नशिबाचा फेरा - ताजमहाल चे मालक राहतायत झोपडपट्टीत !!!
बहादूर शहा जफरला शेवटचा मुघल बादशहा म्हणून ओळखलं जातं. १८५७ च्या उठावात झाशीची राणी, त्यात्या टोपे अशा सगळ्यांचा ब्रिटिशांच्या प्रचंड फौजेपुढं टिकाव लागला नाही आणि भारतावर इंग्रजांचं एकछत्री राज्य आलं. मुघलांचाही पाडाव झालाच होता. अशा वेळी या शेवटच्या मुघल सम्राटाला इंग्रजांनी बर्मा (आत्ताचे म्यानमार)इथं नेऊन ठेवलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला मरताना आपली मायभूमीपण मिळाली नाही. याला इंग्रजांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचं अजून एक उदाहरण म्हणता येईल. आठवतं, ब्रम्हदेशाच्या थिबा राजाला त्यांनी आपल्या रत्नागिरीत आणून ठेवलं आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला ते ?
या शेवटच्या मुघल बादशहा नंतर याचे वंशज कुठे गेले आणि त्याचं काय झालं याचं कुणालाच काही पडलं नव्हतं. कारण देशात स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं. पण हे वंशज असतील तरी आजूनही त्यांची तशीच शान असेल, रुबाब असेल, महाल असतील असं आपल्याला वाटू शकतं. पण तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल, पण मुघल साम्राज्याचे वंशज आज हावडा, कोलकातामधल्या एका झोपडपट्टीत कसंबसं आयुष्य जगत आहेत.
शेवटच्या मुघल बादशहाचा नातू ‘मिर्झा बेडर बख्त’ याची पत्नी सुलताना बेगम ही खरं तर राजकन्या आहे. पण हलाखीच्या परिस्थितीमुळं तिला दोन वेळच्या जेवणासाठी दुसर्यांच्या घरची धुणीभांडी करावी लागत आहेत. सुलताना बेगमला पाच मुली आणि एक मुलगा आहे. सरकार कडून मदत म्हणून महिन्याला ६००० रुपये दिले जातात, पण ते पुरेसं नसल्याचं ती म्हणते.
सुलताना बेगम आणि मिर्झा बेडर बख्त
बहादूर शहा जफरच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी मुघलांच्या वंशजांना मारण्याचं सत्र चालवलं होतं पण त्यातून सुलताना बेगमच्या पतीचे पणजोबा बचावले आणि मुघलांची नाळ शाबूत राहिली. सर्व वैभव हातून गेल्यानंतर मिर्झा बख्तला गरिबीत जीवन जगावे लागलं. १९८० साली तो मरण पावला.
एकेकाळच्या ताजमहाल, लाल किल्याचे मालक आज एका झोपडीचेही मालक नाहीत.
(सर्व फोटो स्रोत)