोन प्रकारच्या व्यवहारांत घडतात. 

१.  असे व्यवहार ज्यामध्ये डेबीट/क्रेडीट कार्ड न वापरता व्यवहार पूर्ण करता येतो. उदाहरणार्थ,  मोबाईल , नेटबँकींग / वॉलेट/युपीआय  इत्यादी.

स्रोत

२. असे व्यवहार ज्यामध्ये कार्ड वापरले जातात. इथे हे लक्षात घ्यावे लागते की कार्ड हे खातेधारकानेच वापरले आहे असे गृहीत धरले आहे. 

स्रोत

 

आता प्रश्न असा आहे की नुकसान म्हणजे चोरी झाली तर त्याची भरपाई कोणी द्यायची ? 

निष्काळजीपणा, हलगर्जी ज्यानी केली असेल त्याने भरपाई द्यावी, हा नैसर्गीक नियम इथे लागू होतोच. पण त्यातही एक असा मुद्दा आहे ज्यामध्ये बँक किंवा खातेदार दोन्हींकडून हलगर्जी झाली नसेल आणि तिसराच कोणी या चोरीला जबाबदार असेल तर काय ?

१. ग्राहकडून झालेल्या चुका: उदाहरणार्थ, पासवर्ड दुसर्‍याला देणे, कार्डचा पिन नंबर दुसर्‍याला देणे. अशावेळी जोपर्यंत ग्राहक बँकेला सजग करून  घडलेल्या चुकीची माहिती देत  नाही, तोपर्यंतचे सर्व  नुकसान ही ग्राहकाची जबाबदारी असते. 

स्रोत

२. बँकेच्या शिथिलतेमुळे किंवा बँकेच्या संगणकातील त्रुटींमुळे जे फ्रॉड होतील त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ बँकेचीच असते. अशा फ्रॉडमध्ये जर ग्राहकाच्या खात्यातून पैसे गायब झालेच तर बँकेला ग्राहकाने कळवायची जबाबदारी ग्राहकावर नाही. तरीपण आपल्या खात्यात काही गडबड झाली आहे असे आढळल्यास बँकेला कळवावे हे योग्यच आहे. 

स्रोत

३. तिसरा खतरनाक प्रकार म्हणजे बँक किंवा ग्राहक दोन्हीही जबाबदार नसलेल्या घपल्याचा ! असा घोटाळा लक्षात आल्यावर तीन दिवसाच्या आत ग्राहकाने बँकेच्या निदर्शनास ही घटना आणून दिली तर ग्राहकाचे एकही रुपयाचे नुकसान होणार नाही. जर चार ते सात दिवसांत कळवले, तर बँक खाते विशेष निरिक्षणाखाली ठेवून प्रतिबंधीत कारवाई करेल. सात दिवसानंतर जर ही माहिती ग्राहकाने दिली तर नुकसानीची जबाबदारी ज्या त्या बँकेच्या नियमाप्रमाणे असेल. 

स्रोत

या सर्व नियमांकडे लक्ष दिले, तर कॉसमॉस बँकेच्या दरोड्यात ग्राहकांची जबाबदारी शून्य आहे आणि बँकेची जबाबदारी १०० टक्के आहे असे आता दिसते आहे असेच बॅकींग क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. 
हा विषय बराच मोठा आहे.  म्हणून  आज ही माहिती वाचून तुमचे प्रश्न विचारा, उद्याच्या भागात अधिक माहिती आम्ही देणार आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required