computer

अँप वापरून भामटे असा करतात बँक फ्रॉड, स्वतःला कसं वाचवायचं ते जाणून घ्या !!

आजच्या डिजिटल युगात आपल्यातले बरेचजण बँकेचे व्यवहार फोन द्वारे करत असतात. ऑनलाईन व्यवहारा सोप्पा असल्याने तो चलतीत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन चोरट्यांनी आपल्या बँक अकाऊंटवर दरोडा टाकण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय.

मंडळी, सध्या चोरटे एका अॅपद्वारे लोकांच्या मोबाईल मध्ये शिरण्याचा प्रयत्नात आहेत. या अॅपचं नाव आहे – AnyDesk.

AnyDesk हे एक डिव्हाईस कंट्रोल अॅप आहे. या अॅपमुळे आपण मोबाईलने कम्प्युटर कंट्रोल करू शकतो. म्हणजेच कम्प्युटरला हातही न लावता कम्प्युटरवर पूर्ण ताबा मिळवता येतो. तर या अॅपचा वापर करून चोरटे आपल्या बँक अकाऊंटवर डल्ला मारू पाहत आहेत.

चला तर चोरटे हे काम कसं करतात ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया !!

१. सुरुवात होते ती एका फोन कॉलने. चोरटे आपण बँक कर्मचारी असल्याचं भासवतात. त्यांना काहीही करून AnyDesk अॅप आपल्याकडून डाऊनलोड करून घ्यायचा असतो.

२. आपण टाळाटाळ केली की मग शेवटी ते आपलं ‘ब्रम्हास्त्र’ बाहेर काढतात. आपलं बँक अकाऊंट बंद पडेल किंवा आपलं कार्ड ब्लॉक होईल अशी भीती घातली जाते.

 ३. हे तथाकथित बँकेचे कर्मचारी खरे आहेत यावर आपला विश्वास बसावा म्हणून ते आपली माहिती तपासण्याचं नाटक करतात. जसे की नाव, जन्म तारीख, पत्ता, फोन नंबर, वगैरे.

४. एकदा का AnyDesk अॅप डाऊनलोड झालं की अॅपतर्फे बरीच परमिशन्स मागण्यात येतात. या परमिशन्स शिवाय आपल्याला अॅप वापरता येऊ शकत नाही, त्यामुळे आपणही Allow वर क्लिक करतो. पण असं करून आपण आपल्या मोबाईलचा ताबा अॅपकडे सोपवत असतो.

५. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला एक ९ डीजीटचा अॅप कोड मिळतो. चोरटे या अॅप कोडची मागणी करतात.

६. यानंतर तुमच्या अॅपवरून परमिशन मागितली जाते. तुम्ही जेव्हा Allow वर क्लिक करता तेव्हा तुमचा मोबाईल चोरट्यांच्या ताब्यात गेलेला असतो.

तसं पाहायला गेलं तर AnyDesk हे अॅप चांगल्या कामासाठीच तयार केलं गेलंय, पण या अॅपच्या चुकीच्या वापराने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. AnyDesk आणि या सारख्या डिव्हाइस कंट्रोल अॅप्सच्या माध्यमातून चोरट्यांनी बँक अकाऊन्टवर दरोडा घालण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. RBI ने असा कोणताही अॅप डाऊनलोड करण्यास सक्त मनाई केली आहे.

भाऊ बोभाटाचा असा सल्ला आहे की कोणत्याही अॅपचं अॅप कोड कोणाशीही शेअर करू नका. हा अॅप कोड म्हणजे तुमच्या अॅपची चावी असते. अॅप कोड चुकीच्या माणसाच्या हाती पडल्यास मोठा घोटाळा होऊ शकतो.

 

आणखी वाचा :

ATM वर डल्ला मारण्याची चोराची जगावेगळी पद्धत...पाहा बरं काय केलंय त्याने !!

एटीएम, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वापरता? मग या चार गोष्टी तुम्ही कधीच करू नका...

जाणून घ्या नक्की कसं चालतं ATM !!

ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

सबस्क्राईब करा

* indicates required