डॉ. सँडूक रुट: अनेकांना अगदी कमी किमतीत दृष्टी देणारा 'गॉड ऑफ साइट'...
आपल्याकडे डॉक्टर हे देवाचे रूपच मानतात. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टरांचे महत्व वेगळे सांगायला नको. प्रसंगी स्वतःचे काम बाजूला ठेवून धावणारे, जीव वाचवणारे, एक ढाल बनून आपले संरक्षण करणारे एक देवदूत. गेले एक वर्ष तर हे योद्धे अहोरात्र न थकता, न थांबता सर्वांसाठी उभे आहेत. परंतु हा सेवाभाव फक्त आजच दिसतोय असे नाही. असे अनेक डॉक्टर आहेत ज्यांचे कार्य समाजापुढे आणणे तितकेच महत्वाचे आहे. आज अशाच एक नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांचे बहुमूल्य कार्य पाहुयात.
नेपाळ देशाची राजधानी काठमांडूच्या जवळ २८८ कि.मी. अंतरावर असलेले लुंबिनी येथे डॉ. सँडूक रुट हे नेत्रतज्ञ म्हणून काम करतात. त्यांचे डोळ्यांचे क्लिनिक आहे. डॉ. सँडूक रूट नवीन तंत्रज्ञानासह अत्यंत कमी किंमतीत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करतात. गरीब लोकांची मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यांचे काम इतके अचूक आहे की त्यांना 'गॉड ऑफ साइट' म्हणजे 'दृष्टी देणारा देव' असे म्हणतात. त्यांच्या क्लिनिकबाहेर लाईन लावून रुग्ण उभे असतात.
आतापर्यंत त्यांनी १,३०,००० लोकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळले आहेत. अवघ्या तीन दिवसांत सुमारे ४०० रूग्णांची दृष्टी त्यांच्या शस्त्रक्रियेद्वारे परत आली आहे. नेपाळमधील बर्याच लोकांना, विशेषतः गरीब लोकांना डॉ. रुटच्या कामाचा फायदा झाला आहे. त्यांनी काठमांडूमध्ये तिलगंगा इन्स्टिट्यूट ऑफ नेत्ररोगशास्त्र सुरू केले आहे. डोंगरावरील दुर्गम खेड्यापाड्यात ते नियमितपणे भेट देतात. ते आपल्याबरोबर तज्ञ आणि उपकरणे यांचे एक पथक घेऊन जातात. ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ते करतात. आर्थिक परिस्थिती खूप बिकट असेल तर एक रुपयाही ते घेत नाहीत. ते म्हणतात, 'हे माझे काम आहे, जगातील कोणतीही व्यक्ती अनावश्यक अंधत्वाचा बळी पडू नये. ही एकच माझी इच्छा आहे.'
डॉ. सँडूक रुट यांना त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक देशांमध्ये त्यांचे कार्य पसरवण्याची इच्छा आहे. त्यांच्यासोबत ब्रिटीश समाजसेवी तेज कोहली हे सुद्धा आहेत. डॉ. रूट यांचे पुढचे लक्ष्य येत्या पाच वर्षांत ५,००,००० शस्त्रक्रिया करण्याचे आहे. १९८४ मध्ये डॉ. रूट यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. त्यांना तेव्हा कळले की धूसर दिसू लागल्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली तर बहुतेक लोक नंतर चष्मा वापरत नाहीत. त्यामुळे बऱ्याच अडचणी येऊ शकतात. म्हणून त्यांनी वेगळे तंत्रज्ञान शोधले. त्यांनी टाके न पाडता एक लहान चिरेद्वारे मोतिबिंदू काढून टाकला. आणि नंतर त्या जागी कृत्रिम लेन्स बसवली. लेन्सची किंमत फार नव्हती. त्यांच्या शस्त्रक्रिया खर्च अंदाजे १०० डॉलर इतका आहे पण ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी हे विनामूल्य आहे.
आजपर्यंत अनेक रुग्णांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.आधी काहीच दिसत नव्हते पण डॉक्टरांनी सगळं ठीक केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जाते. नेपाळ जवळच्या दुर्गम भागात जिथे वैद्यकीय अत्याधुनिक सेवा फार कमी आहेत तिथे डॉ. रूट अनेकांना त्यांची गमावलेली दृष्टी परत देतात.
समाजासाठी निस्पृह काम करणाऱ्या डॉ. रूट यांच्या कार्याला बोभाटाचा सलाम.
लेखिका: शीतल दरंदळे