computer

आपल्या पोस्ट खात्याबद्दलची सहावी गोष्ट तुम्हांला नक्कीच माहित नसेल. जगाच्या इतिहासात भारताचा वाटा पाहून नक्कीच अभिमान वाटेल.

आता एका माणसाकडे दोन-दोन मोबाईल्स असतात. पण एक काळ होता जेव्हा घरामध्ये एक टेलिफोन पण असणं शक्य नव्हतं. तेव्हा सगळेजण एकमेकांना ख्यालीखुशाली कळवायला पत्र लिहायचे. पंधरा पैशांची पोस्टकार्डं, पंचाहत्तर पैशांचं निळं आंतरदेशीय पत्र, उलट ट्पाली उत्तर हवं असेल तर आपला पत्ता लिहिलेलं जोडपत्र आणि पाकिट पाठवायचं झालं तर मग तिकिटं!! त्यातही अर्धं लिहिलेलं पत्र म्हणजे अपशकुन मानायाचे म्हणून लिहायला काही नसेल तरी काहीतरी लिहून रिकामी जागा भरली जायची. कुणी गेल्याचं कळवताना मात्र मजकूर एकाच बाजूला लिहून अर्धवट टाकण्याचीही पद्धत होती. 

आता पत्र पाठवण्याची तितकी पद्धत राहिली नाही. पण काळाबरोबर नवीन सेवा पुरवत भारतीय पोस्ट ऑफिस ही जुनी सेवा अजून चालू आहे. आज बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे या टपाल खात्याविषयी लोकांना अधिक माहित नसलेल्या गोष्टी. आमची खात्री आहे यातली  सहावी आणि सातवी गोष्ट तुम्हाला आजवर नक्कीच माहित नसेल..

१. भारतीय पोस्ट खात्याची सुरूवात

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या पत्रव्यवहारासाठी १७२७मध्ये कोलकात्यात ही सेवा चालू केली. तेव्हा अर्थातच ती जनतेसाठी नव्हती. भारतावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांचा कितीही रागराग केला तरी पोलिस, पोस्ट आणि रेल्वे ही खाती चालू करण्यासाठी त्यांचे आभार मानायला हवेत. 

२. जनरल पोस्ट ऑफिस

टपाल खातं जनतेसाठी खुलं करण्याचा मान ब्रिटिश इंडियाचा तेव्हाचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जकडे जातो. त्यासाठी त्यांना भारतातल्या मोठ्या शहरांत जनरल पोस्ट ऑफिसेस उघडावी लागली. १७७४मध्ये कोलकात्यात, १७८६मध्ये मद्रास तर १७९३मध्ये मुंबईमध्ये जीपीओ म्हणजेच जनरल पोस्ट ऑफिसेस चालू करण्यात आली. 

३. तार खातं

१८५१च्या ऑक्टोबरमध्ये कलकत्ता आणि डायमंड हार्बर यांच्यामध्ये पहिली टेलिग्राफ लाईन चालू झाली. या दोन ठिकाणांमधलं अंतर होतं ३०मैल. या सेवेचं औपचारिक उद्घाटन मात्र १ नोव्हेंबर १८५१ला झालं. हळूहळू भारतभर तारेचं जाळंही पसरलं. त्यासाठी ब्रिटिशांनी १८५४मध्ये आग्रा, मुंबई आणि मद्रास इथं तार ऑफिसेस उघडून त्यांना कलकत्त्त्याशी जोडलं. 

शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये तो माहिती मिळवण्यासाठी धडाधड तारा पाठवतो. आपल्याकडे मात्र कुणी जाम सिरीयस झालं किंवा वारलं तरच तार पाठवण्याची पद्धत पडल्यामुळं ’तार आली’ या दोन शद्बांनीच घर काळजीत पडत असे. 

४. पहिला भारतीय स्टँप

डोंगराळ भागात लोक धावत जाऊन पत्रं देत.  सिंध डाक ही भारतीय टपाल खात्याची अशी पळतपळत पत्रं पोचवणारी सेवा होती. त्यासाठी त्यांनी लाखेत उमटवण्याचा स्टॅंप बनवला होता. अर्ध्या आण्याला मिळणारा  हा स्टॅंप लावलेली खूप कमी पत्रं जगात उपलब्ध असतील. 

५. मनी ऑर्डर

पोस्टाने पैसे पाठवता येणं ही मौज होती. ब्रिटिशांनी भारतीय टपाल खात्यामार्फत असे पैसे पाठवण्याची सेवा १८८०मध्ये चालू केली. 

६. जगातली पहिली हवाई टपाल सेवा

पूर्वी हॉट एअर बलूनमधून पत्रं हवाईमार्गे पाठवण्याचे प्रकार झाले होते पण पत्रांचे गठ्ठे विमानानं पाठवण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता. जगाच्या इतिहासात असा पहिला प्रयोग करण्याचा मान भारतीय टपाल खात्याकडे जातो. १८ फेब्रुवारी १९११ या दिवशी सुमारे ६५००पत्रांनीअलाहाबाद ते नैनी असा ५ मैलांचा प्रवास केला. हे नैनी म्हणजे नैनीताल नव्हे तर उत्तरप्रदेशातलं अलाहाबाद जवळचं एक गांव आहे. हे विमान हेन्री पिकेट नावाच्या फ्रेंच पायलटने चालवले होते. 

हा अवघा तेरा मिनिटांचा प्रवास, पण त्याने एक इतिहास घडवला. 

७. पिन कोड सिस्टिम

भारतातल्या वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. त्यावर उपाय म्हणून श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर या पोस्ट खात्यातल्या अधिकार्‍याने १५ ऑगस्ट १९७२रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. आज दुदैवाने या वेलणकरांबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

८. स्पीड पोस्ट

काळाचं भान राखत भारतीय पोस्ट खात्यानं १ ऑगस्ट १९८६ला स्पीड पोस्ट सेवा चालू केली. पत्रं, महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल्स कमीत कमी वेळेत पोचवण्यासाठी या सेवेचा खूप उपयोग होतो.

९. पोस्ट खात्याचं पहिलं ATM

२७ फेब्रुवारी २०१४ला चेन्नई इथं पहिलं पोस्टखात्याचं एटीएम सुरू झालं. डिसेंबरअखेर त्यांनी पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या खातेधारकांना डेबिट कार्ड्स देण्यात आली होती.

 

ब्रिटिशांनी पोस्ट खात्याच्या सेवा जनतेला देऊ केल्याला या वर्षी २४२ वर्षं पूर्ण होत आहेत. आजच्या घडीला सुमारे ९०% हून अधिक खेड्यांना जोडणारी दीड लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसेस भारतात आहेत.  अविरत काम करत राहणार्‍या या जुन्या खात्याशिवाय देशाच्या कारभाराची कल्पनाच होऊ शकत नाही. 

सबस्क्राईब करा

* indicates required