जहाज फुटून समुद्रात पडलेल्या २९००० खेळण्यांमुळे समुद्राच्या प्रवाहांचा अभ्यास कसा सोपा झाला??
समुद्रात एक मोठी लाट उठते आणि ती किनाऱ्यावर येऊन आदळते हे चित्र तुम्ही समुद्राच्या काठावर बसून अनेकदा पहिले असेल. समुद्रात उठणाऱ्या या लाटांचा अंदाज बांधणे शक्य आहे का? ही लाट कुठून आली असेल? तिचा प्रवाह आणि प्रवास कसा झाला असेल? समुद्राच्या प्रवाहाची अचूक दिशा ठरवणं अजूनही क्लिष्ट बाब आहे. पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघातामुळे संशोधकांना आता यातही मार्ग दिसत आहे. समुद्राच्या प्रवाहाचा अभ्यास करण्याला या अपघातामुळेच चालना मिळाली. कसला होता हा अपघात आणि त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाबाबत नेमकी काय माहिती मिळाली जाणून घेऊया या लेखातून.
उत्तर पॅसिफिक महासागरात १० जानेवारी १९९२ रोजी अचानक उठलेल्या वादळात अनेक कार्गोशिप तुटून गेल्या. या मोठ्मोठ्याला कार्गोशीपमध्ये अनेकदा व्यापारी माल गच्च भरलेला असतो. या सगळ्या शिपमधल्या एका जहाजात लहानमुलांची प्लास्टिक खेळणी भरलेली होती. ही खेळणी अमेरिकाहून चीनला रवाना होत होती. इतक्यात उठलेल्या वादळात या जहाजाला जलसमाधी मिळाली. या जहाजात एक दोन नव्हे तर तब्बल २९,००० अशी छोटी छोटी प्लास्टिकची खेळणी होती. ज्यात पिवळे बदक, कासवं, बेडूक असे वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार होते. मोठमोठाली जहाजे बुडाली तरी ही प्लास्टिकची खेळणी मात्र बुडाली नाहीत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने पाण्यात गेलेल्या या छोट्या छोट्या खेळण्यांचे पुढे काय झाले हेही बरीच वर्षे ठाऊक झाले नाही. पण, इतक्या मोठ्या संख्येने समुद्रात पडलेली ही खेळणी कुठेतरी नक्कीच किनाऱ्यावर येऊन लागतील हा आशावाद होता.
या खेळण्यांच्या प्लास्टिकची क्वालिटी चांगली असल्याने ती तुटणार फुटणार नाहीत ही देखील खात्री होतीच. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार काही खेळणी ही माईनच्या किनाऱ्यावर, तर काही अटलांटिक किनाऱ्यावर पोहोचली होती. या खेळण्यांच्या प्रवासावरूनच महासागराचा प्रवाह कळणार होता. महासागराचा अभ्यास करणारे तज्ञ ठिकठिकाणच्या किनाऱ्यावरील लोकांना ही खेळणी तुम्हाला सापडली तर संपर्क करण्याचा संदेश देऊ लागले. टीव्ही वरील या बातम्या ऐकून पत्रकार डोनोहन हॉन यांनी या खेळण्यांचे पुढे काय झाले असेल याचा शोध घेण्याचे ठरवले. या सगळ्या प्रवासात डोनोहन हॉन यांना अनेक किनारे आणि देश पालथे घालावे लागले.या सगळ्या अनुभवावर आधारित "मॉबी डक : द ट्रू स्टोरी ऑफ २८,८०० बाथ टॉइज ॲट सी" या नावाचे पुस्तकही लिहिले आहे.
हॉन म्हणतात यातील काही खेळणी ही गोरे पॉइंट अलास्का येथे गेली, तर काही दक्षिणेकडे काचेमाक स्टेट पार्ककडे. यातील काही खेळणी हॉंगकॉंग, टाकोमा आणि वॉशिंग्टनलाही पोहोचली. या सर्वच्या सर्व खेळण्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. यातली काही खेळणी अजूनही महासागराच्या प्रवाहासोबतच गटांगळ्या खात असतील. 'फर्स्ट इअर्स इंक' नावाच्या कंपनीने या खेळण्यांचे उत्पादन केले होते. त्यांनी यु. के. परिसरात ज्याला कुणाला ही खेळणी सापडतील त्याला एका खेळण्यामागे ५० युरोचे बक्षीस जाहीर केले आहे.
महासागराचा प्रवाह मोजणे हे तितके सोपे काम नाही. या प्रवाहाची दिशा ठरवण्यामागे कितीतरी अदृश्य शक्तींचा हात असतो. उपग्रहांच्या सहाय्याने समुद्राचा नकाशा बनवता येत असला तरी या उपग्रहांना देखील या प्रवाहाची दिशा ठरवता येत नाही, इतके हे किचकट काम आहे. गेली २६ वर्षे ही खेळणी समुद्रातील वाऱ्याशी, लाटांशी, पर्वतांशी टक्कर देत आहेत, पण कधी ना कधी ती किनाऱ्यावर येतीलच यात शंका नाही.
या खेळण्यांच्या प्रवासातून मिळालेल्या माहितीतूनच ओशन सर्फेस करंट्स सिम्युलेशन मॉडेल बनवण्यात आले आहे. ज्याला एझमियर अँड इंग्रहाम्स मॉडेल म्हटले जाते. समुद्रातील हवामान, मासेमारीचा अंदाज बांधणे अशा कितीतरी गोष्टीसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. हा एझमियरचे हे मॉडेल त्या खेळण्याशिवाय पूर्ण झालेच नसते. समुद्रात अपघाताने बुडालेल्या त्या खेळण्यांनी समुद्रातील बदल, हवामान, प्रवाह, असे कितीतरी कंगोरे जाणून घेण्यास प्रचंड सहाय्य केले आहे.
समुद्राचा प्रवाह समजून घेण्यासाठी ज्याकाळी उपग्रह वगैरेंसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्याकाळातही अशाच पद्धतीने समुद्राचा प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाई. या प्रयत्नात समुद्रात कितीतरी कचरा फेकला गेला असेल, जो अजून कुठे कुठे समुद्राच्या वर किंवा खाली तरंगत असेल. आधीच प्लास्टिकने समुद्राचे पर्यावरण दूषित केलेले असताना समुद्राचा प्रवाह जाणून घेण्यासाठी टाकण्यात आलेल्या या ड्रिफ्ट बॉटल्सनी त्यात आणखी भर टाकली.
एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीत संदेश ठेवून ती बाटली समुद्रात फेकून द्यायची आणि ज्या कुणाला ती बाटली सापडेल त्याने बाटलीच्या आतील संदेश वाचून त्यावर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधून कळवायचे अशी ही पद्धत होती. आश्चर्य वाटेल पण समुद्राचा प्रवाह मोजण्याच्या नादात शास्त्रज्ञांनी अशा २००० बाटल्या समुद्रात फेकल्या होत्या. त्यातल्या फक्त ७० बाटल्याच सुरक्षीतपणे किनाऱ्यावर पोहोचू शकल्या. बाटलीचे टोपण निघाले किंवा बाटलीला छिद्र पडले तर अर्थातच ती बॉटल पाण्यात बुडणार किंवा आहे तिथेच गटांगळ्या खाणार. या बाटल्या जे काम करू शकल्या नाहीत ते काम या खेळण्यांनी करून दाखवले.
एखाद्या अपघातातून काही सकारात्मक बाब हाताशी लागण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी