गुगलच्या या डूडल मागचा अर्थ काय आहे ? माहित्ये का भाऊ ?

मंडळी गुगल त्याच्या डूडल मधून त्या त्या दिवसाची एक खास आठवण सांगत असतं. आजही गुगलने असाच एक डूडल तयार केला आहे. पण राव हा डूडल आहे तरी काय ? आधी तर बघूया डूडल कसा दिसतोय ते बघुयात.

या डूडल मध्ये एक जंगल दिसत आहे आणि त्याच्या मधोमध असलेल्या एका झाडाभोवती काही महिला फेर धरून उभ्या आहेत.

चला तर या डूडल बद्दल पूर्ण माहिती घेऊया घेऊया.

स्रोत

१९७३ साली म्हणजे आजपासून ठीक ४५ वर्षांपूर्वी एक आंदोलन सुरु झालं होतं ज्याचं नाव होतं ‘चिपको आंदोलन’. असंख्य झाडांच्या कत्तली वाचवण्यासाठी उत्तराखंड मधल्या महिलांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन सुरु केलं. हे आंदोलन ज्या दिवशी सुरु झालं तो आजचाच दिवस.

उत्तराखंडच्या अलकनंदा भागातील ‘मंडल’ गावी चिपको आंदोलन सुरु झालं. या आंदोलनाची ठिणगी पडली ती झाडांच्या विक्रीमुळे. या झाडांची विक्री एका क्रिकेटची साधनं तयार करणाऱ्या कंपनीला करण्यात आली होती. याआधी गावात शेतीची अवजारे तयार करण्यासाठी वृक्षतोडीची परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली आणि त्याउलट एका कंपनीला झाडांची विक्री केल्यानंतर लोकांच्या मनात राग उफाळून आला.

स्रोत

लोकांच्या विरोधाला न जुमानता तब्बल अडीच हजार झाडांना कंपनीला विकल्यानंतर लोकांनी आपला विरोध वाढवला. लोकांचा विरोध बघता ठेकेदारांनी चलाखीने गावातील लोकांना जुनी देणी देण्याच्या निमित्ताने गावापासून लांब बोलावून घेतलं आणि त्याचवेळी वृक्षतोड करण्यासाठी माणसांना पाठवलं. यावेळी गावातली माणसं गावाबाहेर होती आणि त्यांना गावात यायला एक दिवस लागला असता. गावात विरोध करण्यासाठी कोणी नसल्याने वृक्षतोड अटळ होती. पण परिस्थितीचं भान घेऊन गावातील केवळ १५ ते २० स्त्रिया आपल्या मुलाबाळांसहीत झाडांना चिकटून उभ्या राहिल्या. ठेकेदारांनी त्यांना विवस्त्र करण्याची हीन धमकी दिली पण त्याला न जुमानता या स्त्रियांनी ‘पेड कटने नही देंगे’चा नारा दिला. शेवटी ठेकेदार मागे फिरले.

स्रोत

चिपको आंदोलनाबद्दल बोलताना दोन नावे आवर्जून घेतली पाहिजेत. ती म्हणजे 'गौरी देवी' आणि 'सुंदरलाल बहुगुणा' यांची. या दोघांचा चिपको आंदोलनात सिंहाचा वाटा होता. गांधीजींच्या अहिंसावादी मार्गाने चालत त्यांनी हा लढा उभारला. पुढे गौरी देवी यांना 'चिपको वूमन' या नावाने देखील ओळखलं जाऊ लागलं.

ही घटना चिपको आंदोलन म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाली. चिपको आंदोलनाचं मूळ हे राजस्थान मधल्या १७३० सालच्या घटनेत आहे. बिश्नोई समाजातील तब्बल ३६३ लोकांनी वृक्षतोड होऊ नये म्हणून आपले प्राण गमावले होते.

मंडळी, आपला जीव धोक्यात घालून झाडांना सुरक्षित ठेवणाऱ्या याच पराक्रमी स्त्रियांना गुगलने डूडलच्या माध्यमातून कडक सलाम ठोकला आहे.  

सबस्क्राईब करा

* indicates required