एका फेसबुक पोस्टच्या सहाय्याने तिने कशा प्रकारे तब्बल १४,००० लोकांना चुना लावला ? वाचा ठग बाईची गोष्ट !!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/kate_mcclure_headshot.23150c8c.fill-735x490.jpg?itok=7_csP_rS)
हल्ली चांगल्या गोष्टी फार व्हायरल होत आहेत. म्हणजे बघा ना, गेल्याचा आठवड्यात एका मुलीने तिला रात्रीच्यावेळी घरी सुखरूप पोहोचवणाऱ्या रिक्षाचालकाची माहिती दिली होती. तिची पोस्ट रातोरात व्हायरल झाली. याच पद्धतीची एक पोस्ट गेल्यावर्षी व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे एका बेघर माणसाला तब्बल ४,०२,००० डॉलर्स म्हणजे जवळजवळ २ कोटी ८४ लाख रुपयांची आर्थिक मदत उभी राहिली होती.
त्याचं झालं असं की, मॅकक्लर नावाच्या मुलीची कार रात्रीच्या वेळी बंद पडली. तिच्या कारमधलं इंधन संपलं होतं. पंपावर जाऊन पेट्रोल भरून घ्यायचं म्हटलं तर खिशात पैसेही नव्हते. मग तिच्या मदतीला धावून आला एक बेघर माणूस. त्याने माणुसकीच्या खातर दिवसभर जमवलेले २० डॉलर्स तिच्यासाठी खर्च केले. त्याने तिच्याकडून परत पैसेही मागितले नाहीत. असा हा दुर्मिळ माणूस होता.
मॅकक्लरने याची परतफेड म्हणून जॉनी बॉब्बीट म्हणजे त्या बेघर माणसावर एक भला मोठा लेख लिहून त्याला प्रसिद्ध केलं. या पोस्टने ती आणि जॉनी बॉब्बीट दोघेही प्रसिद्ध झाले. मॅकक्लर इथेच थांबली नाही तर ती GoFundMe वेबसाईटवर गेली. तिथे तिने बॉब्बीटला मदत म्हणून पैसा उभारायला घेतला. आधीच तिच्या पोस्टने भारावलेली जनता पैसे दान करायला लगेच तयार झाली.
मंडळी, हा सगळा चक्क एक घोटाळा होता. चला जाणून घेऊया या गोष्टीच्या मागची खरी गोष्ट.
राव, गोष्ट तशी सोप्पी होती, पण ती कोणाच्याच लक्षात आली नाही. सोशल मिडीयावर लोकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार होता. या गोष्टीत तीन पात्रं आहेत. मॅकक्लर, तिचा बॉयफ्रेंड डी’एमीको आणि जॉनी बॉब्बीट.
मॅकक्लर आणि तिच्या बॉयफ्रेंड डी’एमीकोने मिळून GoFundMe मार्फत लोकांकडून पैसे गोळा केले. १४,००० लोकांनी जवळजवळ ४,०२,००० डॉलर्स म्हणजे २ कोटी ८४ लाख रुपये दान केले. यातील ३०,००० डॉलर्स GoFundMe ने फी म्हणून कापले. पण, उरलेल्या रकमेतले फक्त ७५,००० डॉलर्स जॉनी बॉब्बीटला देण्यात आले तर बाकी पैसे दोघांनी लंपास केले.
जॉनी बॉब्बीटने याबद्दल तक्रार दाखल केली. मॅकक्लर आणि तिचा बॉयफ्रेंड या दोघांविरुद्ध खटला दाखल झाला. मग एक एक माहिती समोर आली. दोघांनी बीएमडब्ल्यू कार विकत घेतली होती आणि लासवेगाससारख्या ठिकाणी पैसा उडवला होता. मॅकक्लरने तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून हा घोटाळा केला. याचं गौडबंगाल बाहेर आलं ते तिने मित्राला पाठवलेल्या मेसेजेसमुळे. तिने गोष्टीत मसाला भरण्यासाठी स्वतःच कारमधलं इंधन संपू दिलं होतं. अशा आणि आणखी काही पुराव्यांमुळे पोलिसांनी मुख्य आरोपी मॅकक्लरला ताब्यात घेतलं.
घोटाळा लपवण्यासाठी डी’एमीकोने एका मुलाखतीत म्हटलं की आम्ही आम्ही जॉनी बॉब्बीटच्या भल्यासाठीच त्याला पैसे दिले नाहीत. पैसे दिले असते तर त्याने ड्रग्ससाठी ते पैसे खर्च केले असते. पुढे तर तो असंही म्हणाला की ‘मी पैसा जाळेन पण जॉनी बॉब्बीटला देणार नाही.”
पण गोष्ट इथेच संपत नाही राव. खरी गोष्ट तर पुढे उघड झाली. ज्या बेघर बिच्चाऱ्या जॉनी बॉब्बीटने या दोघांविरुद्ध खटला दाखल केला होता, चक्क तोही या घोटाळ्यात सामील होता. खरं तर तिघांनी मिळून हा घोटाळा केला होता. पण पुढे बॉब्बीटला त्याचा कमी हिस्सा मिळाला. मग त्याने आपण खरंच बेघर असल्याचं दाखवून खटला भरला.
तर मंडळी, यातून आपल्याला हाच धडा मिळतो की पैसे डोनेट करण्यापूर्वी आपले पैसे योग्य जागी पोहोचतायत की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे.
भारतात तर असे हातोहात फसवणारे पावलोपावली आढळतात, त्यामुळं आपला घामाचा पैसा योग्य ठिकाणी जातो की नाही ते नक्की तपासून पाहा