फिजेट स्पिनर : ३००० कोटींच नवं खूळ !!!
टेन्शन नही लेनेका बॉस! हे वाक्य तुम्ही दिवसभरात कितीतरी वेळा सध्या ऐकत असाल. तर सांगायची गोष्ट अशी की, सध्या चलती आहे काही जीवनमानाच्या विकारांची. आणि त्यापैकी मानसिक तणाव हा ओढवून घेतलेल्या विकारांचा राजा आहे. तणावमुक्ती हा आजकाल एक धंदा झाला आहे. या धंद्यातलं नवं खेळणं आहे फिजेट स्पिनर. हे आहे तरी काय हे जाणून घ्यायचे असेल तर शाळेत- कॉलेजात जाणार्या मुलांकडे बघा. त्यांच्या हातात बोटाभोवती गरगर फिरणारी एक भिंगरी दिसेल. तणावमुक्ती करणारे नविन साधन आहे म्हणे !!!
आहे तरी काय या स्पिनरमध्ये ? फारसं काही नाही. मध्यभागी असलेल्या छोट्या बेअरींगवर फिरणारी तीन पाती. बेअरींगमध्ये बोट अडकवायचं आणि गोलगोल फिरवत राहायचं. असं काही केल्यानं मानसिक तणाव, एडीएचडी -ऑटीझमसारख्या मनोविकारापासून मुक्ती मिळते असा दावा हे खेळणे बनवणार्या उत्पादकांचा दावा आहे. हे खूळ २०१७ साली इतकं बोकाळलं आहे की अमेरीकेतल्या अनेक शाळांमध्ये या खेळण्यावर बंदी आलेली आहे. आपल्याकडं गेल्या काही महिन्यातच या खेळण्याची साथ आली आहे आणि काही दिवसात या खेळण्यावर बंदी ही पेपरची हेडलाईन असेल बहुतेक !
तसं हे खूळ काही नविन नाही. पहिल्यांदा १९९५ मध्ये कॅथी हेटींजर नावाच्या एका अमेरीकन बाईनं हे खेळणं बनवलं. त्या दरम्यान ही बाई मायस्थेनीया ग्रेव्हीस या विकारानं आजारी होती. तणाव आणि झोपेच्या कमतरतेत मायस्थेनीया ग्रेव्हीस या आजाराचे मूळ आहे. हे खेळणं वापरल्यावर तब्येतीत थोडा आराम पडतो आहे हे लक्षात आल्यावर या बाईनं त्याचं पेटंट मिळवलं . पण हे पेटंट विकलं जात नाही म्हटल्यावर २००३ साली ते परत दाखल करण्याचे कष्ट तिनं घेतले नाहीत. पण जर घेतले असते तर आज ती अब्जाधीश झाली असती हे नक्की !
या खेळण्याची लोकप्रियता बघितल्यावर केचप नावाच्या एका कंपनीनं फिजेट स्पिनर अॅप बनवलं. दोनच आठवड्यात ७० लाख लोकांनी ते डाउनलोड केलं.
आम्ही हा 'यडचॅप' प्रकार बघितला तर आम्हाला आठवण झाली ती शाळेत बोटावरती पुस्तक फिरवणार्या आमच्या शाळेतल्या हिरोंची !
फेब्रुवारीत एक खेळण्याच्या प्रदर्शना झाल्यापासून फिजेट स्पिनरचं लोण इतक्या वेगानं पसरत आहे की आता हा धंदा पन्नास कोटी डॉलरचा, म्हणजे तब्बल ३००० कोटी रुपयांचा झालाय !!!