computer

गुगल फोटोजची मोफत सेवा बंद होत आहे...किती पैसे आकारले जातील? नवे नियम काय असतील?

आजकालच्या डिजिटल युगात फोटो प्रिंट करून अल्बम बनवणे मागे पडले आहे. सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आल्याने फोटो किती काढावेत याला गणतीच नाही. त्यामुळे जुने फोटो साठवायचे कुठे हा प्रश्न पडू लागला. दरवेळेला लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर फोटो सेव्ह होतातच असे नाही. हेच पाहून गुगलने क्लाऊड स्टोरेज म्हणजे ऑनलाईन डेटा स्टोरेज कल्पना आणली. गुगल फोटोद्वारे मोबाईलवरचे सगळे फोटो आणि व्हिडीओ ऑटोमॅटिक सेव्ह होऊ लागले. काम सोपे झाले. परंतु कोणतीही सर्विस किती काळ मोफत राहील?

गुगल १ जून २०२१ पासून गुगल फोटोज ही मोफत सेवा बंद करत असून आता फोटो साठवायला पैसे मोजावे लागणार आहेत. युझर्सना याबाबत माहिती देणारे मेलही येऊ लागले आहेत. या संदर्भात अनेक प्रश्न असतील तर याची संपूर्ण माहिती या लेखांमधून घेऊयात. 

गुगलने जाहिर केले आहे, की १ जून २०२१ नंतर युझर्सना ऑनलाइन डेटा स्टोअरसाठी केवळ १५ जीबी विनामूल्य स्टोरेज मिळेल. आतापर्यँत गुगल फोटोमध्ये कितीही डेटा फोटोच्या किंवा व्हिडीओच्या स्वरूपात तुम्ही सेव्ह करू शकत होता. पण १ जून पासून तुमचा डेटा जर १५जीबीच्या वर गेला तर तुम्हाला पैसे भरावे लागतील. कंपनीने या योजनेला 'गुगल वन प्लॅन' हे नाव दिले आहे. १५ जीबीपेक्षा अधिक डेटा सेव्ह करायचा असेल तर त्यासाठी कंपनीला महिन्याचे $ १.९९ म्हणजेच १४६ रुपये फी म्हणून द्यावे लागतील. तसेच गुगल वन ची वार्षिक फी $१९.९९ म्हणजेच अंदाजे १,४६४ रुपये इतकी असेल. अर्थात आजपर्यंत जो डेटा तुम्ही सेव्ह केला आहे तो यामध्ये मोजला जाणार नाही. १ जून पासून पुढचा डेटा मोजला जाणार आहे.

याचा अर्थ १ जून पासून तुम्ही निवडक, महत्वाचे फोटो, व्हिडीओ सेव्ह करु शकता. सरसकट uploding करणे थांबवावे लागेल. मोफत हवे असल्यास १५ जीबीची मर्यादा सांभाळावी लागेल. गुगलने मर्यादा घातल्यावर ऑनलाईन डेटा स्टोरेजसाठी अजून काही नवे पर्याय येतीलच. तुम्हाला कोणता पर्याय माहीत असल्यास कमेंट करून नक्की कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required