computer

आभाळाएवढ्या मोठ्या मनाच्या जेआरडींंच्या साधेपणाचे हे किस्से तुम्ही नक्कीच वाचले नसतील !!

कोणताही ‘मोठा माणूस’ हा त्याला भेटणाऱ्या माणसावर एक दडपण आणत असतो. त्याने केलेलं काम, त्याच्याकडचा पैसा, मान, मरातब या गोष्टी नाही म्हटल्या तरी इतरांसमोर आभाळाइतकं मोठं रूप तयार करतात. आपल्या मोठेपणाचा भपका इतरांवर पडू न देणे आणि आपल्यातला साधेपणा टिकवून ठेवणे फार कमी लोकांना जमतं.

अशाच मोजक्या लोकांमधलं महत्वाचं नाव म्हणजे ‘भारतरत्न जे आर डी टाटा’. जे आर डी टाटा यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस त्यांच्या मोठेपणामुळे आणि साधेपणामुळे भारावून जायचा. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्या साधेपणाचे काही किस्से वाचणार आहोत.

आम्ही आज जो किस्सा सांगणार आहोत तो गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवणीतला आहे. गौतम राजाध्यक्ष हे नावाजलेले फोटोग्राफर होते. त्यांनी अनेक दिग्गजांना कॅमेऱ्यात टिपलं. १९८८ साली त्यांच्यावर जे आर डी यांची फोटोग्राफी करण्याची जबाबदारी आली होती. हे अपघातानेच घडलं होतं.

त्याचं झालं असं की, जे आर डी यांचं पुस्तक ‘की नोट्स’ प्रकाशित होणार होतं. या पुस्तकाच्या मुखपृष्टावर छापण्यात येणारा फोटो अजून ठरत नव्हता. एका मोठ्या फोटोग्राफरने त्यांचे फोटो काढलेही होते, पण जे आर डींना ते आवडले नाहीत. कारण फारच गमतीशीर होतं. जे आर डींना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या नको होत्या. त्यांच्या मते त्यांच्या सुरकुत्याच तेवढ्या फोटोग्राफरने फोटोत पकडल्या होत्या.

(गौतम राजाध्यक्ष)

हे ऐकून गौतम राजाध्यक्ष यांना टेन्शन आलं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या कशा याचा ते विचार करू लागले. त्यांनी मित्राला फोन करून एक लेन्स मागवून घेतली. आदल्या दिवशी जे आर डींच्या घरी जाऊन कपडे आणि फोटोची जागा ठरवली. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ठरलेल्या वेळेत ते आले.

नावाजलेल्या व्यक्तीला भेटताना जे दडपण येतं तेच दडपण गौतम राजाध्यक्ष यांना आलं होतं. दोघे पूर्वी कधीच भेटले नव्हते. ते कसे आहेत याबद्दल पण फारच जुजबी माहिती होती, पण ही पहिली भेट अगदी सहज पार पडली. बरोबर ९.३० वाजता जे आर डी आदल्या दिवशी राजाध्यक्षांनी निवडलेला सूट घालून आले आणि जुनी ओळख असल्या सारखं त्यांनी विचारलं “हा ठीक आहे ना ? टाय मॅच होतोय का मला ?’

या पहिल्याच वाक्याने बोलण्यात आलेली सहजता पुढे संपूर्ण फोटोसेशन मध्ये टिकून राहिली. जे आर डी आणि गौतम राजाध्यक्ष पूर्वी कधीही भेटलेले नव्हते तरी जे आर डींनी त्यांच्याशी टाटा, एअर इंडिया ते फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. फोटोसेशनच्या वेळी तिथे जे आर डींचे नातेवाईक पण उपस्थिती होते. सगळे एकाच वयाचे असल्या सारखे तिथे वातावरण होतं.

आज आपण गुगलवर जे आर डी टाटा सर्च केल्यावर जे फोटो दिसतात त्यातले बहुतेक हे यावेळचेच फोटो आहेत. या फोटोसेशनला १ तासांचा अवधी लागला. राजाध्यक्ष यांच्या कॅमेऱ्याने अशी काही जादू केली होती कि जे आर डींच्या सुरकुत्या तर निघून गेल्याच पण फोटोमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व साफ झळकत होतं. भविष्याकडे पाहणारी नजर, त्यांच्या अनुभवातली श्रीमंती आणि सहजता फोटोमध्ये अचूक आली होती.

काही दिवसांनी जेव्हा राजाध्यक्ष यांनी भीतभीत फोटोबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला. जे आर डींना फोटो आवडले होते. एवढंच नाही तर फोटो प्रिंटींगला पाठवण्यात देखील आले होते. दहा दिवसांनी राजाध्याक्षांना पुस्तकाची आगाऊ कॉपी मिळाली. मुखपृष्टावर त्यांनी काढलेला फोटो छापण्यात आला होता. ‘की नोट्स’ पुस्तकाचं हे कव्हर पाहा.

मंडळी, हा किस्सा इथेच संपत नाही. वर्षभराने राजाध्यक्ष जे आर डींना दिल्लीत भेटले. राजाध्याक्षांना वाटलं की जे आर डी आपल्याला विसरले असतील. म्हणून त्यांनी आपली ओळख करून दिली तर जे आर डींनी त्यांना मध्येच थांबवून म्हटलं, “मला माहितीये, माझे ते सुरेख फोटो तूच काढले होतेस. मी मिसेस दिवेचांना सांगितलंय, की यापुढे कधीही कोणत्याही पत्रकाबरोबर त्यातलेच फोटो वापरायचे. थॅक यु, खूप छान फोटो काढलेस माझे.’

मंडळी, जे आर डी सारख्या उद्योगपतीच्या आयुष्यात वर्षभरात अनेक गोष्टी घडत असतात. तरी त्यांनी वर्षभरापुर्वीची त्यांची भेट लक्षात ठेवली. एवढंच नाही तर कामाचं तोंडभरून कौतुक केलं.

राजाध्यक्ष यांनी जे आर डींना शेवटचं पाहिलं त्यावेळचा प्रसंग पण वाचण्यासारखा आहे.

सकाळी ११.३० ची वेळ होती. बॉम्बे हाऊसमध्ये प्रचंड गर्दी होती. सगळ्या लिफ्ट समोर लोकांनी रांगा लावल्या होत्या. थोड्यावेळाने जे आर डी तिथे आले. ते अत्यंत कृश दिसत होते. लोकांनी लगेच बाजूला होऊन त्यांना पुढे जाऊ दिलं. त्यावेळी ते लोकांना काहीशा तिखट, पण स्पष्ट आवाजात म्हणाले, “ठीक आहे, ठीक आहे, लिफ्ट मध्ये शिरा. मी उशिरा आलोय. माझ्यापाशी भरपूर वेळ आहे. निवृत्त झालेला मी एक म्हातारा माणूस आहे. माझी खात्री आहे की तुम्हा सगळ्या तरुणांना खूप कमी वेळ आणि खूप जास्त काम आहे. तेव्हा तुम्ही आधी जा बरं.’

आपण कोणी मोठे आहोत हे जे आर डींनी कधी समजलं नाही आणि कोणापुढे ते मिरवलंही नाही. एअर इंडियाने प्रवास करताना विमानातले सगळे कर्मचारी त्यांच्या मागे मागे असायचे. तेव्हा त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितलं होतं, “मी एअर इंडियाचा चेअरमन आहे, त्यामुळे मी फुकट प्रवास करतोय. तेव्हा माझी खातिरदारी करण्याऐवजी, जे पैसे देऊन प्रवास करतायत त्यांची काळजी घ्या.”

जे आर डींना जेव्हा भारतरत्न मिळाला तेव्हाही त्यांनी म्हटलं होतं की “मी भारावून गेलोय. मी तेवढा मोठा नाही.” खरं तर भारतरत्न पुरस्कारासाठी जे आर डींपेक्षा चांगली निवड कोणती असणार होती ? राजाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे ‘टाटाने मोठं होण्यापेक्षा भारताने मोठं होण्यात त्यांना रस होता.”

अशा या महान उद्योजागाला बोभाटाचा सलाम.  

 

आणखी वाचा :

८८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या भारतीयाला मिळाले पहिले पायलट लायसन्स !!

सबस्क्राईब करा

* indicates required