computer

रिलायन्सने नक्की काय गेम करून मंदीत चांदी केली? वाचा रिलायन्सचे शेअर्स तुमच्याकडे असतील तर काय करायला हवे??

काही महिन्यांपूर्वीची, नेमकं सांगायचं तर ऑगस्ट २०१९ ची गोष्ट आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की मार्च २०२१ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही झीरो डेट(Zero Debt) म्हणजे डोक्यावर एकही रुपया कर्ज नसलेली कंपनी असेल. केवळ ही घोषणाच नव्हती तर त्यामागे एक सबळ कारणही होतं. आखाती देशातली सौदी अ‍ॅरामॅको नावाची एक तेल कंपनी रिलायन्सच्या एकूण भाग भांडवलापैकी २०टक्के शेअर घेणार हे निश्चित झालं होतं. अ‍ॅरामॅकोचे $75 बिलीयन(एक बिलीयन म्हणजे १०० कोटी) डॉलर येणार या बातमीने शेअरबाजारात आनंदी आनंद गडे!  असं वातावरण निर्माण झालं. पण ओठांत आणि पेल्यात काही वेळा बरंच अंतर असतं. नेमकं झालं तसंच! 

डिसेंबर २०१९ मध्ये भारत सरकारने हा सौदा मंजूर नसल्याचं कळवत थेट कोर्टात धाव घेतली. रिलायन्सला कर्ज फेडण्यासाठी बाहेरून भागीदार आणण्याची गरज नाही असं सरकारने कोर्टात सांगीतलं. याच दरम्यान अंबानी कुटुंबियांपैकी काही सदस्यांनी आयकराची चोरी केली अशा संशयावरून आयकरखात्याने त्यांची तपासणी सुरु केली. हा संशय अगदी बिनबुडाचा नव्हता. एचएसबीसी बँकेच्या स्वित्झर्लंड शाखेत ७०० भारतीय नागरीकांची खाती सापडली. या खात्यांचा अंबानींशी संबंध होता. ही सर्व माहिती फ्रेंच सरकारने भारत सरकारला पुरवली होती. 

मात्र भारतात तोपर्यंत आपल्या अंदाज पत्रकाची वेळ झाली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात प्युअर टेरेप्थॅलीक अ‍ॅसिड (पीटीए)वर असलेले कर कमी करून सर्वांना समान संधी देण्याची घोषणा केली आणि रिलायन्सला आणखी एक धक्का दिला. प्युअर टेरेप्थॅलीक अ‍ॅसीड (पीटीए) या रसायनावर रिलायन्सची मोनोपली म्हणजेच एकाधिकार जवळजवळ संपुष्टात आणले. हे रसायन कृत्रिम धागे बनवण्याचा कच्चा माल आहे.  त्यामुळेच पीटीएच्या मोनोपलीसाठी धीरुभाई अंबानींनी आपली हयात खर्च केली होती. या अंदाजपत्रकात आणखी बरंच काही घडलं. त्यातलाच एक भाग म्हणजे इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पध्दतीने गुंतवणूक करणार्‍यांना लाभांश म्हणजेच डिव्हिडंडवर इन्कमटॅक्स आकारण्याची पध्दत बदलण्यात आली. त्यामुळे रिलायन्सने मांडलेले सर्वच गणित चुकले. 

त्यातच गळवावर फोड आला कोविडचा आणि तेलाचे भाव कोसळले. सौदी अ‍ॅरामॅकोचे सगळे मनसुबेही त्यासोबत कोसळले. गुंतवणूकदारांची खात्री पटली की आता लोच्या झाला. पण आता सगळं काही संपलं असं जेव्हा वाटतं, तेव्हाच कहानी में ट्वीस्ट हीच अंबानी कंपनीची खासियत आहे. त्यामुळे फेब्रुवारीत रिलायन्सच्या एका शेअरचा भाव रु.१५०३ तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रु. ८८४ आणि आज हा लेख लिहिताना रु. १५५९ होता!! तर हा "कहानी में ट्वीस्ट" आला कसा ते आता समजून घेऊ या!!

सौदी अ‍ॅरामॅकोच्या २० टक्के गुंतवणूकीत खिळ पडते आहे हे लक्षात आल्यावर रिलायन्सने "जिओ"चा वापर अ‍ॅसेट म्हणून करायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. रिलायन्सच्या हिशोबपत्रकात "जिओ"मुळे झालेले कर्ज फार मोठे आहे. अर्थातच हा प्लॅन बी सौदी अ‍ॅरामॅकोच्या आधीच तयार असावा. आता "जिओ"कडे काय अ‍ॅसेट आहेत ते बघू या. जिओच्या मोबाइल आणि ब्रॉडबँड सेवा-जिओची अनेक अ‍ॅप्लिकेशन, जिओचे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स बिग डेटा आणि आयओटी, रिलायन्स रिटेल आणि याखेरीज डेन आणि हॅथवे या कंपन्यांमधील गुंतवणूक! गेल्या काही महिन्यांत या दोन कंपन्यांच्या शेअरचा वाढणारा भाव या प्लॅनची अप्रत्यक्ष साक्ष देत होतेच. 

टेक्नॉलॉजीचे पुढच्या दहा वर्षांचे भविष्य डोळ्यासमोर बघू शकणार्‍या कंपन्यांना हा प्लॅन विकणे इतकेच बाकी होते. फेसबुक आणि गुगल हे दोनच मोठे पर्याय होते. पण गुगल अ‍ॅमेझॉनसोबत आणि अलीबाबा पेटीएमसोबत जाईल हे चित्र हळूहळू स्पष्ट होत होते. साहजिकच जिओसाठी फेसबुक हेच उत्तम स्थळ होते. फेसबुकच्या बाजूने नजर टाकली तर आजच्या तारखेस त्यांच्या हातात व्हॉट्सॲपचे ४० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. बाजारात खर्च करू शकेल अशी भारतातली कमावती पिढी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या सोबत आहे.

थोडक्यात कुंडलीचे ३६ गुण जमत होते. त्यामुळे फेसबुकने 'फक्त जिओच्या' ९.९ % भागीदारीसाठी ४३५७४ कोटी रुपये (५.७ बिलियन डॉलर) मोजले. फेसबुकच्या आधीच रिलायन्समध्ये सिल्व्हर लेक या कंपनीने ५६५५.७५ कोटींची गुंतवणूक केलीच होती. या आठवड्यात 'व्हिस्टा' या कंपनीने ११३६७ कोटी गुंतवण्याचे निश्चित केले आहे. आता जिओमध्ये फेसबुक ९.९ % सिल्व्हरलेक १.१५% आणि व्हिस्टा २.२३% भागधारक आहेत.

या खेळीने रिलायन्सचा काय फायदा झाला? 

१. कर्जाचा भार कमी झाला. म्हणजेच व्याजाचा बोजा कमी झाला. बॅलन्सशीट तगडी झाली.
२. जिओवर ताबा आहे तसाच राहिला. 
३. जिओचे फक्त सॉफ्ट अ‍ॅसेट बाजूला झाले. हार्ड अ‍ॅसेट म्हणजे प्लँट-मशिनरी-बिल्डींग रिलायन्सच्याच हातात राहिले.
४. रिटेल मार्केटचा रस्ता मो़कळा झाला. आता भारतात वॉलमार्ट-अलीबाबा- अ‍ॅमेझॉन यांना रिलायन्स रिटेल हा नवा स्पर्धक उभा झाला.
५. सौदी अ‍ॅरामॅकोसाठी गुंतवणूकीची योजना अधिक आकर्षक झाली. कदाचित त्यामुळे २०% साठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील.
६. आणि ठरल्याप्रमाणे २०२१ साली रिलायन्स कर्जमुक्त होईल याची अप्रत्यक्ष ग्वाही देण्यात रिलायन्स यशस्वी झाले आहे.

बघा, एका दगडात किती पक्षी मारले? आता पुढे काय??

येत्या वर्षभरात रिलायन्स जिओचे वेगळे बिर्‍हाड थाटेल म्हणजे ते जिओचा स्वतंत्र पब्लिक इश्यू आणतील. म्हणजेच रिलायन्सच्या खात्यात मोठ्ठे घबाड जमा होईल.  मग आता गुंतवणूकदारांनी काय करावे? 

१. तुम्ही रिलायन्सचे शेअरहोल्डर असाल तर शेअर विकू नका.
२. पब्लिक इश्यूमध्ये जिओचे शेअर तुम्हाला आपोआप मिळतील. मिळाल्यावर लगेच विका.
३. तुमचे बजेट कमी असेल तर डेन किंवा हॅथवे या कंपन्यांचे शेअर घ्या .

असा सध्या शेअरबाजारात मिळणारा सल्ला आहे. निर्णय आणि नफातोटा ज्याचा त्यांनी घायचा आहे. बोभाटाला फक्त हा लेख कसा वाटला ते सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required