जगातल्या आणि भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची गोष्ट !
आज 25 जुलै , 1978 साली आजच्याच दिवशी जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउनचा जन्म झाला. त्याच दिवशी लाखो मुली जन्माला आल्या असतील, पण लुईस ब्राउनचा जन्म हा एक ऐतिहासिक क्षण होता. ती जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती!!
ज्या तंत्राने लुईसचा जन्म झाला त्याला 'इन विट्रो फर्टिलायझेशन ' किंवा IVF म्हणतात. आता ते आता सर्रास सर्वत्र वापरले जाणारे तंत्र असले, तरी अश्या पध्दतीने कृत्रिम गर्भधारणा करून बाळाला जन्म देता येईल यावर तो पर्यंत कोणाचाही विश्वास नव्हता. IVF तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांचा 2010 सालचं नोबेल पारितोषक देऊन सन्मान केला गेला. पण जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीनंतर बरोबर अवघ्या ६७ दिवसांनी कोलकातामध्ये भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला, जगातल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीला म्हणजे कानुप्रिया अग्रवाल उर्फ ‘दुर्गाला’ जन्म देणाऱ्या डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या वाट्याला फ़क्त उपहास उपरोध आणि अपमान आला.
डॉ. सुभाष यांनी वैद्यकीय क्षेत्रात एवढी महत्व पूर्ण कामगिरी करून सुद्धा त्यांना दुर्लक्षित केलं गेलं. IVF प्रणालीचा भारतात यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना श्रेय तर मिळालंच नाही, पण त्यांना त्यांच्या हक्कापासून डावललं गेलं. त्या वेळच्या बंगाल सरकारने आणि खुद्द भारत सरकारने त्यांना मुद्दाम इंटरनॅशनल कॉन्फरंसमध्ये जाण्यापासून रोखलं. एवढंच काय सरकारने तर अशी काही ऐतिहासिक गोष्ट घडलीच नाही असं म्हटलं.
भारतात बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न करूनही आयव्हीएफ प्रणाली त्यांना विकसित करता आली नाही. पण एका बंगालमधल्या एका लहानश्या डॉक्टरने हे काम करून दाखवलेलं त्याकाळात काहींच्या पचनी पडलं नाही. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्या आरोपांची चौकशी करणाऱ्या पॅनलच्या सदस्यांना IVF बद्दल पुरेसे ज्ञानपण नव्हते. शेवटी या सर्व अपमानास्पद परिस्थितीला कंटाळून डॉ. सुभाष यांनी १९८१ साली आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
मृत्युनंतर १९८६ साली डॉक्टर सुभाष यांच्या कार्याला अधिकृतरीत्या मान्यता मिळाली. तो पर्यंत 'टी. सी. आनंद कुमार' यांचा भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीसाठी सन्मान झाला होता. पण कुमार यांनी डॉ. सुभाष यांच्या संशोधनावर अभ्यास केला असता,त्यांनी स्वतःहून माघार घेणं पसंत केलं. शेवटी मृत्यूनंतर त्यांच्या बुद्धिमत्तेला पूर्ण देशाने मान्य केलं.
अखेर जाता जाता जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राऊन हिला बोभाटा तर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!