computer

इलॉन मस्क नक्की कोणत्या कारणासाठी १० कोटी डॉलर्स बक्षीस म्हणून देतोय? या स्पर्धेबद्दल वाचायलाच हवं.

इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या Tesla कंपनीचे मालक आणि नुकतेच  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले इलॉन मस्क हे अधूनमधून आपल्या वेगळ्या कल्पनांसाठी चर्चेत असतात. सध्या इलॉन मस्क एका नव्या गोष्टीसाठी पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी $100 million (१० कोटी डॉलर्स) चे एक बक्षीस घोषित केले आहे. आता इतकी मोठी किंमत बक्षीस म्हणून मिळतेय तर स्पर्धा देखील तितकीच कठीण असेल ना. हो. हे बक्षीस त्यांना मिळणार आहे जे सर्वात उत्तम Carbon Capturing Technology तयार करतील.

तर काय असते Carbon Capturing Technology?

ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता आपल्याला नवीन नाहीये. वातावरणातील काही ठराविक वायूंचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढण्यास सुरुवात होते तेव्हा ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात होते. तर ते वायू कोणते? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रसऑक्साईड.

वरील वायूंचे हवेमधील प्रमाण वाढते तेव्हा पृथ्वीवरील तापमानात अनेक बदल घडून येतात. तापमानवाढ, अवेळी पाऊस येऊन पूर येण्यासारख्या समस्या येणे हे देखील ग्लोबल वॉर्मिंगचेच परिणाम असतात. म्हणून हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतीव गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे रॉकेटसाठी वापरले जाणारे इंधन बनवण्यासाठी देखील कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जाऊ शकतो. सध्या वापरल्या जाणाऱ्या जीवाश्म इंधनांसाठी (Fossil fuel) पर्याय निर्माण केले जावेत हे देखील स्पर्धा आयोजीत करण्यामागचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पुढील आठवड्यात आपण या पुरस्काराचा तपशील जाहीर करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

मस्क ह्यांनी इलेक्ट्रिक गाड्या तयार करून क्रांती केलीच आहे पण आता त्यांना इलेक्ट्रिक रॉकेटही तयार करायचा आहे. २०१७ मध्ये त्यांनी एका मुलाखतीत अशी इच्छा व्यक्त केली होती. पण सध्या तरी अशी कोणतीही Technology कोणीही निर्माण केलेली नाहीये.

सौर ऊर्जेचा वापर करून वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वेगळा केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानालाच Carbon Capturing Technology म्हणतात. हा वेगळा केलेला कार्बन डायऑक्साईड जर पाण्यामध्ये मिसळला तर रॉकेटसाठी लागणारे इंधन आणि ऑक्सिजन निर्माण केले जाऊ शकते, असे मत त्यांनी मांडले होते.

आता हे वाचून तुम्हाला वाटेल की ही एक इलॉन मस्क नामक मोठ्या माणसाने केलेली कल्पना असावी. पण असे नक्कीच नाहीये मित्रांनो. कारण ह्याच संकल्पनेवर तीन कंपन्या बऱ्याच वर्षांपासून ह्यावर काम करत आहेत. तर ह्या कंपन्या कोणत्या, तर कॅनडाची Carbon Engineering, स्विझरलँड मधील Climeworks आणि अमेरिकेतील Global Thermostat.

(Carbon Engineering)

मित्रांनो हे हवेतील कार्बन डायऑक्साइड वेगळे करण्याचे विज्ञान काही नवीन नाहीये. सुमारे शंभर वर्षांपासून कार्बन डायऑक्साईड वर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे रूपांतर हायड्रो कार्बन इंधनात करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले होतेच, पण ह्या प्रकियेसाठी खूप जास्त प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो तसेच निर्माण केले गेलेले इंधन किती प्रमाणात शुद्ध असेल ह्याची देखील खात्री नसते.

जीवाश्म इंधने जाळणाऱ्या सुविधांमधून कार्बन डायऑक्साईड मिळवणे हे तसे पाहायला गेले तर सोपे काम आहे. पण वायूचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचा प्रयत्न करताना खर्च खूप वाढतो.

(Climeworks)

वरील तिन्ही कंपन्यांनी या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत. थेट हवेमधून एक टन कार्बन घेण्यासाठी लागणारा खर्च ६०० डॉलर्स इतका असू शकतो. हा खर्च सध्या युरोपियन बाजारपेठेत व्यापार केल्या जाणाऱ्या कार्बनच्या किंमतीच्या सुमारे १५ पट जास्त आहे.

आता हा अवाढव्य खर्च वाचवायचा असा?

ह्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी मोठे प्लांट उभे करायचे. ज्यामुळे इंजिनीअर्सना Trial and Error द्वारे संशोधन करण्यास संधी मिळेल.

(Global Thermostat)

कॅनडामधील कार्बन इंजिनीअरिंग आणि ऑक्सिडेंटल पेट्रोलियम कॉपोरेशन ह्या दोन कंपन्यांनी मिळून दरवर्षी १० लाख टन कार्बन डायऑक्साईड जमा करू शकेल असा कारखाना उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

दुसरा मार्ग म्हणजे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे. संशोधन आणि विकासासाठी सरकार वित्तपुरवठा करू शकते. तसेच जे अब्जाधीश लोक जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करू शकतात.

कोट्यवधी डॉलर्सचे कार्बन कॅप्चर बक्षीस मांडणारे मस्क हे काही पहिले अब्जाधीश नाहीयेत. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी २००७ मध्ये व्हर्जिन अर्थ चॅलेंज सुरू केले होते. ह्या बक्षिसाची किंमत होती २.५ कोटी डॉलर्स. ह्या स्पर्धेमध्ये असे यंत्र बनवायचे होते जे कमीत कमी पुढील १० वर्षे हवेतून कार्बन डायऑक्साईड काढून टाकू शकतात. २०११ मध्ये अंतिम स्पर्धकांची घोषणा करण्यात आली, पण कोणीही आव्हान पूर्ण करू शकले नाहीत.

२०१५ मध्ये कार्बन एक्स ही नवीन स्पर्धा चालू झाली. २०२१ मध्ये ह्या स्पर्धेतील विजेत्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. आणि २०२१ मध्ये इलॉन मस्क ह्यांनी सुरू केलेली ही स्पर्धा देखील नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देऊन नव्या तंत्रज्ञानामध्ये नवीन संधी निर्माण करण्याचे ध्येय ठेवते.

इलॉन मस्क ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचे असल्यास कोणत्याही मोठ्या विद्यापीठातील डिग्रीची गरज नाहीये. तुमच्याकडे जर क्षमता आणि वेगळी नवीन कल्पना असेल तर तुम्ही देखील त्यांच्या कंपनीमध्ये काम करु शकता.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required