computer

'अवघड वाटा दुर्गाच्या':कठोर स्थापत्याचा लोहगड!! कसे जाल, काय पाहाल, इथला इतिहास सर्व जाणून घ्या..

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात एकूण १२ मावळ प्रांत आहेत. त्या बारा मावळांपैकी 'पवन' मावळात 'लोहगड' हा दुर्ग स्थित आहे. साधारणपणे लोहगड-विसापूर ही दुर्गद्वयी आहे, परंतु आज आपण यातील लोहगडाची सफर करणार आहोत.

मुंबई-पुणे हमरस्त्यावरून तसेच रेल्वेमार्गावरून आपल्याला हा दुर्ग सहजरित्या दृष्टीस पडतो. पुण्या-मुंबईवरुन जवळ असल्याकारणाने येथे नेहमी ट्रेकर्सची रीघ लागलेली असते. 'लोहगडवाडी' हे या दुर्गाच्या पायथ्याचे गाव आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील 'मळवली' स्टेशन ला उतरुन आपल्याला या दुर्गाकडे प्रस्थान करता येते. लोणावळ्यावरुन येथे यायचे झाल्यास स्वतःची गाडी असलेली उत्तम. अन्यथा लोणावळ्यावरुन लोहगडवाडीपर्यंत येण्यासाठी १०००/- रुपये मोजावे लागतात.

या दुर्गाला 'लोहगड' असे नाव पडण्यामागे या दुर्गाचे 'वज्रादपि कठोर' असे स्थापत्य हे मुख्य कारण असावे. हा दुर्ग त्याच्या विशेष अशा स्थापत्यगुणामुळे बलदंड व मजबूत झाला आहे. लोहगडाची निर्मिती हि त्याच्या अतिशय जवळ असणाऱ्या 'भाजे' व 'बेडसे' या बौद्ध लेण्यांच्या निर्मीतीच्या जवळच्या काळांत म्हणजेच अंदाजे २७०० वर्षांपूर्वी झाली असावी असे अनेक अभ्यासकांचे अनुमान आहे. या दुर्गाने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे व ब्रिटिश इ. अशा विविध राजसत्तांचा कालावधी अनुभवला आहे.

परंतु लोहगडाचे आजचे स्वरुप हे पेशवाईच्या काळातील आहे. कारण पेशवाईमध्ये नाना फडणीसांच्या काळात त्यांनी याची पुनर्बांधणी केल्याचा एक शिलालेख या दुर्गाच्या गणेश दरवाज्यात कोरलेला आहे. या शिलालेखाबद्दल जर तुम्हाला अधिक विस्तृतपणे जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून दुर्गवाटाचा लोहगडचा व्हिडिओ नक्की बघा. लोहगडावरून आपल्याला विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी, राजमाची, ढाक इ. किल्ले दृष्टीस पडतात.

 दुर्गावर जाताना आपल्याला चार प्रवेशद्वारे पार करुन जावे लागते. या प्रवेशद्वारातील मार्गाची रचना सर्पाकार आहे. अशी रचना करण्यामागे शत्रू सैन्याची दिशाभूल करणे हा मुख्य उद्देश आहे. आता आपण लोहगडावरील प्रवेशद्वाराची रचना पाहूया :-
१. गणेश दरवाजा:- लोहगडवाडीपासून पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो. याच्या दोन्ही बाजूला गणेश प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यामुळे याला 'गणेश दरवाजा' हे नाव पडले. पूर्वी बांधकाम करतांना नरबळी द्यायची प्रथा होती. त्याच प्रथेला अनुसरुन ह्या प्रवेशद्वाराच्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता. त्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती.

२. नारायण दरवाजा:- नाना फडणीसांनी या दुर्गाची पुनर्बांधणी करतांना या प्रवेशद्वाराची निर्मिती केली. याच्या दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत.

३. हनुमान दरवाजा:- हा लोहगडाचा सर्वांत प्राचीन दरवाजा असून याच्या दोन्ही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शरभ या दुर्ग शिल्पाबद्दल अधिक माहिती वरील व्हिडिओत आहे.

४. महादरवाजा:- चार प्रवेशद्वाराच्या शृंखलेमधील हे शेवटचे प्रवेशद्वार आहे. याच्या दोन्ही बाजूला हनुमानाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे दोन्ही हनुमान अनुक्रमे 'वीर मारुती ' व 'दास मारुती' आहेत.
या दोन्ही शिल्पांबद्दल अधिक माहिती वर दिलेल्या दुर्गवाटाच्या लोहगड व्हिडिओत आहे

या दुर्गावर दोन मोठे तलाव बांधलेले आहेत. यातील एक तलाव हा अष्टकोनी आहे आणि दुसरा तलाव तब्बल सोळा कोनांचा आहे. नाना फडणीसांच्या काळातच याची बांधणी झाली आहे. चावंडप्रमाणेच इथंही जुनी अतिशय साधारण स्वरूपाची लेणी आहेत आणि नंतरच्या काळात दुर्गाच्या दृष्टीनं त्यांचा कोठी (धान्यं साठवण्याची जागा) म्हणून उपयोग केला गेला. या दुर्गावर स्वच्छतेच्या दृष्टीने शौचकूपांची सोय केलेली दिसते. लोहगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे याचा पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद असा विंचूकाटा होय. विंचूकाटा हि लोहगडाच्या डोंगराची लांबवर गेलेली सोंड आहे, तिचा आकार हा विंचवाच्या नांगीसारखा असल्यामुळें त्याला 'विंचूकाटा' हे सार्थ नाव पडलं. या भागातही आपल्याला पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याची उत्तम सोय केलेली आढळते. विंचूकाट्याच्या शेवटच्या टोकावर चिलखती बुरुज बांधून तो स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या अतिशय मजबूत केलेला आहे. येथे उभे राहून आपल्याला गडाच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येतो.

 

आता आपण लोहगाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया. इ.स.१४८९ मध्ये मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली व अनेक दुर्ग जिंकून घेतले. लोहगड हा त्यांपैकी एक महत्वाचा दुर्ग होता. इ.स.१५६४ मध्ये बुर्हान निजामशहा दुसरा हा येथे कैदेत होता. इ.स.१६३० साली हा दुर्ग आदिलशाहीत गेला. त्यानंतर इ.स.१६५७ साली शिवछत्रपतींनी लोहगड-विसापूर व याच्या आजूबाजूचा परिसर स्वराज्यात सामील करुन घेतला. इ.स.१६६५ मध्ये झालेल्या 'पुरंदच्या तहा' त हा दुर्ग मोगलांकडे गेला. परंतु १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी हा दुर्ग पुन्हा जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. तसेच सुरत लुटीवेळी मिळालेली संपत्ती स्वराज्याचे पहिले सरनौबत नेतोजीराव पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली.

इ.स.१७१३ मध्ये थोरल्या शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड 'सरखेल कान्होजी आंग्रे' यांकडे सोपवला. इ.स.१७२० मध्ये तो आंग्रयांकडून पेशव्यांकडे आला. इ.स.१७७० मध्ये नाना फडणीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी लोहगडाचा कारभार 'धोंडोपंत नित्सुरे' यांच्याकडे सोपवला. इ.स.१७८९ मध्ये नानांनी या दुर्गाचे बांधकाम आणखीन मजबूत करुन घेतले. आज आपण लोहगडावर जे बांधकाम बघतो ते याच काळांत झालेलं आहे.

इ.स.१८०३ मध्ये हा दुर्ग इंग्रजांनी जिंकला परंतु दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकून घेतला. ४ मार्च १८१८ ला 'जनरल प्रॉथर' लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला व नंतर दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले व तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.

अशा या लोहगडावर अजूनही बऱ्याच वास्तू बघण्यासारख्या आहेत. लोहगडाबद्दल अजून डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी दुर्गवाटाचा लोहगडाचा व्हिडिओ नक्की बघा. खाली लिंक जोडत आहे.

 

लेखक - अथर्व बेडेकर - पुरातत्व अभ्यासक 

सबस्क्राईब करा

* indicates required