computer

हिमालयन मीठ किंवा सैंधव मीठ पाकिस्तानातून येतं? सैंधव मीठाचा इतिहास ते पाकिस्तानची मिठाची खाण, सर्व माहिती जाणून घ्या!!

सध्या सगळेच स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या बाबतीत सजग असतात. आपल्या जेवणात वापरले जाणारे पदार्थ नैसर्गिक, रसायनमुक्त असतील यावर सगळ्यांचा भर असतो. अगदी मिठाच्या बाबतीतही. जास्त मीठामुळे होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी किंवा डाएटसाठी आजकाल हिमालयन मीठ वापरायला सांगतात. हे मीठ महाग असते. पण ते मीठ हे जगात सर्वात शुद्ध मीठ मानले जाते. हे मीठ गुलाबी रंगाचे असून ते साध्या मिठापेक्षा अधिक आरोग्यदायी आहे असे समजतात. याला रंगामुळे गुलाबी मीठ ही म्हणतात. खरंतर सैंधव किंवा रॉक सॉल्टचाच हा एक प्रकार. परंतु हे मीठ खरंच हिमालयात मिळते का? या खाणीतून दरवर्षी खूप मोठी आर्थिक उलाढाल होते. त्याची प्रक्रिया काय आहे हे आज समजून घेऊयात.

हे मीठ वास्तविक हिमालयातून येत नाही. ईशान्य पाकिस्तानमधल्या हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून या खाणीची पर्वतरांग सुरू होते. झेलम नदीपासून सिंधू नदीपर्यंत सुमारे १८६ मैलांपर्यंत या खाणी पसरल्या आहेत. यात जवळपास ५,००० फूट उंच शिखरे आहेत. या भागात छोट्या-मोठ्या सहा खाणी आहेत. त्यातली खेवरा ही सर्वात मोठी हिमालयन मीठाची खाण आहे, ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी मीठ खाण आहे. या खाणी कोट्यावधी वर्षांपूर्वी समुद्राच्या बाष्पीभवनातून तयार झाल्या आहेत. नंतर या खाणी लाव्हारस, बर्फ आणि हिमालय पर्वतांच्या रांगामध्ये बर्फाखाली पुरल्या गेल्या. या खाणीतून जे खडक मिळतात त्यातून हे गुलाबी मीठ तयार होते, याशिवाय अनेक वस्तूही बनवल्या जातात.

या खाणीचा शोध ब्रिटीशांच्या काळात १८७०च्या दशकात झाला. याबाबत एक दंतकथाही आहे. अलेक्झांडर द ग्रेटचा घोडा एक खडक बराच वेळ चाटत होता, जेव्हा तो खडक का चाटत आहे याचा शोध घेतला तेव्हा या मीठ खडकांचा शोध लागला. पाकिस्तानामध्ये ही खाण असूनही पाकिस्तान याचा फार फायदा करू शकले नाही. कारण पाकिस्तान या कच्च्या गुलाबी मिठावर प्रक्रिया करु शकत नव्हता, त्यातील बराचसा भाग पाकिस्तान भारताला स्वस्तात निर्यात करत असे. भारतात यावर प्रक्रिया होऊन ते मीठ भारताच्या लेबल खाली विकले गेले. भारतातून ते युरोपमध्येही निर्यात केले गेले. नंतर पाकिस्तान सरकारने भारताला होणारी निर्यात थांबवली.

ही निर्यात थांबण्याचे कारण होते २०१९ मध्ये सोशल मीडियावर भारतात होत असलेली निर्यात थांवण्याबाबत चाललेली एक मोहीम. भारताला या व्यवहारात चांगलाच फायदा होत असे. भारताच्या निर्यातीत पाकिस्तानला १ टनामागे ४० डॉलर मिळायचे आणि तेच युरोप निर्यात केल्यावर ३०० डॉलर इतका फायदा दिसू लागला. त्यामुळे त्यांनी स्वतः मीठ निर्यात करायचे ठरवले. पण तरीही याचा फायदा पाकिस्तानला खूप झाला नाही. आज अगदी मूठभर व्यापारी गुलाबी मीठावर प्रक्रिया करून निर्यात करतात.

खेवरा खाणीत प्रक्रिया कशी चालते?

या खाणीत जगातील बहुतेक गुलाबी मीठ तयार होते. या खाणीत रेल्वेमार्ग आहे. रेल्वेस्टेशन पासून एक रेल्वे खाणकाम करणार्‍यांना डोंगराच्या आतल्या खोल भागात घेऊन जाते. येथे बोगदे २५ मैलांपर्यंत खोल आहेत. तिथले वातावरण ६४डिग्री सेल्सियसअसते. खाणीला एकूण १७ स्तर आहेत, तळमजल्यावर ५ आहेत आणि भूगर्भाखाली ११ स्तर आहेत. या अंधाऱ्या चेंबरमध्ये तीनशे खाण कामगार काम करतात. कितीतरी वर्षे ते त्याच जुन्या पद्धतीने आणि अवजारांनी हे काम करतात. या कामासाठी ते कुदळ, हँड ड्रिल आणि गनपाऊडर वापरतात. आधी ते कुदळ आणि हँडड्रील वापरुन भोके पाडतात. मग गनपाऊडरसह पॅकिंग होते आणि नंतर सेफ्टी फ्यूज वापरुन ते पेटवतात. स्फोटात मीठाचे खडक बाहेर फेकले जातात. खाण कामगार कमीत कमी आठ तास आत खाणीत काम करतात. ट्रॅक्टर्सने डोंगरावरून खाली आलेले खडकांचे तुकडे केले जातात. दररोज १००० टनांपेक्षा जास्त मीठ खोदले जाते. या खडकांची वर्गवारी करून कटरद्वारे ते कापले जातात आणि खडकाच्या रंग आणि आकारानुसार मीठासाठी कोणते योग्य आणि इतर वस्तूसाठी कोणते खडक वापरले जातील याची वर्गवारी होते.

युरोपमध्ये फक्त खायच्या मीठालाच चांगली मागणी आहे असे नाही, तर त्यापासून बनवलेल्या वस्तू जसे गुलाबी दिवे, खाण्याच्या प्लेट्स ,पुतळे, फरशा अश्या २०० वस्तू बनवल्या जातात. एक किलो मीठाची पिशवी फक्त ६० सेंटला बनते, त्याची बाजारात किंमत ९ डॉलर इतकी लावली जाते. दरवर्षी गुलाबी ८०० मिलियन पौंड मीठावर प्रक्रिया केली जाते. पांढरे मीठ, लाल मीठ आणि गुलाबी मीठ असे तीन प्रकारचे मीठ या खाणींत मिळते. त्यात पांढरे मीठ मध्ये सोडियम chloride, गुलाबी मिठात मॅग्नेशियम, तर लालमीमिठात लोह अधिक असते. आतापर्यंत अंदाजे २२०मिलियन टन मीठ उत्खनन झाले आहे अजून जवळजवळ ६.७ अब्ज टन शिल्लक आहे.

सामान्य मीठाच्या किंमतीपेक्षा हे हिमालयीन मीठ २० पट जास्त किंमतीला असते. अजूनही आरोग्याला ते किती फायदेशीर आहे याबद्दल ठोस पुरावे नाहीत. पण सध्या तरी ते खूप ट्रेंडमध्ये आहे असे दिसतेय.

 

लेखिक: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required