computer

सूर्यग्रहणाचा फेक व्हिडीओ पाहिला? मग ग्रहणामुळे इतिहास कसा समजून घेतात ते जाणून घ्या !!

काल रात्रीपासून पौर्णिमेच्या चंद्राचा हा ३० सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रशिया आणि कॅनडाच्या सरहद्दीजवळ आकाशात उगवणारा प्रचंड मोठा चंद्र केवळ ३० सेकंदात उगवताना आणि मावळताना व्हिडीओत दिसतो. हे दृश्य मनोहर आहे यात शंकाच नाही. साहजिकच फारसा विचार न करता बर्‍याच लोकांनी तो आपापल्या वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या खात्यातून प्रसारित केला. ओडिसाच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस अमिताभ ठाकूर यांनी पण तो शेअर केला. थोड्याच वेळात १०,००० लाइक्सची कमाई झाली. ३००० लोकांनी तो शेअर केला.

आता ती पोस्ट त्यांनी काढून टाकली आहे, कारण तो फेक व्हिडीओ आहे. तर मग हा खोटा व्हिडीओ बनवला कोणी याचा शोध घ्यायला सुरुवात झाली आणि कळलं की Aleksey_nxया इसमाने हा फेक व्हिडीओ बनवला आहे. हा तोच कलाकार आहे ज्यानी काही दिवसांपूर्वी चंद्रावर उतरणारी अज्ञात यानं दाखवली होती. तो व्हिडीओ पण असाच रातोरात हिट्ट झाला होता. तेव्हा हा नयनरम्य असला तरी तो खोटा -फेक- व्हिडीओ  आहे हे लक्षात घ्या.

अशा चंद्र-सूर्य ग्रहणाचे इतिहासात फार महत्व असते. ग्रहण घडून येण्यासाठी पृथ्वी - चंद्र-सूर्य यांच्या परिभ्रमण कक्षा एका विवक्षित कोनात याव्या लागतात. हे आधी कधी घडले यावरून त्या संबंधित एखाद्या ऐतिहासिक घटनेचे कालमापन करता येते.

उदाहरणार्थ, अशाच एका वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग १४०० वर्षांपूर्वी आला होता. इतिहासाच्या अभ्यासकांच्या नजरेतून तो फारच महत्त्वाचा होता. त्या दिवशी उत्तरेतील सम्राट हर्षवर्धनाचा दक्षिणेतील चालुक्य सम्राट पुलकेशीने पराभव केला होता. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाला सापडलेल्या एका ताम्रपटावर ते ६१९ वर्षांपूर्वीचे ग्रहण आणि हर्षवर्धनाचा पराभव या दिवशी केल्याची नोंद सापडली आहे.

महाभारताचा काळ ठरवण्यासाठी अशाच एका ग्रहणाचा वापर इतिहासतज्ञांनी केलेला आढळतो. 

'हा सूर्य आणि हा जयद्रथ' हा महाभारतातील प्रसंग आठवतो का ? सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला संपवले नाही तर मी अग्नीभक्षण करेन अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केली होती. दिवसाचा शेवट आला पण अर्जुनाला लपून बसलेला जयद्रथ सापडला नाही. मग श्रीकृष्णाने आपल्या चक्राने सूर्यबिंब झाकून टाकले. सर्वांना वाटले सूर्यास्त झाला. अर्जुनाने अग्नीभक्षण करण्याची तयारी केली. आता अर्जुन संपलाच असे गृहीत धरून लपून बसलेला जयद्रथ पण बाहेर आला. त्यानंतर श्रीकृष्णाने आपले चक्र काढून घेतले आणि सूर्य आकाशात तळपायला लागला. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आज्ञा केली 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' ! आणि अर्जुनाने जयद्रथाचा वध केला ! 

ही झाली महाभारतातील कथा, पण अभ्यासक हा सूर्यग्रहणाचा दिवस समजतात. खग्रास ग्रहणकाळ आल्याने सूर्य दिसेनासा झाला आणि त्यामुळे सूर्यास्त झाला असे समजून जयद्रथ बाहेर आला. हे ग्रहण कधी घडले असेल याचे गणित खगोलशास्त्राच्या आधारे अंदाज घेऊन महाभारताचा काळ ठरवला गेला. 

वाचकहो, सांगायची गोष्ट अशी की फेक व्हिडीओ मनोरंजन करतात पण अभ्यासक नेहेमीच डोळे उघडे ठेवून काम करत असतात.

सबस्क्राईब करा

* indicates required