computer

आजच्या वायरलेसच्या जगातही या वायरींशिवाय इंटरनेट अशक्य आहे राव !!

इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी वायरलेस झाल्या आहेत, पण तुम्हाला माहित आहे का, तुम्हा आम्हाला वायरलेस सर्व्हिस वापरता यावी म्हणून चक्क अनेक किलोमीटर लांब वायर्स कार्यरत असतात. दोन खंडांच्या मध्ये इंटरनेटद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी खरं तर आपण अजूनही वायर्सवर अवलंबून आहोत. या वायर्स चक्क समुद्राच्या खालून गेल्या आहेत.

म्हणजे समजा या वायर्स निकामी झाल्या तर काय होईल ? सगळं ठप्प पडेल राव.

उदाहरणातून समजून घ्यायचं झालं, तर आफ्रिका आणि भारताला जोडण्यासाठी हिंदी महासागरातून वायर्स टाकण्यात आल्या आहेत. या वायर्स इंटरनेटपासून ते टीव्ही ट्रान्समिशन सारख्या सेवा प्रकाशाच्या वेगाने पोहोचवण्याचं काम करतात. अशा या महत्वाच्या वायर्सचा आकार हा अगदी नळाच्या पाईप इतका जाड असतो असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ?

या वायर्सचा सांभाळ करण्याची जबाबदारी आणि त्याची मालकी ही आज काही मोजक्या कंपन्यांच्या हातात आहे. अमेरिकन SubCom  कंपनी, फ्रेंच Alcatel-Lucent  कंपनी या दोन प्रमुख कंपन्या समजल्या जातात.

मंडळी, समुद्राचं अवाढव्य रूप हेच या वायर्सना सुरक्षित ठेवण्याचं काम करतं. पण.. पण.... जर एखाद्या तारेत बिघाड झाला तर हेच अवाढव्य रूप अडथळा बनतं. हेही तेवढंच खरं.

असा अपघात नुकताच घडला होता. टोंगा बेट आणि फिजी बेट या मधील अंतर हे ८२७ किलोमीटर आहे. टोंगाला फिजीशी जोडणाऱ्या तारेला Tonga Cable System म्हणतात. ही महत्वाची तार यावर्षी २० जानेवारी रोजी तुटली. या घटनेने टोंगा मधील इंटरनेट ठप्प पडलं होतं.

वायरलेससाठी वायरची गरज का लागते ?

मंडळी, समुद्राखालून गेलेल्या वायर्स जर एवढं संकट निर्माण करू शकतात तर मग आपण वायरलेसचा पर्याय का निवडत नाही ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तथ्य थोडं धक्कादायक वाटू शकतं. तारांनी पाठवलेली माहिती जास्त जलद पोहोचते. शिवाय हा मार्ग स्वस्तही असतो. या तारांना अशा प्रकारे समुद्रातून पसरवण्यात आलंय की खराब हवामानातही त्या सुरक्षित राहतात. निदान आणखी काही वर्ष तरी या तारांशिवाय जगाला पर्याय नाही.

समुद्राखालील वायर्सवरना कोण धोका पोहोचवतं.

समुद्राखालून गेलेल्या या वायर्सना सर्वात मोठा धोका हा माणसापासून आहे. धक्का बसला ना ? माणूस समुद्रावर वेळोवेळी काही ना काही काम काढत असतो. जसे की पूल बांधणे, टेलीफोनचे खांब उभे करणे अशा प्रकारच्या कामांनी या वायर्सना वेळोवेळी दुरुस्त करण्याची वेळ येते. बऱ्याचदा होड्यांचे नांगर या तारांना अडकतात. मच्छिमारी हेही आणखी एक संकट. याच कारणांनी वेळोवेळी वायर सिस्टमवर प्रश्न उपस्थित केला जातो.

आजच्या घडीला काय परिस्थिती आहे ?

वर सांगितलेल्या संकटांमुळे आज या वायर्स भोवती स्टीलचं मजबूत आवरण लावण्यात आलं आहे. या तारा आता समुद्राच्या आणखी खोल पुरण्यात आल्या आहेत. पण याही पुढे जाऊन संरक्षणासाठी एक महत्वाचा उपाय सुचवला जातोय. तों म्हणजे प्रत्येक देशाने ज्या भागात या तारांचं जाळं आहे त्या भागात जाण्यापासून होड्यांना रोखायला हवं. या उपायामुळे वेगळ्या समस्याही उद्भवू शकतात. तो वेगळा मुद्दा.

मंडळी, प्रश्न तर अजून जसाच्या तसाच आहे, समजा हे सगळं करूनही वायर्स तुटल्या तर ? त्यासाठी पर्यायी वायर्सही टाकण्यात आल्या आहेत. एक तार तुटली तर पर्याय म्हणून दुसऱ्या तारेतून माहिती पाठवली जाते. म्हणजे टोंगा सारखी परिस्थिती उद्भवणार नाही. अत्यंत दुर्मिळ अशा घटनेत जगातील अत्यंत महत्वाच्या अशा केबलला धक्का पोहोचला तर मात्र जगभरात इंटरनेट ठप्प पडू शकतो. तूर्तास असं काही घडलेलं नाही.

 

मंडळी, एकूण काय तर आपण आजवर ज्याला वायरलेस समजत होतो तो मुळात वायरलेस नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required